कटाक्ष:गडकरी आता तरी बोला !

संपादकीय,
    केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री  नितीन गडकरी आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना पक्षाच्या सांसदीय मंडळातून हटवून मोदींनी आपल्याला आव्हान देऊ  शकतील अशा दोन नेत्यांच महत्त्व कमी करण्याचा  प्रयत्न केला आहे. पासष्ट वर्षांच्या  गडकरींच मोदींशी कधीच जमल नाही.  पण अध्यक्ष झाल्यापासून संघातील प्रबळ मराठी लॉबीच्या भरवशावर पंतप्रधानपदाची स्वप्न गडकरीना पडू लागली. संघाचे पाहिले प्रवक्ते आणि  तरुण भारतचे माजी संपादक स्व मा गो वैद्य यांनी आपल्या स्तंभातून खुलेआम मोदींना विरोध करत गडकरींना पाठिंबा दिला होता. गडकरी वैद्यांच्याच पाठिंब्यामुळे लालकृष्ण अडवाणींची इच्छा नसताना अध्यक्ष बनले होते.अटल-अडवाणी युग संपत येत होत. संघातील मोहन भागवत  मा गो वैद्य

   यांच्यापासून अगदी नागपूरच्याच संजय जोशीपर्यंत पसरलेल्या संघातील पॉवरफुल  ब्राम्हण मराठी लॉबीच्या भरवशावर  गडकरी वाजपेयींची जागा घेण्याची स्वप्न पाहू लागले. वक्तृत्व आणि वाढत चाललेल्या आर्थिक पाठबळाच्या भरवशावर! याच दरम्यान पक्षाध्यक्ष म्हणून ते एकदा गुजरातच्या दौऱ्यावर गेले होते. पण तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या मोदींनी गडकरींना भेटणं  टाळलं होत.  मोदी-गडकरींचा तो पहिला संघर्ष होता. पण त्यावेळी गडकरींनी  मोदींवर कुठलीही टीका करणं टाळलं होत.मोदी सरकारी कामात व्यस्त असल्याने ते आपल्याला भेटू शकले नाहीत अस सांगून त्यांनी या वादावर पडदा  टाकला होता. पण  २०१२ साली मुंबईत झालेल्या भाजपच्या अधिवेशनात मात्र मोदी आणि गडकरी यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आले होते. गडकरींनी मोदींचे पक्षातील शत्रू संजय जोशी  यांना त्यांच्या नागपूरी संबंधांना स्मरून पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान दिले होते. पण पक्षाच अधिवेशन सुरू होण्याच्या आधीच मोदींनी  आपले हस्तक आणि पक्षाचे तत्कालीन उपाध्यक्ष पुरुषोत्तम रूपाला यांच्या मार्फत संजय जोशी जर अधिवेशनात उपस्थित राहिले तर नरेंद्र मोदी हजर राहणार नाहीत असा निरोप पाठवला . अर्थात गडकरींना दुसऱ्यांदा  झुकावं लागलं.

    मोदींच्या  हट्टासाठी आपल्या नागपूरच्या मित्राचा बळी द्यायला लागला.त्यानंतर गेली दहा वर्षे संघाचे पूर्ण वेळ प्रचारक असलेले सिव्हील इंजिनिअर संजय जोशी गेली दहा वर्षे राजकीय विजनवासात आहेत आणि मोदी पक्षात सर्वोच्च स्थानावर असेपर्यंत तो विजनवास संपण्याची शक्यता नाही. गडकरींनी पक्षाध्यक्ष  म्हणून दुसरी टर्म मिळण्यासाठी  सगळे प्रयत्न केले होते. पण त्याला अडवाणी , मोदी या दोघांनीही विरोध केला. आणि शेवटी या दोघांनीही केलेल्या विरोधासमोर  गडकरींना मान झुकवावी लागली आणि त्यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. ही त्यांच्या आणि मोदींच्या संघर्षाची तिसरी वेळ होती. आणि तीनही प्रसंगी गडकरींना पडत घ्यावं लागलं होत. पुढे  मोदींची निवड पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून झाल्यानंतर गडकरी मोदींच्या स्वागतासाठी हातात मोत्यांची माळ घेऊन गेले होते. तो गडकरींच्या बचावात्मक राजकारणाचा एक भाग होता. पुढे तर प्रत्येक वेळी मोदी आपला वरचष्मा दाखवत गेले. पंतप्रधानपदाच्या शर्यतीत हरलेल्या गडकरींनी आपल्या समर्थकांकडून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी आपल नाव चालवलं पण तिथेही मोदींनी देवेंद्र फडणवीसांना संधी दिली. संघाच्या पॉवरफुल मराठी लॉबीकडून पंतप्रधान पदाचे संभाव्य उमेदवार गणल्या जाणाऱ्या गडकरींना गृह, अर्थ, संरक्षण किंवा परराष्ट्र यासारखं पंतप्रधान पदाच्या समकक्ष मंत्रालय न मिळता रस्ते आणि वाहतूक खात मिळालं. पण गडकरी रस्त्यांच्या बांधकामाच्या आर्थिक उलाढालीत खुश झाले. कारण महाराष्ट्रात  त्यांनी तेच केलं होत. त्यावेळी त्यांना तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशींनी  मुक्तपणे काम करू दिलं होत. त्याकाळात मुंबई - पुणे  रस्ता, मुंबईतील  अनेक उड्डाण पुल अशी करोडोंची  आर्थिक उलाढाल करणारे प्रकल्प गडकरींनी हाताळले. सर्वच प्रकारचा विकास मुक्तपणे होत होता.

