जातनिहाय जनगणनेच्या मुख्य मुद्द्यासह ओबीसींचा धडकला मोर्चा...

लिबाग प्रतिनिधी पुनित खांडेकर :अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयावर आज धडक मोर्चा निघाला हा ओबीसी जनमोर्चाच्या  नेतृत्वाखाली ओबीसी समाजाच्या मागण्यांसंदर्भात आवाज उठविण्यासाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.जातनिहाय जनगणना करून ओबीसी समाजाला त्याचा न्याय हक्क मिळावेत या प्रमुख मागणीसाठी ओबीसी जनमोर्चा अध्यक्ष प्रकाश शेंडगे यांच्या पुढाकाराने ओबीसी जनमोर्चाचे  अन्य पदाधिकाऱ्यांच्या आणि समस्त ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहून हा मोर्चा यशस्वीरीत्या पार पाडला.

   देशात व राज्यात ओबीसी समाजाची ताकद वेगवेगळ्या जातीत विभागली गेली असल्यामुळे लोकसंख्येच्या प्रमाणात ओबीसी समाजाला हक्क ,अधिकार,प्रतिनिधित्व मिळत नाही .त्यामुळे सर्व ओबीसी समाजाने एकत्रित येणे गरजेचे आहे. आपण एकत्रित नसल्याने समाजाला असलेले २७ टक्के आरक्षणही टिकणार नाही. त्यामुळे जातानिहाय जनगणना झाली पाहिजे व त्याप्रमाणात समाजाला विकासनिधी मिळाला पाहिजे असे प्रतिपादन ओबीसी जनमोर्चा अध्यक्ष प्रकाश शेंडगे यांनी केले.

    देशात ६००० पेक्षा जास्त जाती आणि राज्यात ३५० पेक्षा जाती ह्या ओबीसी प्रवर्गात मोडतात . ओबीसींच्या हक्काचा मुद्दा जेंव्हा येतो तेंव्हा एकही पक्ष आवाज उचलत नाही. आपण अनेक राजकीय पक्षात काम करतो, वेळे नुसार पक्ष बदलता येतो मात्र आपण आपली जात बदलू शकत नाही , त्या मुळे पक्षाचे राजकारण सोडून आपण समाज म्हणून एकत्र यायला हवे आणि आपल्या मागण्यांसाठी संघर्ष करायला हवा असे मत ओबीसी संघर्ष समन्वय समितीचे अध्यक्ष आणि ओबीसी जनमोर्चाचे कार्याध्यक्ष चंद्रकांत बावकर यांनी व्यक्त केले.

    खासदार सुनील तटकरे यांनी मार्गदर्शन करताना, संसदेच्या आगामी अधिवेशनात ओबीसी जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले. ओबीसी आरक्षणावरील‌ निर्णय न झाल्याने नगरपालिकांच्या निवडणूका पुढे गेल्या आहेत. आजचा मोर्चा ही सुरुवात असून, आपल्या बाजूने निर्णय झाल्याशिवाय पाठी हटायचे नाही. ओबीसी समाजाने ही एकजूट कायम ठेवावी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ओबीसी समाजाच्या भूमिकेला पाठिंबा अशी ग्वाही खासदार सुनील तटकरे यांनी दिली.ओबीसी समाजाचे जास्तीत जास्त नेते लोकसभा, विधानसभेत जात नाहीत तोपर्यंत न्याय मिळणार नाही हे आपण समजून घेतले पाहिजे. आपल्या ओबीसी समाजात एकजुट नाही याचा फायदा इतर घेतात आणि आपण नेहमी प्रश्र्नाकित राहतो. शेतकरी कामगार पक्षाने सातत्याने ओबीसी समाजाच्या प्रश्नांना व मागण्यांना पाठिंबा दिला आहे आणि या पुढेही समाजासाठी तत्पर असू, असे माजी आमदार पंडित पाटील यांनी सांगितले.

   हा मोर्चा छत्रपती शिवाजी महारजांच्या स्मारकापासून सुरू झाला आणि थेट रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने कोणतीही वाहतूक कोंडी न करता ,पोलिसांच्या देखरेखीत धडकला. मोर्चात माजी पालकमंत्री आमदार आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, माजी आमदार धैर्यशील पाटील, अलिबाग नगराध्यक्ष प्रशांत नाईक, शिवसेना उद्भव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड आस्वाद पाटील, ओबीसी  संघर्ष समन्वय समितीचे अध्यक्ष व ओबीसी जनमोर्चाचे कार्याध्यक्ष चंद्रकांत बावकर, उपाध्यक्ष जे. डी. तांडेल, जिल्हा अध्यक्ष सुरेश मगर, मधुकर पाटील, रायगड जिल्हा कुणबी युवा अध्यक्ष/ ओबीसी संघर्ष समितीचे तळा तालुका अध्यक्ष सचिन कदम ,ओबीसी संघर्ष समितीच्या तळा तालुका महिला अध्यक्षा सौ अक्षरा कदम रायगड जिल्हा कुणबी समन्वय समितीचे अध्यक्ष उदय कटे यांच्यासह सर्व पदाधिकारी सहभागी झाले होते.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८