तळिये, चिपळूणवासियांना दिला देवेंद्र फडणवीस यांनी धीर
नारायण राणे, प्रवीण दरेकरांसह केला कोकणचा दौरा
त्यानंतर चिपळूणमध्ये सुद्धा पुराने झालेल्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली. येथे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. बाजारपेठेतील स्थिती तर भयावह आहे. काहीच शिल्लक राहिलेले नाही. या सर्वांना तातडीने मदत देण्याची गरज आहे. राज्य सरकारने त्यांना तातडीने मदत द्यायला हवी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, या नागरिकांचे कागदपत्र सुद्धा पाण्यात वाहून गेली आहेत. त्यामुळे कागदपत्र नाहीत, हे गृहित धरून ही मदत करावी लागेल. कोल्हापूर-सांगलीच्या पुराच्या वेळी आपले सरकार असताना थेट रोखीने मदत देण्यात आली होती. नवीन घरे बांधून होत नाहीत, तोवर भाडे सुद्धा दिले होते. तशीच मदत आताही देण्यात यावी. तातडीच्या मदतीत निकषांचा विचार करायचा नसतो. निकषांनुसार भरीव मदत पुढच्या काळात होत राहील. अंगावर घालायला कपडे सुद्धा नागरिकांकडे नाहीत. सारेच वाहून गेले आहे. तीन ठिकाणी कम्युनिटी किचन भाजपाच्या वतीने सुरू करण्यात आले आहेत. वर्षभरात कोकणात ज्या घटना घडल्या आहेत, त्या पाहता थोडा वेगळा विचार येणार्या काळात करावा लागेल. आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने नव्या व्यवस्था उभ्या कराव्या लागतील आणि यादृष्टीने ‘रोडमॅप’ तयार करण्याची नितांत गरज आहे. अलमट्टीचा विसर्ग सुरू होतो, तेव्हा कर्नाटकात पूर येतो. त्यामुळे तेथे पूरस्थिती निर्माण होण्यापूर्वीच अतिरिक्त विसर्ग केला तर बरे होईल, अशी विनंती आम्ही मुख्यमंत्र्यांना केली आहे. थोडे धाडस करावे लागेल, असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.