कांदाचाळीसाठी मिळणार १ लाख ६० हजारांचे अनुदान ?

रोहयोअंतर्गत कांदा साठवणुकीसाठी कांदाचाळ 1 लाख 60 हजारांचे अनुदान मिळणार-मंत्री संदिपान भुमरे


मुबई प्रतिनिधी : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कांदे साठवण करण्याचे गोदाम म्हणून कांदाचाळ उभारण्यासाठी १ लाख ६० हजार ३६७ रुपये अनुदान देण्यात येणार असल्याचे रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी सांगितले.मंत्री भुमरे म्हणाले की खरीप हंगामात कांदा काढला की, लगेच मागणी असल्यामुळे विकला जातो किंवा रांगडा हंगामातील कांदा  साठविला जाऊ शकतो. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेची मागणी व निर्यातीची मागणी भागविण्यासाठी कांदा साठवणूक क्षमता वाढविणे गरजेचे आहे. त्यामुळे ग्राहकांना माफक दरात व सातत्याने कांदा उपलब्ध होऊ शकतो.

   कांदा हे एक जिवंत पीक आहे. त्याचे मंदपणे श्वसन चालू असते. तसेच पाण्याचे उत्सर्जन देखील होत असते. त्यामुळे योग्य प्रकारे साठवण न केल्यास कांद्याला ४५-६० टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते. हे नुकसान प्रामुख्याने वजनातील घट, कांद्याची सड व कोंब येणे इ. कारणांमुळे होते. त्यामुळे कांद्याचे कमीत कमी नुकसान होण्यासाठी कांद्याची शास्त्रोक्त पद्धतीने साठवणूक होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी ‘कांदाचाळ’ च्या माध्यमातून कांदा पिकाची साठवणूक आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

   मंत्री भुमरे पुढे म्हणाले अकुशल ६० टक्के प्रमाणे ९६ हजार २२० रुपये इतकी मजुरी तसेच साहित्यासाठी लागणारा खर्च, कुशल ४० टक्केच्या मर्यादेत ६४ हजार १४७ रुपये इतका खर्च असा मनरेगा अंतर्गत मजुरी अधिक साहित्याचा खर्च एकूण १ लाख ६० हजार ३६७ रूपये (एक लक्ष साठ हजार तीनशे सदुसष्ठ) इतके अनुदान मिळणार आहे. उर्वरित रक्कम २ लाख ९८ हजार ३६३ रुपये इतका निधी लोकवाटाच्या माध्यमातून उपलब्ध होणार असून कांदाचाळीसाठी एकूण खर्च ४ लाख ५८ हजार ७३० रुपये येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गटशेती महिला बचत गट यांना सामुदायिक लाभ घेता येणार

   खरीप व रब्बी हंगामामध्ये कांदा पिकाचे उत्पादन होते. राज्यात साधारण १३६.६८ लाख मे. टन इतक्या कांद्याचे उत्पादन घेतले जाते. त्यासाठी साधारणपणे एकूण ९.४५ लाख हे. क्षेत्र कांदा पिकाखाली आहे. कांदा साठवण करण्याच्या गोदामासाठी रुंदी ३.९० मी. लांबी १२.०० मी. एकूण उंची - - २.९५ मी. (जमिनीपासून ते टाय लेवलपर्यंत) याप्रमाणे आकारमाण राहील. साधारण एक हे. धारण क्षेत्रावर २५ मे. टन कांदा उत्पादन होते. कांदाचाळ वैयक्तिक तसेच सामुदायिकरित्या शेतकरी याचा लाभ घेऊ शकतात. तसेच गटशेती, महिला बचत गट यांना सामुदायिक लाभ घेता येणार आहे.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८