संपादकीय,पोलिस तपास (सिद्धांत) एखादा दंडार्ह गुन्हा प्रत्यक्ष घडलेला असून तो अमुक एका व्यक्तीने केलेला आहे, हे सिद्ध करण्यासाठी न्यायालयात ग्राह्य ठरेल असा पुरावा जमा करणे, म्हणजेच गुन्ह्याचा तपास होय.
दंडार्ह गुन्हे दोन प्रकारचे असतात :
१.फिर्यादीच्या तक्रारीवरून वा
२. नुसती कुणकुण लागल्यावरून ज्याचा शोध पोलिस अधिकारी स्वतःच करू शकतात, त्या गुन्ह्यांना दखली किंवा पोलिस कक्षेतील गुन्हे म्हणतात.
ज्या गुन्ह्यांसाठी साधारणपणे सहा महिने वा त्यांहून अधिक सक्तमजुरीची सजा असते, असे भारताच्या फौजदारी व इतर कायद्यांत नमूद केलेले गुन्हे पोलीस कक्षेत येतात. इतर कित्येक गुन्ह्यांचा तपास दंडाधिकाऱ्याच्या हुकुमावाचून पोलिसांना करता येत नाही. फिर्यादीने तक्रार केल्याविना गुन्ह्याचा तपास करू नये, असा नियम प्राचीन काळी भारतात होता; पण चाणक्याने तो बदलून काही लोकांनी –उदा., ब्राह्मण, तपस्वी, वृद्ध, रोगी, स्त्रिया, मुले व अनाथ माणसे– फिर्याद केली नसली, तरीही पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध घडलेल्या गुन्ह्यांचा तपास करावा अशी आज्ञा दिली. गेल्या शतकापर्यंत पाश्चात्य राष्ट्रांत देखील फिर्यादीची तक्रार आल्यावाचून पोलिसांना गुन्ह्याचा तपास करता येत नसे.
गुन्ह्याची तपासणी म्हणजे न्यायालयात ग्राह्य ठरेल असा पुरावा गोळा करणे.
कोणत्या प्रकारचा पुरावा न्यायालयाने ग्राह्य मानावा, याविषयी निरनिराळ्या देशांत निरनिराळ्या काळी भिन्न भिन्न प्रथा रूढ होत्या. गुन्हा घडतानाच तो डोळ्यांनी पाहिलेले चार साक्षीदार मिळाल्यास गुन्हा घडला व तो विवक्षित व्यक्तीने केला असे मानावे, असा कायदा मध्ययुगीन इस्लामी राजवटीत असे. अर्थातच असे साक्षीदार मिळवणे, हाच त्या काळी गुन्ह्याच्या तपासाचा मुख्य उद्देश असे. ज्या देशात ब्रिटिश धर्तीवरची न्याययंत्रणा आहे, तेथे पोलिसांना फार मोठ्या प्रमाणावर पुरावा गोळा करावा लागतो. कारण आपण गुन्हा केलेला नाही, हे सिद्ध करण्याचे दायित्व आरोपीवर नसतेच. फिर्यादी पक्षाचा पुरावा वादातीत नसल्यामुळे आपण गुन्हा केल्याचे निःसंदेह सिद्ध झालेले नाही एवढेच आरोपीने निदर्शनास आणले, तरी त्याच्यावरील गुन्ह्याचा आरोप नाशाबीत ठरतो. आरोपी स्वतःच साक्षीदार म्हणून जबानी देण्यास पुढे आल्याखेरीज, फिर्यादी पक्षाला न्यायालयात आरोपीची उलटतपासणीही करता येत नाही. कोर्टाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतानाही खरी माहिती देण्याचे किंवा स्वतःचा गुन्ह्यांशी संबंध असल्याचे दर्शविणारी कोणत्याही स्वरूपाची कबुली देण्याचे बंधनही आरोपीवर नसते.
