जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सुसज्ज व प्रशस्त इमारतीचे लोकार्पण

नवीन वास्तूची स्वच्छता राखण्याबरोबरच महसूल प्रशासनाने अधिक पारदर्शक व गतिने काम करावे -महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

धिकारी व कर्मचाऱ्यांनी नागरिकांशी आपुलकीने वागावे -पालकमंत्री हसन मुश्रीफ

हमदनगर प्रतिनिधी (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हाधिकारी कार्यालयाची नवीन इमारत अतिशय सुसज्ज व प्रशस्‍त आहे. या वास्तूची स्वच्छता व निगा राखण्याबरोबरच महसूल प्रशासनाने अधिक पारदर्शक व गतिमानतेने काम करावे. असे आवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.  ग्रामविकास व कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी दृकश्राव्य चित्रफीतीच्या माध्यमातून कार्यक्रमास शुभेच्छा संदेश दिला. यावेळी मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख  जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले पाटील महापौर  रोहिणी शेंडगे खासदार सदाशिवराव लोखंडे आमदार डॉ.सुधीर तांबे आमदार बबनराव पाचपुते आमदार लहू कानडे पद्मश्री पोपटराव पवार राहीबाई पोपरे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर पोलीस अधीक्षक मनोज पाटील उपस्थित होते.महसूल मंत्री थोरात म्हणाले जनतेचा आणि लोकप्रतिनिधींचा सर्वाधिक संबंध जिल्हाधिकारी कार्यालयाशी येत असतो.  लोकप्रतिनिधी व जिल्हाधिकारी कार्यालयाचे अत्यंत जिव्हाळ्याचे नाते असते. अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत राज्यातील सर्वाधिक चांगली इमारत झाली आहे. महसूल मंत्री असताना सन २०१४ मध्ये माझ्या हस्ते या इमारतीचे भूमिपूजन झाले. आणि आता महसूलमंत्री असताना माझ्या उपस्थितीत इमारतीचे उद्घाटन होत आहे. ही बाब आनंददायी आहे.

सुंदर वास्तूची स्वच्छता चांगली राखण्यासाठी दक्षता घेतली पाहिजे

    लोकांचे प्रश्न पारदर्शकपणे व विनाविलंब सुटले तर शासनाची समाजामध्ये  चांगली प्रतिमा निर्माण होते. 'कोरोना'च्या दोन्ही लाटेत सर्वच शासकीय विभागांनी चांगले काम केले‌ पण सर्वाधिक जबाबदारीचे काम जिल्हाधिकारी यांना करावे लागते, ते त्‍यांनी सक्षमपणे केले असेही  थोरात यांनी सांगितले.थोरात म्हणाले कोरोनाकाळात देशात सर्वाधिक चांगले काम महाराष्ट्र शासनाने केले आहे. निती आयोगाने सुद्धा महाराष्ट्र शासनाचे चांगल्या कामांचे कौतुक केले आहे. तिसऱ्या लाटेचा धोका वाढत आहे, या पार्श्वभूमीवर सर्वांनी काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

    महसूल विभाग अधिक पारदर्शक व गतिमान झाला पाहिजे. यासाठी आँनलाईन कामकाजावर भर आहे. महसूल विभागाने दीडकोटी लोकांना ऑनलाईन सातबारा दिला आहे. 'ई-पीक पाहणी' अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे‌‌. या उपक्रमाचे देशभर अनुकरण होईल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. अहमदनगर मध्ये २१ हजार लोकांनी 'ई-पीक पाहणी' केली आहे. 'ई-पीक पाहणी' मधून कोणतं पीक कुठे व किती प्रमाणात घेतले जाते ते नेमकेपणाने समजणार आहे.कर्जमाफीचा निर्णय शासनाने घेतला. गेल्या काळात अनेक नैसर्गिक संकटांचा आपण सर्वांनी सामना केला आहे.  चक्रीवादळ अतिवृष्टी महापूर व कोरोना या प्रत्येक नेसर्गिक आपत्तीत शासन सर्वसामान्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. जेथे जेथे नागरिक अडचणीत आले तेथील लोकांसाठी शासनाने काम केले. शासनाची बांधिलकी सर्वसामान्य जनतेशी आहे.

पालकमंत्र्यांचा दृकश्राव्य चित्रफितीद्वारे कार्यक्रमास शुभेच्छा संदे

    दृकश्राव्‍य चित्रफित संदेशात पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की  नवीन वास्तूचे पावित्र्य सर्वांनी जपले पाहिजे. यासाठी इमारतीची आणि परिसराची स्वच्छता व निगा नियमितपणे राखली गेली पाहिजे. जनतेची कामे विनाविलंब झाली पाहिजे तसेच जनतेला आपल्या कामासाठी वारंवार कार्यालयात येण्याची गरज पडता कामा नये. लोकांना दिलासा मिळाला पाहिजे. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नागरिकांशी  सौहार्दाने व आपुलकीने वागले पाहिजे. जिल्हाधिकारी कार्यालयाची भव्य दिव्य अशी इमारत शहराच्या वैभवामध्ये भर टाकणारी आहे. या इमारतीचे आत लोकार्पण होत असल्याचा आनंद होत आहे. या अद्ययावत अशा इमारतीमध्ये उत्कृष्ट सभागृह बांधण्यात आले आहे.मृद व जलसंधारण मंत्री गडाख म्हणाले राज्यात आदर्श ठरेल अशी जिल्हाधिकारी कार्यालयाची वास्तू झाली आहे. या सुसज्ज इमारतीत अनेक शासकीय कार्यालयांना कार्यालयासाठी जागा मिळू शकणार आहे. आपत्तीच्या काळात महसूल विभागाकडून अधिक गतिमान सेवा मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

    यावेळी नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त गमे म्हणाले नवीन वास्तूच्या माध्यमातून जिल्ह्यातील जनतेसाठी विकासाचे कार्यक्रम राबविले जातील. सातबारामधील बोजे कमी करणे त्रटींची  दुरूस्ती करणे अशी कामे महसूल प्रशासनाने केली आहेत. विभागात जवळपास ३२ हजार शेतकऱ्यांना घरपोच सातबारा वाटप करण्यात आले आहे. ई-पीक पाहणीत २१ हजार शेतकऱ्यांनी स्वतः हून ई-पीक पाहणीच्या नोंदी केल्या आहेत. यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. या नवीन वास्तूतील सोलर सिस्टीमच्या माध्यमातून मोठया प्रमाणात वीजेची आणि वीज बिलाची बचत होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.पद्मश्री पोपटराव पवार म्हणाले हिवरेबाजार गावाच्या कामाला अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय पदाधिकारी व अधिकारी यांनी पाठबळ दिले त्यामुळे पद्मश्री पुरस्कार मिळण्याइतपत काम करता आले. पद्मश्री पोपटराव पवार व राहीबाई पोपेरे यांचा यावेळी महसूल मंत्री थोरात यांच्याहस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

    जिल्हाधिकारी कार्यालयाच्या या वास्तू उभारणीत महत्त्वपूर्ण योगदान देणारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत कुलकर्णी उपमुख्य वास्तुशास्त्रज्ञ संजय गेडाम कार्यकारी अभियंता संजय पवार आदी अधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.जिल्हाधिकारी डॉ.राजेन्द्र भोसले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर आभार अधीक्षक अभियंता जयंत कुलकर्णी यांनी मानले. कार्यक्रमाला नागरिक महसूल विभागाचे व अन्य विभागाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८