मुंबई प्रतिनिधी : दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे अंतर्गत सांगली जिल्ह्यातील मिरज येथील शासकीय निवासी संस्थेत दिव्यांग (अस्थिव्यंग) बालकांना सन 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु असून मोफत प्रवेशासाठी संपर्क साधण्याचे आवाहन अधिक्षक शासकीय दिव्यांग बालगृह व शाळा मिरज यांनी केले आहे.
मोफत शिक्षण सुविधेमध्ये संस्थेच्या परिसरात पहिली ते चौथीपर्यंतचे मोफत प्राथमिक शिक्षण इयत्ता 5 वी पासून पुढील शिक्षण माध्यमिक शाळेमार्फत माध्यमिक शाळेत जाण्यायेण्याकरिता मोफत वाहतुकीची सुविधा पाठ्यपुस्तके वह्या इतर शैक्षणिक साहित्य व शालेय गणवेश मोफत देण्यात येणार आहे. मुलींसाठी विशेष काळजी घेण्यासाठी महिला काळजीवाहक आहेत.वसतिगृह सुविधेमध्ये दिव्यांग मुला- मुलींची स्वतंत्र निवास व्यवस्था व मोफत जेवण, प्रत्येक विद्यार्थ्यांस कॉट, गादी, बिछाना व इतर साहित्याचा मोफत पुरवठा दररोज आंघोळीसाठी गरम पाण्याची सोय शुद्ध व थंडगार पाण्याची सुविधा पुरविण्यात येणार आहे.
शस्त्रक्रिया भौतिकोपचार सुविधेमध्ये अस्थिव्यंगोपचार तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार गरजेनुसार शस्त्रक्रिया व भौतिकोपचाराची सुविधा गरजेनुसार कृत्रिम अवयव कुबड्या तीन चाकी सायकल वाटप वयोगट शून्य ते सहाकरिता मोफत भौतिकोपचार करण्यात येतील.
प्रवेशाबाबतच्या अटींनुसार प्रवेशित अस्थिव्यंग असला पाहिजे वयोगट 6 ते 17 वर्षे प्रवेश अर्जासोबत सिव्हील सर्जन यांनी दिलेल्या दिव्यांगाचा दाखला शाळा सोडल्याचा दाखला उत्पन्नाचा दाखला तीन फोटो आवश्यक आहेत.प्रवेश अर्ज व माहितीपत्रक पत्त्यावर समक्ष अथवा पोस्टाव्दारे मोफत मिळतील.अधिक माहितीसाठी अधिक्षक शासकीय दिव्यांग बालगृह व शाळा किल्ला भाग बीएसएनएल ऑफिस शेजारी मिरज–416410 जि. सांगली या पत्त्यावर संपर्क साधावा.तसेच भ्रमणध्वनी क्रमांक 9325555981 9552234586 9422216459 यावर संपर्क साधता येणार आहेत.