भारतासारख्या देशात तर आरोपीने पोलिसांसमोर गुन्हा कबूल केला असला, तरी त्याचा लेखी कबुलीजबाबही पुराव्यात ग्राह्य मानता येत नाही. उलट आधुनिक पाश्चात्य राष्ट्रांतील न्यायालयेदेखील आरोपीने पोलिसांपुढे दिलेला कबुलीजबाब पुरावा म्हणून ग्राह्य मानतात. फ्रान्ससारख्या काही देशात तर आपण गुन्हा केलेला नाही, हे सिद्ध करण्याचे दायित्व आरोपीवरही असते. भारतात मात्र गुन्हातपासणीच्या कामात स्वतंत्र पुरावा गोळा करण्यावरच अधिक भर द्यावा लागतो. कौटिल्याच्या वेळी आरोपीला साक्षीदारांसमक्षच प्रश्न विचारून गुन्ह्याची शहानिशा करून घेता येई. आरोपीने मागणी केल्यास पोलिसांच्या तपासाच्या कोणत्याही अवस्थेत त्याला केव्हाही वकिलाचा सल्ला घेता येतो. पुरातन काळी गुन्ह्याची कबुली मिळविण्यासाठी संशयिताला मारहाण करण्याचा मार्ग राजमान्य झालेला होता; पण आज मारहाण केल्याचे आढळून आल्यास उलट ती करणाऱ्या पोलिसालाच शिक्षा भोगावी लागते. तसेच आरोपीला पकडल्यानंतर फक्त चोवीसच तास पोलिस त्याच्याजवळ पूसतपास करू शकतात. त्यानंतरही पोलिसांना आरोपी पोलिसांच्या कैदेत रहावयास हवा असल्यास त्याला दंडाधिकाऱ्यापुढे हजर करून अधिक काळ पोलिस कैदेत ठेवण्याची मागणी मंजूर करून घ्यावी लागते. असल्या नानाविध तरतुदींपायी आज प्रत्यक्ष संशयिताजवळ पूसतपास करण्याचे महत्त्व भारतात तरी खूपच कमी झाले आहे. पुराव्याच्या कायद्यांचा गुन्ह्याच्या तपासणीवर मौलिक स्वरूपाचा परिणाम कसा होत असतो, याची साक्ष यावरून पटेल.
गुन्ह्याच्या तपासणीचे तीन प्रमुख भाग असतात :
(१) गुन्हा घडला आहे की नाही याची खात्री करून घेणे.
(२) तो घडला असेल, तर तो कोणी केला याचा शोध करणे.
(३) न्यायालयात ग्राह्य ठरेल, अशा प्रकारचा पुरावा गोळा करणे.
यासाठी तपासणी अधिकारी सर्वसाधारण शिक्षण, पोलिस कामगिरीचे प्रशिक्षण आणि अनुभव या तीनही गोष्टींत तरबेज असावा लागतो. गुन्हातपासणी हे शास्त्र आहे; तशीच ती एक कलाही आहे. हे शास्त्र पुरातन काळापासून विकास पावत आलेले आहे. गुन्ह्याच्या स्थळाचे सूक्ष्म निरीक्षण कसे करावे, साक्षीदारांचा शोध करून त्यांच्याजवळ पूसतपास कशी करावी, यांविषयी क्रिमिनल मॅन्युअलमध्ये देऊन ठेवलेल्या सूचना आजही उपयुक्त ठरतात. कित्येक संशयित केवळ भीतीने वा अन्य काही कारणांनी कबुलीजबाब देऊन मोकळे होतात. त्यांच्याबाबत कशा प्रकारची सावधगिरी बाळगायला हवी, याचे चाणक्याने केलेले विवेचन म्हणजे त्याच्या विद्वत्तेचा व प्रगाढ अनुभवाचा रोकडा दाखलाच होय. गुन्ह्याविषयी माहिती मिळविण्यासाठी गुप्तचरांचा उपयोग कसा करून घ्यावा, याचेही सविस्तर विवेचन अनेक ग्रंथांमध्ये पुस्तकांमधील क्रिमिनल कोर्टाच्या हायकोर्टाच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालांमध्ये केलेले आढळते. परिस्थितीजन्य पुराव्याच्या एका अंगाच्या दिशेने भारतीयांनी फारच मोठी प्रगती साधलेली होती.
