तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचंच पुनर्वसन करू -मुख्यमंत्र्यांचा तळीये दुर्घटनाग्रस्तांना आधार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाड येथील तळीये गावास भेट देऊन पाहणी केली यावेळी उपस्थित माध्यम प्रतिनिधींशी केलेला संवाद
हे आक्रीत घडलेले आहे. आजकाल पावसाळ्याची सुरुवात सुद्धा चक्रीवादळाने होते. तळीयेतील गावकऱ्यांनी अजिबात काळजी करू नये. सरकार त्यांना सर्व मदत करेल, संपूर्ण नुकसान भरपाई दिली जाईल. त्यांचे योग्य पुनर्वसन करू. अशा घटना पाहता डोंगरउतार आणि कडेकपाऱ्यात राहणाऱ्या वाड्या- वस्त्या यांना स्थलांतरित करण्याचे नियोजन करण्यात येईल. पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा नद्यांचे पाणी पावसाळयात वाढून पूर परिस्थिती उद्भवते. यासंदर्भात काहीतरी मार्ग काढण्यासाठी पाण्याचे नियोजन करण्याची गरज आहे, त्यादृष्टीने जल आराखडा तयार केला जाईल. ही आपत्ती इतकी मोठी होती की मदतीला त्याठिकाणी पोहताना जवानांना आणि पथकाला अडचणी आल्या. कारण सगळ्या सामुग्रीनिशी त्यांना बचाव कार्य करायचे होते. राज्य शासन आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी तयार होते. केंद्राने देखील सहाय्य केले, लष्कर, एनडीआरएफ सर्वांनीच मदत केली आहे, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.