सांस्कृतिक कार्य विभागात आता शंभर टक्के ई-ऑफिस
मुबई प्रतिनिधी : राज्य शासनाने मंत्रालयातील विविध विभागात प्रत्यक्ष फाईल्सचा होणारा प्रवास त्यासाठी नागरिकांना वारंवार मारावे लागणारे हेलपाटे आदी बाबींतून मुक्त होऊन ही प्रक्रिया अधिक सोपी सुलभ होण्यासाठी सर्व पत्रव्यवहार ई-ऑफिस प्रणालीमार्फत करण्याचा निर्णय घेतला. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली आता सांस्कृतिक कार्य विभागात शंभर टक्के ई-ऑफीसचा वापर सुरु करण्यात आला आहे. यामुळे आता सर्व प्रत्यक्ष स्वरुपातील फाईल्स आणि टपाल बंद करण्यात आले असून आता ते केवळ इलेक्ट्रॉनिक पद्धतीनेच हाताळले जात आहे.
सामान्य प्रशासन विभागाने मंत्रालयीन सर्व विभागांना ई-ऑफिस प्रणालीचा वापर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. अनावश्यक पत्रव्यवहार टळावा, विभागांतर्गत विविध फाईल्सचा जलद निपटारा व्हावा, नागरिकांकडून विविध विषयांवर आलेल्या पत्रव्यवहारांबाबत गतीने निर्णय व्हावेत, या उद्देशाने ई-ऑफिस प्रणाली सुरु करण्याच्या सूचना होत्या. सांस्कृतिक कार्य विभागाने यासाठी पुढाकार घेतला. याबाबत ई-ऑफिस सुरु करण्याच्या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल म्हणून प्रधान सचिव विकास खारगे यांनी विभागातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या. सांस्कृतिक कार्य विभाग ई-ऑफिस सुरू करण्यात आघाडीवर ठरला आहे.
सांस्कृतिक कार्य विभागाकडे आलेल्या विविध पत्रव्यवहारांचे स्कॅनिंग करुन ती विषयवार संबंधित कक्ष अधिकारी त्यानंतर उपसचिव सहसचिव अशा पद्धतीने ई- प्रणालीद्वारे संबंधितांच्या टिपणीसह पुढे पाठवली जाते. यामुळे संबंधित विषयांवर निर्णयातील दिरंगाई आता पूर्णपणे कमी होण्यास मदत होणार आहे. सर्व प्रत्यक्ष (फिजीकल स्वरूपातील) फाईल्स व टपाल बंद केले असून आता ते केवळ इलेक्ट्रॅानिक पध्दतीनेच हाताळण्यात येते. ई-ऑफिसमुळे कोणत्याही ठिकाणाहून कॅाम्प्यूटर लॅपटॅाप अथवा मोबाईल फोनवरून ई-फाईल्स व ई-टपाल हाताळता येते. यामुळे प्रशासन पारदर्शी व गतिमान होण्यास मदत होणार असल्याचे प्रधान सचिव श्री. खारगे यांनी सांगितले. सांस्कृतिक कार्य विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी ही प्रणाली राबविण्यात सक्रिय सहभाग घेतल्याने शंभर टक्के ई-ऑफिस करणे शक्य झाले आहे.
यापूर्वी प्रधान सचिव खारगे यांनी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचे व्यवस्थापकीय संचालक असताना तो विभाग राज्यातील पहिले शंभर टक्के ई-ऑफिस केले होते. त्या अनुभवाचा फायदा सांस्कृतिक कार्य विभागात ई-ऑफिसचे काम करताना झाल्याचे खारगे यांनी सांगितले.