प्रारूप प्रभाग रचना जाहीर १४ फेब्रुवारी पर्यंत हरकती / सुचना नोंदवण्याची अंतीम मुदत !
कल्याण प्रतिनिधी विनायक चव्हाण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२२ करिता निवडणूक प्रभागांच्या सीमांची प्रसिद्धी हरकती व सूचना मागविणे सुनावणी देणे इ.चा कार्यक्रम महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला असून त्या अनुषंगाने सविस्तर माहिती मंगळवारी एका पत्रकार परिषदेत महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी जाहीर केली आहे .यामध्ये दिनांक १ फेब्रुवारी २०२२ रोजी निवडणूक प्रभागांच्या सीमा दर्शवणारी प्रारूप अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली असून त्यास प्रसिद्धी देण्यात येणार आहे. प्रारूप अधिसूचनेवर हरकती व सूचना मागवण्याचा कालावधी १ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी पर्यंत असून प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांचे विवरण पत्र दिनांक १६ फेब्रुवारी रोजी राज्य निवडणूक आयोगास सादर केले जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांमार्फत हरकती व सूचनांवर सुनावणी देण्याचा अंतिम दि. २६ फेब्रुवारी २०२२ पर्यंत आहे. सुनावणीनंतर प्राधिकृत अधिकाऱ्यांनी केलेल्या शिफारशी विहित नमुन्यात नमूद करून विवरण पत्र राज्य निवडणूक आयोगास दिनांक २ मार्च २०२२ रोजी पाठविले जाईल.
ही निवडणूक पॅनल पद्धतीने होणार असून ४४ प्रभाग असणार आहेत त्यापैकी ४३ प्रभाग हे त्रिसदस्यीय व १ प्रभाग हा ४ सदस्यांचा असेल. त्यामुळे एकूण १३३ सदस्य या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून येणार आहेत त्यापैकी ६७ जागा महिलांसाठी आहेत. एकूण सदस्य संख्येपैकी अनुसूचित जातींसाठी १३ जागा राखीव असून त्यापैकी अनुसूचित जातींच्या महिलासाठी ७ राखीव आहेत. अनुसूचित जमाती साठी ४ जागा असून त्यापैकी २ जागा अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी राखीव आहेत. सर्वसाधारण (खुल्या) जागा ११६ असून त्यापैकी ५८ जागा महिलांसाठी राहणार आहेत.
महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२२ करिता प्रारुप प्रभाग रचना ही www.kadmcelection.com या वेबसाइट वर उपलब्ध आहे अशी माहिती पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज दिली.