    पण मोदींच्या काळात तो मुक्तपणा मिळणं केवळ अशक्य होत.मध्यंतरी गडकरींनी दिलेले काही कॉन्ट्रॅक्टस रद्द केले जाण्याचीही बातमी आली होती. पण गडकरींनी त्यावर वादंग होऊ दिलं नाही. २०१७ ला लालकृष्ण अडवाणी राष्ट्रपती पदाचे उमेदवार असावेत असही एकदा गडकरी म्हणाले होते. पण नंतर ते शांत बसले. हुकूमशाही प्रवृत्तीच्या मोदींसमोर गडकरी गेली आठ वर्षे बचावात्मक राजकारण खेळत आहेत. आपल मंत्रिपद सांभाळून! मोदींना कुठेही आव्हान देण्याचा ते प्रयत्न करत नाहीत. भाजपमध्ये सर्वोच्च नेतृत्वाला आव्हान देणाऱ्यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात येते याची कल्पना त्यांना आहे. त्यांच्यासमोर बलराज मधोक, गोविंदाचार्य, संजय जोशी  प्रवीण तोगडिया यांची उदाहरण आहेत.या चौघांच राजकीय अस्तित्वच संपुष्टात आलं. त्यातील पहिल्या दोघांनी वाजपेयींशी वैर घेतलं होत तर दुसऱ्या दोघांनी  नरेंद्र मोदींशी! सदैव बचावात्मक राजकारण खेळणाऱ्या गडकरींना या यादीत येण्याची इच्छा नाही. त्यासाठी ते प्रसंगी पडत घ्यायला किंवा मोदींना  मोत्यांची माळ भेट द्यायला तयार असतात.  पण सांसदीय मंडळातून वगळणे हा फार मोठा आघात आहे.त्यामुळे संघ परिवारातील आपल्या हितचिंतकांचा वापर करत  गडकरींनी  स्वत: च पक्षातील अस्तित्व कायम राखण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. कारण आजही त्यांच्याकडे मोदींना पर्याय म्हणून पाहणारा एक गट आहे.आज जर गडकरी बोलले नाहीत तर  कदाचित २०२४ च्या निवडणुकीत त्यांना नागपूरहून उमेदवारी सुद्धा नाकारली जाऊ शकते.

    जी गोष्ट गडकरींची  तीच ६३ वर्षीय शिवराजसिंह चौहानांची! मोदी  २००१ ते २०१४ पर्यंत १३वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री होते तर चौहान २००५ ते २०१८ पर्यंत! आणि पुन्हा गेली दोन वर्षे ते मध्य प्रदेश सारख्या २८  खासदार असलेल्या मोठ्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत.  भाजपचे सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री राहिलेले म्हणून अर्थात  चौहानांच नाव येतं! त्यामुळे अशा या दोन ज्येष्ठानी त्यांच्यावर  होणारा अन्याय  शांतपणे स्वीकारणं योग्य नसून  त्याविरुद्ध आवाज उठवलाच पाहिजे. आणि त्यात गडकरींनी पुढाकार घेतला पाहिजे.अन्यथा त्यांची नागपूरची उमेदवारी धोक्यात येऊ शकते! तूर्तास इतकेच !

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक ९४०४४५३५८८