विधानसभेत मुक्ता टिळक यांना श्रद्धांजली
नागपूर विशेष प्रतिनिधी : विधानसभा सदस्य मुक्ता टिळक यांच्या निधनाने केवळ एका पक्षाचेच नव्हे तर संपूर्ण समाजाचे नुकसान झाले आहे, अशा शब्दात विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी शोक भावना व्यक्त केल्या. ॲड.नार्वेकर म्हणाले दिवंगत टिळक यांनी आनंदवन मित्र मंडळाच्या अध्यक्षा, लोकमान्य टिळक विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षा म्हणून काम केले होते. त्यांनी इंटरनॅशनल लेप्रसी युनियनच्या उपाध्यक्षा, पुणे येथील प्रेरणा महिला मंडळ आणि दृष्टी महिला मंचच्या संस्थापिका म्हणून काम केले होते. लोकमान्य दैनंदिनीच्या त्या संपादिका होत्या. सन २०१९ मध्ये कसबा मतदारसंघातून त्या विधानसभेवर निवडून आल्या होत्या.
लोकप्रतिनिधींनी पक्षनिष्ठा आणि कर्तव्य कसे बजावावे याचे त्या मूर्तीमंत उदाहरण होत्या. आजारी असताना सुद्धा त्या सभागृहाच्या कामकाजात सहभागी होत असत. अशा निष्ठावान, कर्तृत्ववान लोक प्रतिनिधींच्या निधनाने केवळ पक्षाचेच नव्हे तर संपूर्ण समाजाचे नुकसान झाले आहे, अशा शब्दात ॲड. नार्वेकर यांनी शोक भावना व्यक्त केल्या.
आदर्श लोकप्रतिनिधी गमावला - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
कसबा मतदारसंघातील आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनाने एक उत्तम समाजसेविका आणि आदर्श लोकप्रतिनिधी आपण गमावल्या आहेत. अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिवंगत टिळक यांना श्रद्धांजली अर्पण केली.आपल्या शोक भावना व्यक्त करताना शिंदे म्हणाले टिळक यांचे सर्वपक्षीय लोकांसोबत सलोख्याचे संबंध होते. उच्चशिक्षीत असलेल्या मुक्ताताई या आमदार होण्यापूर्वी नगरसेविका होत्या. 2017 साली पुणे महानगरपालिकेच्या महापौर म्हणूनही त्या विराजमान झाल्या होत्या.
मुक्ताताईंनी लोकप्रतिनिधी म्हणून सर्वांना सोबत घेऊन काम केले. काही दिवसापूर्वी आजारी असतानादेखील त्यांनी राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी रूग्णवाहिकेतून येऊन मतदान केले. त्यांच्या कुटुंबियांना मुक्ताताईंच्या निधनाचे हे दु:ख सहन करण्याची शक्ती मिळो, आपण सर्व त्यांच्या दु:खात सहभागी आहोत अशा शब्दात मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.