करोनामुळे मृत्यू पावलेल्या पालकांच्या अपत्यांसाठी मुक्त विद्यापीठाने केले शिक्षणक्रम शुल्क माफ - डॉ. ई. वायुनंदन, कुलगुरू !
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे ऑनलाईन प्रवेश सुरु !
शैक्षणिक वर्ष २०२१ -२२ च्या प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन बैठक आज ठाणे जिल्ह्यातील आनंद विश्व गुरूकुल रात्र महाविद्यालय, ठाणे येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी ठाणे जिल्ह्यातील अभ्यासकेंद्र प्रतिनिधींना मार्गदर्शन करताना डॉ. वामन नाखले म्हणाले, मुक्त विद्यापीठातील विविध विद्याशाखांचे प्रवेश एक जुलैपासून सुरू आहेत. एम.बी.ए. प्रवेशपरीक्षेचीप्रक्रीया सुरू झाली आहे. त्यात नोंदणी प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना लगेच सराव प्रवेशपरीक्षाआणि त्यानंतर मुख्य प्रवेश परीक्षा देता येते. विद्यापीठातर्फे सुरूअसलेल्या शिक्षणक्रमांमध्ये ४१ प्रमाणपत्र, ३७ पदविका, १६ पदवी आणि १४ पदव्युत्तर पदवी स्तरावरील शिक्षणक्रमांचा समावेश आहे.
एम. ए. (मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, लोकप्रशासन, अर्थशास्त्र) एम. लिब.,
एम. एस्सी. (गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, पर्यावरणशास्त्र),
एम. कॉम, एम.बी.ए., एम. ए.(शिक्षणशास्त्र), एम.सी.ए. या पदव्युत्तर पदवींचा समावेश आहे.
ग्रंथालय व माहितीशास्त्र, जनसंज्ञापन व वृत्तपत्रविद्या यासारख्या व्यावसायिक शिक्षणक्रमाबरोबरच
मराठी व उर्दू माध्यमातील कला शाखेतील पदवी, बी. कॉम.(मराठी व इंग्रजी माध्यम), बी. कॉम (सहकार व्यवस्थापन). बी.बी.ए., बी.एस्सी.(गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र),
बी.बी.ए.(बिझनेस प्रोसेस मॅनेजमेंट), बी.एस्सी.(कंप्युटर सिस्टिम ॲडमिनिस्ट्रेशन) या पदवी
शिक्षणक्रमांबरोबरच शालेय व्यवस्थापन, लॅब टेक्निशियन, योगशिक्षक, इंटीरियर डिझाईन अँड डेकोरेशन, इलेकट्रिशियन अँड डोमेस्टिक ॲप्ली.मेटेनन्स, सिव्हील सुपरवायझर, ॲनिमेशन, कृषी अधिष्ठान,संमंत्रक प्रशिक्षण यासारख्या अनेक पदविका शिक्षणक्रमांचे ऑनलाईन प्रवेश सुरु आहेत.
या शिवाय विद्यापीठाचे जर्मन, फ्रेंच, अरेबिक या भाषांमधील प्रमाणपत्र शिक्षणक्रमांसह 20 पेक्षा जास्त प्रमाणपत्र अभ्यासक्रम लोकप्रिय ठरत आहेत. 30 सप्टेंबर पूर्वी या शिक्षणक्रमांना जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा असे आवाहन कुलसचिव- डॉ. दिनेश भोंडे,संचालक विद्यार्थी सेवा विभाग- डॉ. प्रकाश देशमुख व शैक्षणिक सल्लागार- डॉ. वामन नाखले यांनी केले आहे.
चौकटीतील बातमी – डॉ. वामन नाखले म्हणाले, या शैक्षणिक वर्षापासून विज्ञान शाखेतील पदविका आणि पदव्युत्तर पदवीचे शिक्षणक्रम तसेच, उर्दू माध्यमातील पदव्युत्तर पदवी शिक्षणक्रम यूजीसीच्या मान्यतेने सुरु केले जात आहेत. तसेच, प्रशासकीय सेवांकडे विद्यार्थ्यांचा वाढता कल लक्षात घेऊन लोक प्रशासनाचा पदव्युत्तर पदवी शिक्षणक्रमही सुरू केला आहे. सहयोग आणि विशेष उपक्रम केंद्राद्वारे अनेक रोजगाराभिमुख प्रमाणपत्र आणि पदविका शिक्षणक्रमांचे आयोजनही विद्यापीठाने सुरू केले आहे. त्याला उत्तम प्रतिसाद लाभत आहे. कोरोनाच्या महामारीमुळे ज्यांच्या पालकांचे निधन झाले आहे, अशा विद्यार्थ्याना मा. कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन यांनी प्रवेशशुल्क माफ केले आहे. अशा विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहनही डॉ. नाखले यांनी यावेळी केले. राज्यातील बंदिजनांसाठी विविध प्रमाणपत्र, पदविका आणि पदवी शिक्षणक्रम पूर्णतः मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहेत आणि त्याचा लाभही राज्यभरातील 11 कारागृहांतील बंदीजन घेत आहेत. मुंबईमधील 4 कारागृहांमधील बंदीजन विद्यापीठाचे विद्यार्थी असून त्यांतील काही पदवीधर होऊन कारावास संपल्यावर सामान्य जीवन जगत आहेत. विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानावर आधारित शैक्षणिक सेवा, सुविधा पुरविण्यावर भर देणार. प्रवेशापासून परीक्षेपर्यंत सर्व प्रक्रिया ऑनलाईन पद्दतीने असल्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीने शिक्षणक्रम पूर्ण करता येतात. विद्यापीठाचे अध्ययन साहित्य ई-बुक्स स्वरूपात विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यावेळी विद्यापीठाच्या मुंबई विभागीय केंद्राचे सहायक कुलसचिव तुळशीराम सोनावणे, प्रशासकीय संयोजिका जान्हवी करमासे आणि वरिष्ठ सहायक रागिणी पाटील आणि ठाणे जिल्ह्यातील अभ्यासकेंद्रांचे केंद्रप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तुळशीराम सोनवणे यांनी केले तर सूत्रसंचालन जान्हवी करमासे यांनी केले. या प्रसंगी आनंदविश्व गुरूकुल रात्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. हर्षला लिखिते आणि ज्येष्ठ पत्रकार शशिकांत कोठेकर यांचे मार्गदर्शनही याप्रसंगी उपस्थितांना लाभले. शारदा एज्युकेशन सोसायटीचे सचिव आणि प्रसिद्ध इतिहासकार डॉ. प्रदीप धवल यांच्याही शुभेच्छा या कार्यक्रमासाठी लाभल्या.
आपल्या आवडत्या शिक्षणक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी सविस्तर माहितीसाठी विद्यापीठाच्या http://ycmou.digitaluniversity.ac अथवा www.ycmou.ac.in या संकेतस्थळांना भेट द्यावी किंवा मुंबई विभागीय केंद्राच्या खालील पत्त्यावर चौकशीसाठी संपर्क साधावा असे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे. य.च.म.मु.वि. चे विभागीय कार्यालय मुंबई.