ग्रामविकास विभागाच्या भरतीप्रक्रियेतील उमेदवारांनी कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये -मंत्री गिरीश महाजन

मुंबई प्रतिनिधी : ग्रामविकास विभागाच्या परिक्षेची संपूर्ण भरतीप्रक्रिया शासनाने मान्यता दिलेल्या आय.बी.पी.एस. या कंपनीमार्फत राबविण्यात येत आहे. त्यामुळे सदर परीक्षा अत्यंत पारदर्शक व काटेकोर पद्धतीने होणार आहे. तथापि, काही समाजविघातक प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून प्रलोभने दाखवून आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.अशा फसवणूकीपासून उमेदवारांनी दक्षता घ्यावी, तसेच अशाप्रकारच्या कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये असे आवाहन ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.

  मंत्री महाजन म्हणाले की ग्रामविकास व पंचायत राज विभागांतर्गत राज्यातील 34 जिल्हा परिषदांतर्गत गट - क मधील 30 संवर्गातील एकूण 19 हजार 460 इतकी रिक्त पदे सरळसेवेने भरण्याबाबतची जाहिरात 05 ऑगस्ट, 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. जाहिरातीनुसार दि. 05 ते 25 ऑगस्ट, 2023 पर्यत ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहे.

  ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी सांगितले आहे की फसवणूक झाल्यास शासन अथवा जिल्हा परिषद जबाबदार राहणार नाही. कोणतीही व्यक्ती परिक्षेसंदर्भात आर्थिक मागणी करीत असल्याबाबत निदर्शनास आल्यास त्यांच्याविरुद्ध जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात यावी असे सर्व उमेदवारांना आवाहन करण्यात येत आहे.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८