माग काढण्याच्या या तंत्रात ते इतके निष्णात झालेले असत, की सामान्यांच्या दृष्टीला न दिसणाऱ्या वा दिसले तरी ओळखता न येण्याजोग्या पावलांच्या ठशांवरूनही ते खूप दूरपर्यंत माग काढू शकत. या निष्णात मागाऱ्यांची मोलाची मदत भारतातील बहुतेक सर्व पोलिस-दलांना अगदी परवापरवापर्यंत होत असे. चोराच्या अथवा अन्य गुन्हेगाराच्या शरीराच्या वासावरून माग काढण्यासाठी कुत्र्यांचा उपयोग केला जाऊ लागल्यापासून मात्र मागाऱ्यांचे महत्त्व ओसरले आहे.
परिस्थितीजन्य पुराव्याचे महत्त्व मात्र वाढतच चालले आहे.
गेल्या शतकापासून आरोपीचा, विशेषतः पोलीस अधिकाऱ्यांपुढे दिलेला, कबुलीजबाब पुरावा म्हणून ग्राह्य मानला जात नाही. आजकाल भारतीय न्यायालये साक्षीदारांनी सादर केलेल्या पुराव्यावरही तितकासा विश्वास ठेवण्यास तयार नसतात. त्यामुळे तर परिस्थितीजन्य पुरावा गोळा करणे, हेच गुन्ह्याच्या तपासाचे प्रमुख व अपरिहार्य अंग होऊन बसले आहे. गेल्या ५०–६० वर्षांत तपासणीच्या कार्याला वैज्ञानिक संशोधनानेही मोलाचा हात लावलेला आहे, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. जगातील प्रत्येक व्यक्तीचे किंबहुना प्रत्येक पदार्थाचे स्वतःचे असे खास वैशिष्ट्य असते. तसेच कोणत्याही दोन व्यक्ती अथवा वस्तू परस्परसान्निध्यात राहिल्यास त्या सान्निध्याचीही चिन्हे त्यांच्यावर उमटतात या दोन नियमांवरच प्राधान्याने गुन्हातपासणीस उपयुक्त ठरणारे वैज्ञानिक तंत्र आधारलेले आहे. प्रत्येक व्यक्तीच्या बोटांच्या टोकाच्या पेऱ्यांचे ठसे इतके अटळपणे भिन्न स्वरूपाचे असतात, की कोणत्याही दोन व्यक्तींचे ते ठसे सर्वस्वी सारखे कधीच असू शकत नाहीत.
माग काढणाऱ्या कुत्र्यांना शरीराचा वास ओळखता येतो.
कोणत्याही दोन व्यक्तींच्या अंगाचा दर्प सारखा असत नाही. यामुळे कुत्रे सुलभतेने वासावरून गुन्हेगारांचा माग काढू शकते.अंगाचा दर्प त्या त्या व्यक्तीच्या नित्योपयोगी कपड्यांना व वस्तूंनाही येत असतो. त्यामुळे गुन्हेगाराची चुकून मागे राहिलेली वस्तू वा त्यांच्या पावलांचे ठसेदेखील वासावरून माग काढण्यास उपकारक ठरतात. तसेच एकाच कारखान्यात एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर तयार झालेल्या वस्तू बाह्यतः जरी अगदी एकसारख्या दिसत असल्या, तरी त्यांत अतिसूक्ष्म फरक मुळातच राहून गेलेला असतो. त्या वस्तूंचा वापर जसजसा अधिक केला जातो, तसतसा हा फरकही वाढत जाऊन ठळक होत असतो.
प्रत्येक व्यक्तीचे हस्ताक्षरही वैशिष्ट्यपूर्ण असते.
वादविषय झालेले हस्ताक्षर विवक्षित व्यक्तीचे आहे की नाही, याचा निर्णय त्याच व्यक्तीने लिहिलेल्या दुसऱ्या एखाद्या मजकुराशी तुलना करून तज्ञांना चटकन करता येतो. कोणतीही व्यक्ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेली की नाही, याची पारख तिच्या पादत्राणांना चिकटून राहिलेल्या धुळीच्या कणांच्या आधारे होऊ शकते. कारण प्रत्येक ठिकाणचे धुलिकणही असेच वैशिष्ट्यपूर्ण असतात. गुन्ह्याच्या स्थळी आढळलेले धुळीचे कण संशयिताच्या पादत्राणांना चिकटलेल्या कणांशी ताडून पाहून ती व्यक्ती गुन्ह्याच्या जागी गेली होती का नाही, हे ठरविता येते. गुन्ह्याच्या जागी रक्त, केस इ. सापडल्यास त्यांचे पृथक्करण करून रक्त कोणत्या गटातील आहे, केस मानवाचे आहेत की पशूचे, मानवाचे असल्यास किती वयाच्या व्यक्तीचे इ. प्रकारचा निर्णय वैज्ञानिकांना देता येतो.
