महाराष्ट्रातील 3 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार

महाराष्ट्रातील दोन प्रशिक्षक आणि चार खेळाडूंना राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान वर्ष 2022 चे क्रीडा पुरस्कार आणि वर्ष 2021 चे तेनजिंग नोर्गे साहस पुरस्कार प्रदान

वी दिल्ली प्रतिनिधी : क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणा-या खेळाडूंना विविध श्रेणीतील राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराने  आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यामध्ये  वर्ष 2022 चे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार आणि  वर्ष 2021 साठीचा तेनजिंग नोर्गे साहस पुरस्कार  प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रातील दोन प्रशिक्षक आणि चार   खेळाडूंचा यात समावेश आहे. क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांना द्रोणाचार्य आजीवन पुरस्कार आणि शुभम वनमाळी यांना जल साहसासाठी वर्ष 2021 साठीचा तेनजिंग नोर्गे साहस पुरस्कार आज प्रदान करण्यात आला.

    केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात  केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकुर, केंद्रीय राज्यमंत्री  निसिथ प्रमाणिक तसेच वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. राष्ट्रपती यांच्या हस्ते राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान करून खेळाडूंना गौरविण्यात आले.दरवर्षी खेळाडूंच्या चमकदार कामगिरीसाठी केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर करण्यात येतात. यावर्षी एका खेळाडूला ‘मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार’, 25 खेळाडूंना ‘अर्जुन पुरस्कार’ जाहीर झाले होते. यासह ‘द्रोणाचार्य’ पुरस्कारामध्ये आ‍जीवन श्रेणीत 3 आणि नियमित द्रोणाचार्य पुरस्कारा’साठी 4 खेळाडूंना तसेच क्रीडा प्रशिक्षकांना पुरस्कार जाहीर झाले होते. याशिवाय ‘ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार’ देशातील 4 खेळाडूंना जाहीर झाले होते. 3 संस्थांना ‘राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार’, आणि गुरू नानक देव विद्यापीठ, अमृतसरला ‘मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी’ ची घोषणा करण्यात आली होती.

क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांना ‘द्रोणाचार्य आजीवन ’ पुरस्कार प्रदान

    क्रिकेट क्षेत्रात प्रशिक्षक म्हणून उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल दिनेश लाड यांना द्रोणाचार्य आजीवन पुरस्कार प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला. मागील 30  वर्षांपासून लाड हे क्रिकेट प्रशिक्षक आहेत. मुंबईतील बोरीवलीतील श्री स्वामी विवेकानंद हायस्कूल याठिकाणी लाड यांची क्रिकेट अकादमी आहे.  त्यांच्या या अकादमीतून अनेक प्रसिद्ध क्रिकेटपटू आतापर्यंत तयार झालेले आहेत.लाड यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत जवळपास 90 च्या वर रणजीपटू तयार झाले आहेत. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, शार्दुल ठाकूर सिद्धेश लाड यांच्या सह अनेक क्रिकेट खेळाडूंचे ते प्रशिक्षक आहेत.

    मुंबईच्याच सुमा शिरूर यांना पॅरा नेमबाजी क्रीडा प्रकारात प्रशिक्षक म्हणून द्रोणाचार्य पुरस्काराने (नियमित) आज गौरविण्यात आले. अग्नी रेखा, ऐश्वर्या प्रताप सिंग तोमर, शाहु माने, आशिष चौकसे, सुनिधी चौव्हान, किरण जाधव, प्रसिद्धी महंत, अबनव शहा, आत्मिका गुप्ता, आकृती दहीया सारख्या प्रसिद्ध खेळाडूंना त्यांनी प्रशिक्षित केलेले आहे. त्यांच्या या कामगिरीसाठी त्यांना आज सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्रातील 3 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार

   महाराष्ट्रामधून मल्लखांब या क्रीडा प्रकारासाठी सागर ओव्हळकर, अविनाश साबळे  यांना ॲथलेटिक्ससाठी, तर स्वप्निल  पाटील यांना पॅरा जलतरण क्षेत्रातील आतापर्यंच्या चमकदार कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार जाहीर झाला होता.मुंबईतील मल्लखांब चे उत्कृष्ट खेळाडू ओव्हळकर यांनी लहान वयापासूनच मल्लखांब हा साहसी खेळ खेळायला सुरुवात केली. वर्ष 2019 मध्ये आयोजित जागतिक अजिंक्य पद  (चॅम्पियनशिप)  स्पर्धेत पोल मल्लखांब लॉन्ग सेट स्पर्धा, स्मॉल सेट स्पर्धा आणि रोप मल्लखांब लॉन्ग सेट या तीन्ही प्रकारात ओव्हळकर यांनी सुवर्ण पदक पटकाविले आहे. तसेच 2019 मध्येच  जागतिक अजिंक्य पद (चॅम्पियनशिप) स्पर्धेतील एकल प्रकारात रौप्य पदक पटकाविले आहे. विविध कसरती करण्यात ओव्हळकर  अतिशय कुशल आहेत.  विविध स्पर्धांमध्ये महाराष्ट्रासह देशाचे नाव उंचावले आहे. त्यांच्या या कामगिरीसाठी अर्जुन पुरस्काराने आज गौरविण्यात आले.

    बीडचे  ॲथलेटिक्स खेळाडू अविनाश साबळे यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये धावण्याच्या स्पर्धेत पुरूषांच्या 1 हजार मीटरची स्टीपल चेस स्पर्धा प्रकारात आणि वर्ष 2019 मध्ये एशिया अजिंक्य पद (चॅम्पियनशिप) स्पर्धेत  3 हजार मीटरची स्टीपल चेस प्रकारात साबळे यांनी रौप्य पदक पटकावले आहे. त्यांच्या क्रिडा क्षेत्रातील या उत्तुंग कामगिरीसाठी आज त्यांना  अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

    कोल्हापूरचे पॅरा जलतरणपटू स्वप्निल पाटील यांनी आशियाई पॅरा क्रिडा स्पर्धा वर्ष 2018 मध्ये 100 मीटर ब्रेसस्ट्रोक एस 10 या प्रकारात रौप्य पदक, 100 मीटर फ्री स्टॉईल एस 10 स्पर्धेत कांस्य पदक आणि 400 मीटर फ्री स्टॉईल एस 10 मध्येही कांस्य पटकाविले होते त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना आज अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

साहसिक जलतरणपटू शुभम वनमाळी यांना वर्ष 2021 चा तेनजिंग नोर्गे साहस पुरस्कार

    पालघर जिल्ह्यातील साहसिक जलतरणपटू शुभम वनमाळी यांना राष्ट्रपती यांच्या हस्ते वर्ष 2021 साठी चा तेनजिंग नोर्गे साहस पुरस्काराने आज गौरविण्यात आले. मांडवा जेटी ते एलिफंटापर्यंतचे 21 किलोमीटर समुद्रीमार्गाचे अंतर 5 तास, 4 मिनिटे, 5 सेकंदात त्यांनी पूर्ण केले. यासह गेटवे ऑफ इंडिया ते डहाणू बीचचे 147 किलोमीटरचे अंतर 28 तास 40 मिनिटे, तसेच राजभवन ते गेटवे ऑफ इंडिया मधील 14 किलोमीटरचे अंतर 3 तास 13 मिनिटे 10 सेकंदात पोहून पूर्ण  केलेले आहे. वनमाळी यांना महाराष्ट्र शासनाचा वर्ष 2018-19 शिव छत्रपती राज्य साहस पुरस्कार प्राप्त झालेला आहे.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८