शाळांमधून महात्मा गांधीजींच्या विचारांचा जागर

स्मृतिदिनानिमित्त विविध शैक्षणिक कार्यक्रम व्याख्यानाचे आयोजन -शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड

मुंबई प्रतिनिधी : रविवार दि.३० जानेवारी २०२२ रोजी महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त राज्यातील शाळांमधून विविध शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर तसेच गांधी विचार हा भारतीय विचार व्हावा असा संदेश देणारे करिअर कौन्सिलर आशुतोष शिर्के यांचे महात्मा गांधी यांचे जीवन आणि विचार याविषयावर सकाळी ११ वाजता यु ट्युबच्या माध्यमातून व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. https://youtu.be/eKc8s4rZei4 या लिंकवर हे व्याख्यान ऐकता येणार असून विद्यार्थी, शिक्षक, पालक तसेच नागरिकांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केले आहे.

    महात्मा गांधीजींचा ३० जानेवारी रोजी स्मृतिदिन आहे. यानिमित्त त्यांचे शिक्षण विषयक विचार  विद्यार्थ्यांमध्ये रूजवावे यासाठी ३० जानेवारी २०२२ या हुतात्मा दिनी विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली.गांधीजींची शिक्षणविषयक स्वतंत्र भूमिका होती. त्यांनी संपूर्ण जीवनात आपल्या आचार आणि विचारांतून दिलेले संदेश एकविसाव्या शतकातही महत्त्वपूर्ण आहेत. राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना व नव्या पिढीला महात्मा गांधीजींच्या विचारांची ओळख करून देण्याच्या उद्देशाने विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. यासाठी शाळा, विद्यार्थी, पालक, लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर यांचा सक्रिय सहभाग घेण्यात येणार असल्याचेही असेही प्रा.गायकवाड यांनी म्हटले आहे.

    विद्यार्थी व शिक्षकांमार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करून आपल्या सादरीकरणाचा २ ते ३ मिनिटांचा सुस्पष्ट व्हिडीओ, फोटो व इतर साहित्य समाजसंपर्क माध्यमावर (फेसबुक ट्विटर, इन्स्टाग्राम) #naitalim 2022 या हॅशटॅग (#) चा वापर करून अपलोड केला जाणार आहे. तसेच त्या पोस्टची लिंक https://scertmaha.ac.in/competitions/ येथे देण्यात येणार असल्याचे, शालेय शिक्षण विभागामार्फत कळविण्यात आले आहे.या कार्यक्रमांचे आयोजन करीत असताना कोविड-१९ बाबत वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८