अलीकडे तर रक्त स्त्रीचे आहे की पुरुषाचे आहे, हेही ओळखता येऊ लागले आहे.
केस विवक्षित व्यक्तीचा आहे की नाही, हे अणुविज्ञानाच्या साहाय्याने निश्चित करता यावे, यासाठी अलीकडे डॉ. जर्व्हिस या कॅनेडियन शास्त्रज्ञाने संशोधन आरंभले असून त्यांचे काही प्राथमिक प्रयोग यशस्वीही ठरले आहेत. त्यांचे सर्व प्रयोग संपूर्णतया सफळ झाल्यास, बोटांच्या ठशांइतकाच केसांचाही उपयोग व्यक्तीची निश्चित ओळख पटविण्यासाठी करता येईल.
मोटार-अपघात झाल्यानंतर संबंधित ड्रायव्हर मोटार घेऊन फरारी झाला असला, तरी अपघातस्थळी मोटारीच्या ज्या भागाची धडक बसली असेल, त्याचा रंग, तेल इ. अंश सूक्ष्म प्रमाणात तेथे चिकटून राहिलेला असतोच. पुढे एखादी संशयास्पद गाडी आढळल्यास हे अंश तिच्या रंगाशी आणि तेलाशी वैज्ञानिक पद्धतीने ताडून पाहून, तीच मोटार अपघाताला कारण झाली की नाही, याचाही निश्चित निर्णय करता येतो. गुन्ह्यात पिस्तुलाचा वा बंदुकीचा उपयोग केलेला असल्यास गोळी व कधी कधी तिच्या मागचे टोपणही गुन्ह्याच्या स्थळी पडलेले आढळते. ती गोळी व टोपण विवक्षित हत्यारातून उडवलेली असू शकेल की नाही, हेही वैज्ञानिक परीक्षणाच्या साहाय्याने निश्चितपणे सांगता येते.
अगदी एखादे फाटके चिंधुक मिळाले, तरीही त्याची तुलना संशयिताच्या कपड्यांशी करता येते.
अशा प्रकारच्या असंख्य वस्तूंचे किंवा मागे राहिलेल्या सूक्ष्म अवशेषांचेही परीक्षण करणे शक्य असल्यामुळे गुन्ह्याच्या स्थळाचे पराकाष्ठेच्या बारकाईने निरीक्षण करणे, हा तपासणीतला एक अत्यंत महत्त्वाचा कार्यभाग ठरतो. याच दृष्टीने पोलीस-प्रशिक्षण संस्थांमधून या विषयाचे सांगोपांग शिक्षण देण्यात येत असते. पोलिस अधिकाऱ्यांना तपास करणे सुलभ व्हावे, म्हणून वैज्ञानिक साधनांवर आधारलेल्या आधुनिक गुन्हा-अन्वेषणाचे यथार्थ शिक्षण देण्यासाठी भारत सरकारने आता कलकत्ता येथे एक गुप्तचर-प्रशिक्षण-संस्थाही स्थापन केली आहे.
विभिन्न राज्यांतील अधिकाऱ्यांना या संस्थेत खास प्रशिक्षण दिले जाते.
प्रत्येक राज्याच्या गुन्हा अन्वेषण विभागात बोटांच्या ठशांचा संग्रह, विविध क्षेत्रातील तंत्रज्ञ, छायाचित्रे घेण्याची यंत्रणा अशा प्रकारची सर्व व्यवस्था सज्ज ठेवलेली असते. काही जिल्ह्यांतील पोलीस अधीक्षकांच्याही कार्यालयांत तज्ञ नेमलेले असतात. जवळजवळ प्रत्येक राज्यातील विवक्षित केंद्रात आता वासावरून माग काढणाऱ्या कुत्र्यांचीही व्यवस्था केलेली आहे. गुन्ह्याच्या तपासणीला उपकारक ठरणाऱ्या वैज्ञानिक प्रयोगशाळाही आता राज्यात उभारलेल्या आहेत. कित्येक मोठमोठ्या शहरांत गुन्ह्याच्या स्थळी तपासासाठी पोलीस अधिकाऱ्यांच्या जोडीला बोटांच्या ठशांचे तज्ञ व पोलीसदलाचे छायिचित्रकारही हजर असतात. खुनाच्या वा हाणामारीच्या गुन्ह्यात बळी पडलेल्या वा जखमी झालेल्या व्यक्तीची शवपरीक्षा करण्याची सोय प्रत्येक तालुक्याच्या शहरी उपलब्ध असते.
