पशुसंवर्धनासाठी केंद्राकडून सहकार्य मिळावे –सुनील केदार पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री

वी दिल्ली प्रतिनिधी :  जनावरांचा विम्याचा निधी  राष्ट्रीय पशुधन मिशन अंतर्गत राज्याकडून येणा-या प्रस्तावास मंजुरी आणि परदेशी संकरित गायी आणि बक-यांना आयातीबाबत परवानगी मिळावी या पशुसंवर्धन संदर्भातील महत्वाची बैठक केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री पुरूषोत्तम रूपाला  आणि महाराष्ट्राचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्या उपस्थितीत झाली.

    केदार यांनी केंद्रीय मंत्री  रूपाला यांची कृषी भवन येथे भेट घेतली. बैठकीत राज्याशी निगडीत  पशुसंवर्धन विषयावर सविस्तर चर्चा झाली.राज्यातील जनावरांच्या विम्या संदर्भातील प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात आलेला आहे. केंद्राकडून या प्रस्तावास मंजुरी मिळावी तसेच याबाबतचा निधी शक्य तितक्या लवकर उपलब्ध करून मिळावा अशी मागणी केदार यांनी यावेळी केली.यासह राष्ट्र पशुधन मिशनमध्ये विविध जाती विकसित करण्याबाबत  प्रस्तावास मंजुरी तसेच या मिशन अंतर्गंत मिळणारा  निधी उपलब्ध व्हावा अशी मागणीही केली. या प्रस्तावास मंजुरी मिळाल्यास पशुच्या विविध जातीचे संकर विकसित करण्यास गती येईल असेही केदार यांनी सांगितले.

    भारतीय गीर जातीच्या गायींवर ब्राझीलमध्ये संशोधन होऊन अधिक दुधाळ संकर तयार झालेले आहे. ही नवीन संकरित गीर गाय दिवसाला 25-27 लीटर दूध देते.  या गीर जातीच्या गायी भारतात आणून शेतकऱ्यांना  द्याव्यात जेणेकरून शेतकऱ्यांचा जोडधंदा म्हणून असणाऱ्या दुग्ध व्यवसायाला भरभराट येईल.  तसेच यासोबतच सानेन या जातीच्या बकऱ्या ज्या दिवसाला 10-12 लीटर दूध देतात. या बकऱ्या महाराष्ट्रात आणण्याची परवानगी मिळावी जेणेकरून बकऱ्यांच्या दुग्ध व्यवसायाद्वारे रोजगार वाढीसाठीही मदत होईल अशी मागणी केदार यांनी केंद्रीय मंत्री यांच्याकडे केली. या बकरीचे संकर नेदरलँड ऑस्ट्रेलिया कॅनेडा इजराइल येथे मोठ्या प्रमाणात आहेत. पशुंच्या आयातीसंदर्भात परराष्ट्रीय व्यवहार मंत्रालयाकडून काही परवानग्यांची आवश्यकता असते त्या मिळण्यासाठी केंद्रीय पशुसंवर्धन मंत्रालयाकडून सहकार्य मिळावे अशी मागणी केदार यांनी केंद्रीय मंत्र्याकडे केली.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८