कल्याण पूर्व येथे आज मोबाईल (व्हॅन) लसीकरण

 खडेगोळवली कल्याण पूर्व येथे आज मोबाईल (व्हॅन) लसीकरणाचा   - आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे शुभहस्ते शुभारंभ ! 

कल्याण प्रतिनिधी विनायक चव्हाण : आज कल्याण पूर्व येथील आय प्रभाग कार्यालय येथे मोबाईल (व्हॅन) लसीकरणाचा शुभारंभ महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे शुभहस्ते आणि वैदयकीय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील, साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील, वैदयकीय अधिकारी डॉ. वैशाली काशीकर यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. लोकसंख्येची जास्त घनता असलेल्या या भागात तुलनेने कमी लसीकरण झाले असल्यामुळे आज या परिसरापासून मोबाईल लसीकरणास सुरुवात करण्यात आली आहे. लोकांचा प्रतिसाद पाहून हळू हळू लसीकरणाचा टप्पा वाढविला जाईल, या भागातील जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण व्हावे, म्हणून ही सुविधा उपलब्ध करुन दिली असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यावेळी दिली.

       आय प्रभाग कार्यालयाजवळ तसेच जाईबाई विदया मंदिर, साई नगर, कल्याण पूर्व येथेही आज उप आयुक्त सुधाकर जगताप यांचे शुभहस्ते आणि वैदयकीय अधिकारी डॉ. संदिप निंबाळकर व डॉ. पूर्वा भानूशाली यांचे प्रमुख उपस्थितीत मोबाईल लसीकरणाची सुरुवात करण्यात आली. या लसीकरणासाठी 4 बसेस उपलब्ध करुन देण्यात आल्या असून 2 बसेस मध्ये लसीकरणाची सुविधा उपलब्ध असेल आणि उर्वरित 2 बसेस नागरिकांना लसीकरणानंतर देखरेखीखाली (Observation) ठेवण्यासाठी उपलब्ध राहतील. सदर दोन्ही ठिकाणी सुमारे 700 नागरिकांचे लसीकरण आज दिवसभरात केले जाणार आहे.

    महापालिकेच्या महात्मा फुले नागरी आरोग्य केंद्रातही आज धान्य बाजारातील माथाडी कामगारांसाठी विशेष लसीकरणाची सुविधा उपलबध करुन देण्यात आली. तेथे सुमारे 150 माथाडी कामगारांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८