मृत्यू नैसर्गिक रीत्या आला की अनैसर्गिक, तो कशामुळे व साधारणतः कोणत्या वेळी आला, शवावर आढळलेल्या जखमा मृत्यूच्या पूर्वी झालेल्या आहेत की नंतर, त्या कशा प्रकारच्या हत्याराने झालेल्या असतील इ. माहिती शवपरीक्षेद्वारा मिळविता येते.सांगोपांग वैज्ञानिक परीक्षण पुरे झाल्यावर आणि मागारे वा कुत्रे यांनी योग्य माग काढल्यानंतर तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना थोडीबहुत उपयुक्त माहिती आणि साहाय्य मिळू शकते.साक्षीदार परिचित गुन्हेगाराची नावे सांगून टाकतो वा ते अपरिचित असल्यास त्याचे वर्णन तरी करतो. गेली काही वर्षे ‘आयडेंटी किट’ नावाचे नवे उपकरण अमेरिकेत वापरले जाते. त्यात अगदी पूर्ण पारदर्शक असलेल्या तबकड्यांवर नाना प्रकारच्या जिवण्या, नाके, डोळे, भुवया, पापण्या, दाढीमिशा, चष्मे, कान, केशरचना इत्यादींची वेगवेगळी चित्रे रेखाटलेली असतात. या किटमध्ये प्रत्येक अवयवाच्या निदान वीसपंचवीस तरी वेगवेगळ्या तबकड्या असतात. साक्षीदारांकडून अपरिचित गुन्हेगाराच्या वर्णनाचा सर्व तपशील गोळा केल्यावर त्याच्याशी जुळणाऱ्या सर्व अवयवांच्या तबकड्या व्यवस्थितपणे एकावर एक ठेवून संपूर्ण चेहेरा सिद्ध केला जातो.तो गुन्हेगाराच्या चेहेऱ्यासारखा असल्याचे आढळून आल्यास त्याची छायाचित्रे काढून ती सर्वत्र पाठविली जातात. हे उपकरण अजून नवीन असले, तरी त्याच्या साहाय्याने कित्येक गुन्हेगारांचा शोध लावण्यात यश लाभलेले आहे.एखादा गुन्हेगार माहितीतला नसेल, तर गुन्ह्यांच्या तंत्राविषयी जमा केलेल्या माहितीचाही उपयोग शोध लावताना होऊ शकतो. विशिष्ट पद्धतीने गुन्हा करण्यात एकदा यश आले, की गुन्हेगार नेहमीच त्या पद्धतीचा अवलंब करू लागतो.एका प्रकारच्या घरफोडीत लग्गा साधला, की चोर बहुधा त्याच प्रकारच्या घरफोड्या करण्यास प्रवृत्त होतात. त्या त्या गुन्हेगारांच्या काही विशिष्ट लकबी असतात. काही चोर चोरी केल्याबरोबर घरातल्या खाद्य पदार्थांवर तुटून पडून त्यांचाही फडशा उडवतात.कोणी चोहीकडे विड्यांची थोटके विखरून टाकतात. जिथे डाका घातला, तिथल्या स्त्रियांशी काही दरोडेखोर अत्यंत लीनतेने वागतात.
काहींचे साथीदारांना द्यायचे ठराविक इशारे असतात.
