झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्र्यांकडून शोक मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर जखमींवर मोफत उपचार
कोविड संसर्ग लक्षात घेऊन जम्बो केंद्रामधील रुग्ण तसेच इतर साधन सामुग्री यांची काळजी घ्यावी व सावध राहण्यास देखील मुख्यमंत्र्यांनी पालिकेस सांगितले आहे. पावसामुळे जिथे जिथे पाणी साचले आहे त्या ठिकाणी पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा व्यवस्थित कार्यान्वित करावी, रस्ते मोकळे करावेत , वाहतुकीवर परिणाम झालेला आहे. मात्र, लवकरात लवकर ती सुरळीत होईल असे पाहावे, रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी देखील रेल्वे वाहतूक कशी पूर्ववत होईल हे बघण्याच्या सुचना मुख्यमंत्र्यांनी आज प्रशासनाला दिल्या.
मुंबई दुर्घटनांमधील मृत्यूंबद्दल उपमुख्यमंत्र्यांकडून दु:ख व्यक्त
* मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर यंत्रणांना सतर्क राहून समन्वयाने काम करण्याचे निर्देश
* नागरिकांनी सुरक्षितताविषयक आवाहनांचे पालन करावे
* आपत्कालिन परिस्थितीत तात्काळ यंत्रणांशी संपर्क साधावा - उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबईतील चेंबुर व विक्रोळी परिसरात पावसामुळे भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनांबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले असून दुर्घटनेत मृत्यु पावलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांबद्दल सहसंवेदना व्यक्त केल्या आहेत. मृतांच्या कुटुंबियांना शासनातर्फे पाच लाख रुपयांची मदत व जखमींवर मोफत उपचार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे, अशी माहितीही उपमुख्यमंत्र्यांनी दिली. मुंबईतल्या चेंबुरच्या आरसीएफ परीसरातल्या भारतनगरमध्ये व विक्रोळी येथील दुर्घटनेच्या ठिकाणी एनडीआरएफ, अग्निशमन, महापालिका, पोलिस आदी यंत्रणांतर्फे तात्काळ बचाव व मदतकार्य सुरु करण्यात आले. अनेकांना ढिगाऱ्याखालून सुखरुप बाहेर काढण्यात बचावपथकांना यश आले. आपत्कालिन यंत्रणांकडून दुर्घटनास्थळीही तात्काळ बचावकार्य सुरु करण्यात आल्याची माहितीही उपमुख्यमंत्र्यांनी दिली. दुर्घटनेतील जखमींवर शासनामार्फत मोफत उपचार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मुंबई शहर व राज्यातील अनेक जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्कालिन यंत्रणांनी सतर्क राहून परस्पर समन्वयाने काम करावे. नागरिकांनीही सुरक्षितताविषयक नियम व संदेशांचे पालन करुन काळजी घ्यावी. आपत्कालिन परिस्थितीत तात्काळ पोलिस किंवा नजिकच्या शासकीय यंत्रणेशी संपर्क साधावा, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.
मुंबईत दरड कोसळण्याच्या घटना दुर्दैवी धोकादायक घरांतील रहिवाशांचे तातडीने स्थलांतर करण्याचे निर्देश -पालकमंत्री आदित्य ठाकरे
मुंबईत काल रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे चेंबूर, विक्रोळी, भांडुप आदी ठिकाणी काही घरांवर दरड कोसळल्याची घटना घडली. याची माहिती मिळताच मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी रात्रीच प्रशासनाकडून घटनेची सविस्तर माहिती घेतली. तसेच दुर्घटनेत अडकलेल्या नागरिकांसाठी तातडीने बचाव आणि मदत कार्य करण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला दिले. या घटनेत दुर्दैवी मृत्यू झालेल्यांच्या वारसांना राज्य शासनाच्यावतीने मुख्यमंत्री यांनी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर जखमींवर विविध रुग्णालयात मोफत उपचार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. नैसर्गिक आपत्तीच्या अशा प्रसंगी राजकारण न करता सर्वांनी एकत्र येऊन दुर्घटनाग्रस्तांना दिलासा देण्याचे आवाहन त्यांनी केले. दुर्घटनांची माहिती मिळताच पालकमंत्री ठाकरे यांनी चेंबूरमधील भारतनगर, विक्रोळी येथील सूर्यानगर, भांडुपमधील मुन्शी महल परिसर येथील घटनास्थळी भेट देऊन मदत कार्याचा आढावा घेतला. त्याचप्रमाणे जखमींवर तातडीने उपचार करण्याच्या सूचना दिल्या. या दुर्घटनेत मुत्यू पावलेल्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच परिसरातील रहिवाशांची भेट घेऊन त्यांनी शासनामार्फत सर्व त्या उपाययोजना करण्यात येत असल्याचे सांगितले.
यावेळी खासदार राहुल शेवाळे, आमदार रमेश कोरगावकर, सुनील राऊत, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर, स्थानिक नगरसेवक उमेश माने, निधी शिंदे, राजेश्वरी रेडकर, दीपमाला बडे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. ठाकरे यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले, रात्रीतून २०० मिमी पेक्षा जास्त पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी नैसर्गिक आपत्ती उद्भवली. दुर्घटनास्थळी पोहोचणे कठीण असतानाही बचाव पथकांनी अनेक अडचणींचा सामना करीत मदतकार्य सुरू केले आहे. दुर्घटनास्थळी धोकादायक अवस्थेत असलेल्या घरांचे इतरत्र स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मिठी नदीची पातळी वाढल्याने तेथेही किनाऱ्यावरील लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत असल्याचे ते म्हणाले. कमी वेळेत अधिक पाऊस पडत असल्याने मुंबईत ज्या ठिकाणी पाणी साचून समस्या निर्माण होतात तेथे पाणी वाहून नेण्याची क्षमता वाढविण्यावर भर दिला जात आहे. यासाठी पाणी साठवणाऱ्या मोठ्या भूमिगत टाक्या बांधल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. हवामान विभागाने मुंबई आणि किनारपट्टीच्या भागात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. हे लक्षात घेता रहिवाशांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन ठाकरे यांनी केले आहे.