माईंच्या ९ लेकींना मिळाले आयुष्याचे जोडीदार

अनाथांची माय पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ यांचे स्वप्न पूर्ण होणार

कुंभारवळण येथील ममता बाल सदनमध्ये सिंधुताईंच्या  लेकींचा थाटात साखरपुडा

पुणे प्रतिनिधी : संपूर्ण जगभर अनाथांची माय अशी ओळख असलेल्या पद्मश्री डॉ. स्व. सौ. सिंधुताई सपकाळ यांच्या ९ लेकींना आयुष्याचे जोडीदार मिळाले आहेत. पुणे जिल्ह्यातील कुंभारवळण येथील ममता बाल सदनमध्ये माईंच्या या लाडक्या ९ लेकींचा आज रविवार दिनांक १ मे २०२२ रोजी थाटात साखरपुडा पार पडला. हयातीत असतानां त्यांनी आपल्या सोन्यासारख्या मानस  कन्यांचे थाटात लग्न पार पडावे असं स्वप्न बघितलं होत आज त्या नाहीयेत मात्र ममता बाल सदनने त्यांचं स्वप्न सत्यात उतरवलं आहे.

    मुलगी उपवर झाली की आईच्या मनाला तिच्या लग्नाचे वेध लागतात. पुढच्या आयुष्याची वाटचाल करण्यासाठी तिला अनुरूप साथीदाराची गरज आहे हे जाणवतं. तरी त्याचबरोबर एकीकडे मन खूप हळवं बनते. असच काही माईंचं झालं होत. लहानाचं मोठं सांभाळलेल्या आपल्या लेकींना विवाहाच्या बंधनात अडकतांनाचे स्वप्न साकार होत आहे.  हे नियतीला मान्य नसले तरी आज त्यांच्या पश्चात ९ लेकींना आयुष्याचे जोडीदार मिळाले आहेत. आज रविवारी कुंभारवळण येथील ममता बाल सदनमध्ये  ९ लेकींचा एकसाथ थाटात साखरपुडा पार पडला. परिसरात भव्य मंडप उभारण्यात आला होता. संस्थेच्या वतीने विधिवत पूजापाठसह साखरपुडाचे नियोजन करून उपवर मुलाला अंगठी, संपूर्ण पोशाख, श्रीफळ देऊन सोपस्कार पार पाडले. माईंच्या ९ मानस कन्यांच्या मामांनी उपवर मुलांच्या मामांचे संस्कुतीप्रमाणे कुमकुम तिलक लावून श्रीफळ देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी आ. संजय जगताप यांच्या सौभाग्यवती राजवर्धिनी जगताप, माजी राज्यमंत्री विजयबापू शिवतारे यांची कन्या ममता शिवतारे, पंचायत समिती सदस्य सुनीताताई कोलते, चिंतामणी हॉस्पिटल सासवड येथील डॉ. वांढेकर, डॉ. वाघोलीकर, डॉ. रावळ, कुंभारवळणचे सरपंच अश्विनी खळदकर, माजी सरपंच अमोल कामठे, देविदास कामठे यांच्यासह पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहून मुलींना आशीर्वाद दिले. लेकींच्या साखरपुडा कार्यक्रमाच्या निमित्ताने ममता बाल सदनमध्ये नवचैतन्य निर्माण झाले होते. पत्रिकांच्या जुळणाऱ्या गुणांपेक्षा दोन मनांचं, दोन विचारांचं जुळणं महत्त्वाचं असतं. नात्यांत असणारं प्रेम महत्त्वाचं आहे आणि जिथे प्रेम, सामंजस्य, आपुलकी असते तीच नाती जास्त टिकतात. या सर्व गोष्टी ममता बाल सदनने लक्षात घेऊन आपल्या मुलींना साजेसा होईल अश्याच योग्य उपवर मुलाचा शोध घेतला.  सर्व पाहणी झाल्यानंतर सबंधित उपराच्या परिवाराला आदराने संस्थेत बोलावून पाहणीचा कार्यक्रम घेतला. बैठकीमध्ये उपवर मुलगा आणि उपवर मुलगी या दोघांना समोरासमोर बसवून प्रश्न विचारण्यात आले. दोघांना हि आपल्या आवडी-निवडी काय आहे याबाबत विचारणा केली. त्यानंतर दोघांची पसंती आहे कि नाही हे लक्षात घेऊन टीळ्याचा कार्यक्रम सुद्धा पार पाडला. सोहळ्याच्या आयोजनाकरिता माई सिंधुताई सपकाळ यांचे पहिले मानसपुत्र दिपक गायकवाड, कन्या ममता सिंधुताई सपकाळ, विनय सपकाळ, अधीक्षिका स्मिता पानसरे, मनीष जैन, पूजा जैन तसेच ममता बाल सदनचा स्टाफ यांनी परिश्रम घेतले.