काहींनी आपली कार्यक्षेत्रे मर्यादित जागेपुरतीच आखलेली असतात. उदा., काही खिसेकापू कल्याण ते कर्जत या स्टेशनांच्या दरम्यान धावणाऱ्या स्थानिक गाड्यांतच प्रवाशांचे खिसे साफ करीत असतात. अशा प्रकारचे नानाविध गुन्हे नोंदून ठेवून, गुन्हेगारांनी अवलंबिलेली तंत्रे, त्यांच्या विशिष्ट सवयी आणि लकबी, त्यांची कार्यक्षेत्रे इत्यादींचे सूक्ष्म विश्लेषण करून गुन्हे व गुन्हेगार यांविषयीची समग्र माहिती प्रत्येक जिल्ह्यातील आणि राज्यातील गुन्हा-अन्वेषण शाखेत (मोडस् ऑपरँडी ब्यूरो) संगृहीत करून ठेवलेली असते. नव्याने घडलेल्या गुन्ह्यात अवलंबिलेल्या तंत्राची छाननी करून, त्याच पद्धतीने पूर्वी केलेल्या गुन्ह्यांचे तुलनात्मक निरीक्षण केल्यानंतर, ज्यांनी गुन्हा केला असा संशय दृढ होतो, त्या सर्वांची समग्र यादी तपासणी अधिकाऱ्याकडे रवाना करण्यात येते.अशा रीतीने गुप्तचर, बातमीदार आणि साक्षीदार यांच्याकडून मिळालेली माहिती, गुन्हे व गुन्हेगार यांच्या माहितीचा आधीच तयार करून ठेवलेला संग्रह, वैज्ञानिक तपासणीवरून निघणारी अनुमाने इत्यादींच्या समन्वयाने संशयित गुन्हेगार कोण असू शकेल, याचा सुलभतेने शोध घेता येतो. विज्ञानाची अशी परोपरीने मदत मिळत असूनदेखील गुन्हेगार माहितीतला नसला, तर गुन्ह्याच्या तपासाचे काम बिकटच ठरते. गुन्ह्याच्या स्थळी बोटांचे ठसे मिळाले, तरी अन्वेषण खात्यातील संग्रहात तसलाच ठसा न आढळल्यास गुन्हेगाराचा माग लवकर लागत नाही.आधी अटक झालेल्या वा शिक्षा भोगलेल्या व्यक्तीचेच ठसे सामान्यतः संगृहीत करून ठेवलेले असतात.
देशातील एकूण एक नागरिकांच्या बोटांचे ठसे घेऊन ठेवण्याची प्रथा कुठेच अस्तित्वात नाही.
गुन्हेगाराचे रक्त, केस वा कपड्याची चिंधी गुन्ह्याच्या जागी सापडली, तरी प्रत्येक गुन्हेगाराचा पत्ता लागेपर्यंत या वस्तूंची तुलना त्याच्या तसल्याच वस्तूंशी करता येत नाही. अशा परिस्थितीत प्रत्येक संशयिताचे ठसे व वस्तू तुलनेसाठी वापरून संशयाची शहानिशा करून घेणे अटळ ठरते. परंतु निरपराध व्यक्तीवरील संशयाचा मात्र त्यामुळे निरास होतो.आधुनिक युगात दळणवळणाच्या साधनांत अपूर्व क्रांती झाल्यामुळे, गुन्हेगार तडकाफडकी कोणते तरी वाहन पकडून निसटून जातात. त्यांचा पाठलाग करण्यासाठी आणि दूरवर पळून गेलेल्या गुन्हेगारांची तेथील स्थानिक पोलिसांना माहिती पुरविण्यासाठी बिनतारी यंत्राचा (वायरलेस) चांगला उपयोग होतो.
शहरातील पोलीस दलांना आधुनिक वाहने पुरविण्यात येतात.
या वाहनांवरही बिनतारी संदेशवाहक यंत्रे बसविलेली असतात. त्यामुळे एका वाहनातील पोलिसांना दुसऱ्या वाहनातील पोलिसांशी संपर्क साधता येतो आणि पाठलागाचे काम सुलभ होते. जिल्ह्याजिल्ह्यांतून बिनतारी संदेश पाठवण्यासाठी केंद्रे असतात. त्यामुळे देशाच्या सर्व विभागांशी संपर्क साधता येतो. आधुनिक दळणवळणाच्या सोयींमुळे अनेक गुन्हेगार निरनिराळ्या देशांत जाऊन गुन्हे करू शकतात. अशा आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांची जंत्री व त्यांच्या कार्यपद्धतीची नोंद करण्यासाठी चालू शतकाच्या सुरुवातीला आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना (इंटरपोल) स्थापन झाली. ह्या संघटनेची मुख्य कचेरी पॅरीस येथे आहे.
