राज्य बाल न्याय नियमानुसार निवड समिती गठीत

मुंबई प्रतिनिधी : जिल्हा स्तरावरील वैधानिक स्वरुपाच्या बाल कल्याण समितीवर अध्यक्ष, सदस्य आणि बाल न्याय मंडळावर सदस्यांच्या नेमणुकीकरिता राज्य शासनास शिफारस करण्यासाठी मा.उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती डॉ. शालिनी शशांक फणसाळकर- जोशी यांच्या अध्यक्षतेखाली तीन वर्षासाठी निवड समिती गठीत करण्यात आली आहे, अशी माहिती  महिला व बाल विकास आयुक्त राहुल मोरे यांनी दिली आहे.

            दिनांक २३ जुलै २०२१ रोजीच्या अधिसूचनेनुसार महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम २०१८ च्या नियम ९०(१) मधील तरतुदीनुसार ही निवड समिती गठित करण्यात आलेली आहे. सदर समितीवर अध्यक्षपदी डॉ. फणसाळकर- जोशी तर सदस्य म्हणून अनिरुद्ध पुरुषोत्तम पाटील, गजानन नामदेव मुंढे, निर्मला सांमत-प्रभावळकर, विकास रावजी सावंत, राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, मुंबई आणि महिला व बाल विकास आयुक्त, पुणे असे एकूण ६ सदस्य आहेत. समिती बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, २०१५ (२०१६चा २) मधील तरतुदीनुसार जिल्हा स्तरावरील वैधानिक स्वरुपाच्या बाल कल्याण समितीवर अध्यक्ष, सदस्य आणि बाल न्याय मंडळावर सदस्यांच्या नेमणूकी करिता राज्य शासनास शिफारस करणार आहे.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८