माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्थांना राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान पुरस्कार देऊन गौरविणार - माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री सतेज पाटील
मुंबई प्रतिनिधी : राज्याची माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उपक्रमशीलता वाढवणे,उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या माहिती तंत्रज्ञान समुहांना सन्मानित करून समाजात त्यांची ओळख निर्माण करणे,समाजात माहिती तंत्रज्ञानाचा गतिमान वापर होण्यासाठी प्रोत्साहन देणे,माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन अधिकाधिक रोजगार निर्मिती करण्यावर भर देणे,माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून पर्यावरणाचे जतन व संवर्धन करणे अशा विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्थांना राज्य शासनाच्या वतीने राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती,माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी डी पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आयटी इंजिनियरींग सर्व्हिस सॉफ्टवेअर, आयटी एनेबल्ड सर्व्हिस (बीपीओ/केपीओ), आयटी इंफ्रास्ट्रक्चर (डेटा सेंटर), मोस्ट प्रॉमिसींग स्टार्टअप आणि स्पेशल अवार्ड फॉर कॉन्ट्रीब्युशन टु महाराष्ट्र अशा 5 विभागात या पुरस्कारांची निवड होणार असल्याची माहिती राज्यमंत्री पाटील यांनी दिली.पुरस्कार मानचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
पुरस्कारांचे वेळापत्रक
यावर्षीचे पुरस्कारांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे असेल.२० ऑगस्ट, २०२१ रोजी नामांकनासाठी अर्ज दाखल करण्याची जाहिरात प्रसिध्द करण्यात येणार असून १५ सप्टेंबर, २०२१ ही नामांकन दाखल करण्याची अंतिम तारीख असेल.२७ सप्टेंबर, २०२१ रोजी प्राप्त अर्जाची छाननी करण्यात येईल.३० सप्टेंबर, २०२१ रोजी छाननी समितीची प्राथमिक बैठक होईल तर २० ऑक्टोबर, २०२१ छाननी समितीची अंतिम बैठक होईल. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुरस्कारांची घोषणा करण्यात येईल व पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात येईल,अशी माहितीही राज्यमंत्री पाटील यांनी दिली. देशाच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी विज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर हा आधुनिकीकरणाचा केंद्रबिंदू आहे. स्व.राजीव गांधी यांनी विज्ञान व तंत्रज्ञानाचा, माहिती तंत्रज्ञानाचा प्रसार व राष्ट्रीय विकासातील त्याचा परिणामकारक वापर करण्यावर भर दिला होता. त्यामुळेच दरवर्षी. 20 ऑगस्ट हा माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांचा जन्मदिवस माहिती तंत्रज्ञान दिवस म्हणून राज्य सरकारकडून साजरा करण्यात येतो.