जगातील बहुतेक सर्व देशांतील पोलीस संघटना इंटरपोलच्या सभासद आहेत.
इंटरपोलचे अधिकारी प्रत्यक्ष तपास करीत नाहीत. सर्व देशांत परकी नागरीकांनी केलेले गुन्हे व त्यांच्या गुन्हापद्धती यासंबंधीच्या माहितीचे संकलन आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगार टोळ्यांच्या सदस्यांच्या हालचालींच्या नोंदी ठेवणे, हे इंटरपोलचे प्रमुख कार्य असते. त्यासाठी देशादेशांतील पोलीस संघटनांशी सतत संपर्क ठेवला जातो. यामुळे आंतरराष्ट्रीय टोळीचे सदस्य आपल्या देशात आल्याची वर्दी कित्येकदा ताबडतोब मिळते आणि त्यांच्या हालचालींवर सतत देखरेख ठेवणे शक्य होते.इंटरपोलच्या सहकार्याने एका देशात गुन्हा करून, दुसऱ्या देशात पळून गेलेल्या फरारी गुन्हेगारांना पकडणे सुलभ होते.१९६६ साली आंतरराष्ट्रीय चोरटा व्यापार करणाऱ्या टोळीचा प्रमुख वॉलकॉट यास पकडण्याच्या कामी मुंबई पोलिसांना इंटरपोलची मदत मिळाली होती.साक्षीदारांजवळ व अन्य व्यक्तीकडे पूसतपास करण्याची कलाही गुन्हाशोधविज्ञानाइतकीच महत्त्वाची आहे. याही कलेत आता खूप प्रगती झालेली आहे. पूसतपास करण्याच्या कलेविषयी आता कित्येक तज्ञांप्रमाणेच यशस्वी ठरलेल्या पोलिस अधिकाऱ्यांनीही आपापल्या सूचना ग्रथित करून ठेवलेल्या आढळतात. पण प्रत्यक्ष अनुभवाविना केवळ अशा पुस्तकांच्या अध्ययनानेच ही कला साध्य होणे, दुरापास्तच आहे.
भारतासारख्या बहुभाषिक देशात दर पाच कोसांवर भाषा बदललेली दिसते. निरनिराळ्या जातींचे व धर्मांचे लोक विवक्षित शब्द वेगवेगळ्या अर्थांने वापरताना दिसतात. भिन्न स्तरांतील लोकांची बोलभाषाही भिन्नच असते. गुन्हेतपासणी अधिकाऱ्यांना या भाषिक विविधतेची यथार्थ माहिती असावी लागते. प्रचलित समाजजीवनाचीही उत्तम माहिती असणे आवश्यक ठरते. तात्पर्य, तपासणी अधिकारी बहुश्रुत व स्थानिक रीतिरिवाज, समाजजीवन आणि भाषाभेद यांचा बारकाव्याने अभ्यास केलेला नसेल, तर तो यशस्वी होणार नाही. त्याला लबाडीची द्व्यर्थी उत्तरे देऊन साक्षीदार व संशयित व्यक्ती सहज फसवू शकतात.गेली तीसचाळीस वर्षे काही अमेरिकन पोलीस अधिकाऱ्यांनी पॉलिग्राफ वा लाय डिटेक्टर वापरण्याची प्रथा पाडली आहे. रक्ताचा दाब, घामाचे प्रमाण, नाडीच्या ठोक्यांची गती इत्यादींची नोंद करण्याची व्यवस्था या उपकरणात असते. बेदिक्कतपणे खोटे बोलताना माणसाचा श्वासोच्छवास, रुधिराभिसरण, रक्तदाब, हृदयाचे स्पंदन इ. प्रक्रियांत पराकाष्ठेचे बदल होत असतात. पूसतपास करताना या यंत्राचे साहाय्य घेतल्याने कोणती उत्तरे खोटी व कोणती खरी हे समजू शकते; पण हे यंत्र वापरण्यास संशयिताची खुषीची संमती असावी लागते. या उपकरणाने केलेल्या नोंदी न्यायालयात पुरावा म्हणून ग्राह्य मानल्या जात नाहीत. कारण शारीरिक प्रक्रियांत असत्यकथनासारखेच अन्य कारणांमुळेही