*माईंच्या लेकींना आशीर्वाद असावेत - दिपक गायकवाड

 पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ अनाथांच्या माई यांनी सांभाळलेल्या ९ अनाथ लेकींचा विवाह सोहळा दि. १५ मे २०२२ रोजी लक्ष्मी लॉन्स मगरपट्टा सिटी पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे.  माईंनी सांभाळलेल्या ९ अनाथ लेकीचा विवाह सोहळा यशस्वीपणे पार पडावा असा मानस ममता बाल सदन कुंभारवळण यांचा आहे. आज समाजाला माईंच्या सामाजिक कार्याची जाणीव आहे.  "माझ्या लेकींचा विवाह सोहळा थाटात पार पडला पाहिजे असं स्वप्न सिंधुताईंनी बघितलं होत ते आज सत्यात उतरत आहे. माईंच्या लेकी आपल्या नवीन आयुष्यात पदार्पण करणार असून आपण सर्वांनी माईंच्या लेकींना आपले सर्वांचे आशीर्वाद असावेत अशी भावना सिंधुताई सपकाळ यांचे पहिले मानसपुत्र ममता बाल सदनचे अध्यक्ष दिपक गायकवाड आणि माईंच्या कन्या ममता सिंधुताई सपकाळ यांनी व्यक्त केली आहे.

*नऊ मुलींसाठी तब्ब सहाशे बायोडाटे

नऊ  मुलींसाठी तब्ब सहाशे बायोडाटे प्राप्त झाले होते. त्यातील छाननी करून ३० बायोडाटे निवडण्यात आले. आणि प्रत्येक मुलाच्या घरी जाऊन दिलेली माहिती खरी आहे कि खोटी याबाबत कसून चौकशी करण्यात आली. सदर मुलाची नोकरी, घर, शेती, कुटुंबातील सदस्य त्याचे नातेवाईक आणि मित्रमंडळी बाबत बारीक सारीक सर्वांगीण चौकशी केली. संस्थेचे अध्यक्ष दिपक गायकवाड यांनी मागील २ महिन्यांपासून उपवर मुलांच्या घरी प्रत्यक्ष भेटी देऊन माहिती घेतली.

*परफेक्ट लाइफ पार्टनर मिळवून देण्याचा प्रयत्न

लग्न काय असतं हे समजणं आणि ती जबाबदारी घेण्याची मानसिक, शारीरिक आणि आर्थिक तयारी असणं हे मुलीसाठी अत्यंत गरजेचं असतं. हीच लग्न करण्याची योग्य वेळ असते. विवाह निश्चित करताना प्रगल्भता महत्त्वाची आहेच. प्रत्येकजण एका 'परफेक्ट लाइफ पार्टनर'च्या शोधात असतो. मात्र तो शोधत असताना स्वत:मध्ये व समोरच्या व्यक्तीमध्ये प्रगल्भता असणं फार गरजेचं आहे. आधी माई यासर्व बारीक-सारीक  गोष्टी बघायच्या. आज त्या हयात नसल्या तरी माईंच्या लेकींना देखील 'परफेक्ट लाइफ पार्टनर' मिळाला पाहिजे या उद्देशाने मागील दोन महिने ममता बाल सदन संस्थेने दिवसरात्र परिश्रम घेतले.

*नऊ ही मुलींचं अरेंज मैरेज

लग्न हा आयुष्याला नवीन रंग देणारा क्षण असतो. ज्या दोन व्यक्तींचं लग्न होणार असतं त्या व्यक्तींचे विचार, त्यांचं सुख हे घटक महत्त्वाचे असतात. लग्न हे मनापासून आणि इच्छेप्रमाणे झालं तर निश्चितच ते यशस्वी ठरतं. त्यामुळे वय, रंग, धर्म, जात या गोष्टींना अतिमहत्त्व देण्याची गरज वाटत नाही. अश्या गोष्टी लक्षात घेऊन संस्था या सर्व दहा मुलींचं अरेंज मैरेज ठरवलं आहे.

*माईंना जावयांची अधिक भर

माईंनी अत्यंत बिकट परिस्थितीतून मार्ग काढत आपलं आयुष्य जगलं. अखेर, ज्याचं कुणी नाही, त्याचं आपण असं म्हणत त्यांनी आयुष्यात अनेकांची सेवा केली. त्याच माईंच्या ९ लेकींना आयुष्याचे जोडीदार मिळाले आहेत. माईंच्या ९ लेकी येणाऱ्या १५ मे २०२२ रोजी विवाहबद्ध होऊन सासरला जाणार आहेत. आता पर्यंत माई  २१० जावई, ५० सुना अशा गजबजलेल्या एकत्र कुटुंबाची ती ‘माय’ म्हणून मिरवली. या सार्‍यांच्या जीवनाची ती प्रकाशवाट झाली, दीपस्तंभ झाली. आता ह्यात आणखी ९ जावयांची नव्याने भर पडणार आहे.

*मी अनाथांची माय झाले तुम्ही गणगोत व्हा

 ‘मी अनाथांची माय झाले, तुम्ही गणगोत व्हा’, माई नेहमी असे म्हणायच्या. माईंच्या या लेकींना विवाह सोहळ्यात गणगोत म्हणून आशीर्वाद द्या.  माईंच्या कार्याची प्रेरणा घेऊन आता आपण सारे अनाथांचे नाथ होऊ या. आणि माईंच्या कार्याला साथ देऊ या. आपण सारे सर्व जण गणगोत व्हा, असे आवाहन माई सिंधुताई सपकाळ यांचे पहिले मानसपुत्र दिपक गायकवाड, माईंची कन्या ममता सिंधुताई सपकाळ यांनी केले आहे.

ॲड.दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक ९४०४४५३५८८