नागपूरला डॉ.उज्वला चक्रदेव तर डॉ.दिलीप मालखेडे अमरावती येथे कुलगुरू म्हणून नियुक्त

डॉ.उज्वला चक्रदेव यांची नाथिबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या कुलगुरूपदी  नियुक्ती

मुंबई प्रतिनिधी : नागपूर येथील मनोरमाबाई मुंडले कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या प्राचार्या  डॉ. उज्वला शिरीष  चक्रदेव यांची श्रीमती नाथिबाई दामोदर ठाकरसी (एसएनडीटी) महिला विद्यापीठाच्या  कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी  शनिवारी (दि.  11 सप्टें)  डॉ. उज्वला चक्रदेव यांची पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी नियुक्ती जाहीर केली. डॉ. उज्वला चक्रदेव  (जन्म 27.08.1962 ) यांनी  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठाच्या व्हीआरसीई येथुन वास्तुविद्याशास्त्र  ही पदवी प्राप्त केली व त्यानंतर शहर नियोजन या विषयात एम. टेक. तसेच वास्तुविद्याशास्त्र शिक्षण या विषयात पीएच.डी. प्राप्त केली. डॉ. उज्वला चक्रदेव यांनी मनोरमाबाई मुंडले कॉलेज ऑफ आर्किटेक्चर येथे प्राध्यापक, प्राचार्य व पीएच.डी. पर्यवेक्षक म्हणून काम केले असून त्यांना अध्यापन, संशोधन व प्रशासन क्षेत्रात एकंदर 36 वर्षांचा अनुभव लाभला आहे.

    एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या   कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी  यांचा  कार्यकाळ 2 जूलै 2021  रोजी संपल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांचेकडे त्यांच्या पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. कुलगुरू नियुक्तीसाठी राज्यपालांनी  छत्तिसगड उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमुर्ती न्या. यतिंद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू निवड समिती गठित केली होती. पुणे येथील आयआयआयटीचे  महासंचालक डॉ. अनुपम शुक्ला व राज्याचे प्रधान सचिव ओमप्रकाश गुप्ता हे समितीचे अन्य सदस्य होते. समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी डॉ. उज्वला चक्रदेव यांची कुलगुरुपदी नियुक्ती केली.

डॉ.दिलीप मालखेडे यांची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती

  पुणे येथील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे यांत्रिकी अभियांत्रिकी विषयाचे प्राध्यापक असलेल्या डॉ. दिलीप नामदेवराव मालखेडे यांची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी शनिवारी (दि. 11) डॉ. मालखेडे यांची पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी नियुक्ती केली. डॉ. मालखेडे सध्या अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद येथे सल्लागार  - 1 या पदावर प्रतिनियुक्तीवर काम करीत आहेत. माजी कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांचा कार्यकाळ दिनांक 1 जून 2021 रोजी संपल्यामुळे हे कुलगुरूपद रिक्त होते. डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विलास भाले यांचेकडे पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. डॉ. दिलीप मालखेडे (जन्म 27 ऑगस्ट 1966) यांनी अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून बीई  व एमई  प्राप्त केली. त्यांनी आयआयटी  मुंबई येथून पीएच. डी  प्राप्त केली असून त्यांना प्रशासन, संशोधन व अध्यापनाचा व्यापक अनुभव आहे.

कुलगुरू नियुक्तीसाठी राज्यपालांनी प्रो जगमोहन सिंह राजपुत, निवृत्त महानिदेशक, एनसीईआरटी यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत केली होती. आयआयटी (बनारस हिंदू विद्यापीठ) वाराणसी येथील संचालक प्रमोद कुमार जैन व राज्य शासनाचे प्रधान सचिव ओम प्रकाश गुप्ता समितीचे अन्य सदस्य होते. समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी प्रो. मालखेडे यांच्या नियुक्तीची घोषणा केली.

ॲड.दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८