परिवर्तन घडून येत असल्याने, शारीरिक प्रक्रियांतील परिवर्तनांची नोंद निर्विवाद पुरावा म्हणून ग्राह्य मानता येत नाही. आजच्या युगात समाजरचनेत अधिकाधिक गुंतागुंत निर्माण होत चाललेली आहे. दळणवळणाच्या साधनांत घडून आलेल्या क्रांतीमुळे गुन्हेगार दूरदूरच्या ठिकाणी जातात आणि गुन्हे करून चटकन परत येतात. मोठ्या शहरांतील दाट वस्तीत ते गुन्हा केल्यानंतर सुलभतेने अदृश्य होऊ शकतात. यामुळे गुन्ह्याच्या तपासणीत एकटादुकटा अधिकारी यश मिळवू शकत नाही. कधीकधी तर खूपच मोठ्या पोलीस दलाचा उपयोग करून घ्यावा लागतो. दूरदूरच्या पोलीस दलांचे साहाय्य मागावे लागते व सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जनतेचेही सहकार्य मिळवावे लागते. लोकांनी गुन्ह्यांची वा गुन्हेगाराची स्वतःला असलेली माहिती तपासनिसांना सादर केल्याविना तपास परिपूर्ण होऊच शकत नाही. कित्येकदा तर तपासणी अधिकाऱ्यांच्या ध्यानीमनीही नसलेल्या व्यक्तीला गुन्ह्याची माहिती असते. पाश्चिमात्य देशांतील बहुसंख्य नागरिक आपण होऊन पोलिसांना माहिती देतात; पण भारतीय जनता व पोलीस यांच्यात मात्र अशी परस्परविश्वासाची भावना अजूनदेखील निर्माण झालेली नाही.वैज्ञानिक पद्धतीने गुन्ह्यांचा शोध करण्यात भारताने गेल्या पंचवीस वर्षांत खूपच प्रगती केली आहे.
आधुनिक साधने आणि वैज्ञानिक तंत्र यांच्या मोठ्या शहरांतून सर्रास उपयोग केला जात आहे.
महाराष्ट्र राज्यातील मुंबई, पुणे यांसारख्या शहरांच्या पोलीस दलांनी तर गुन्ह्यांचा तपास करण्याच्या कार्यात विशेष तत्परता व कार्यक्षमता प्रकट केली आहे. या क्षेत्रात मुंबई पोलीस दलाने तर समग्र भारतात अग्रस्थानाचा मान पटकावलेला आहे.जसजसे विज्ञान प्रगत होत जाईल, तसतसा त्याचा गुन्हातपासणीच्या कामात अधिकाधिक उपयोग करता येईल. त्या दृष्टीने तपासणी अधिकाऱ्यांना विज्ञानाने उघडलेल्या नव्या नव्या दालनांची तर माहिती उपलब्ध करून द्यायला हवीच; पण त्याच्या जोडीला विज्ञानाचा कुठे व कसा उपयोग करून घेता येतो, हेही त्यांच्या निदर्शनास आणायला हवे. वैज्ञानिक तपासणी करून निर्णय देण्याचे काम फक्त तज्ञच करू शकणार. पोलीस अधिकारी ते काम करू शकत नाहीत. उलटपक्षी वैज्ञानिक परीक्षण करून दोन नमुने एकसारखे आहेत की नाहीत याचा निर्णय देण्यापलीकडे जास्त दायित्व तज्ञांनाही स्वीकारता येत नाही. गुन्ह्याच्या जागेची सूक्ष्मपणे पाहणी करून तेथील नमुने मिळविणे, तपास करताना गुन्हेगार वा संशयित व्यक्तीचा शोध काढून दुसरा तसाच नमुना जमा करणे, ही कामे केवळ अनुभवी व कार्यक्षम पोलीस तपासनीसच वा त्यांचे सहकारी करू शकतात. म्हणूनच गुन्ह्यांच्या तपासाच्या कामात वैज्ञानिक आणि तपासणी अधिकारी या दोघांचेही महत्त्व सारखेच आहे. वि. वा. येलवे वकील उच्च न्यायालय-८८९८३४३२८९