आरोग्य विज्ञान विद्यापीठाची भूमिका महत्वाची-राज्यपाल रमेश बैस

आरोग्य विषयक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आरोग्य विज्ञान विद्यापीठाची भूमिका महत्वाची

नाशिक प्रतिनिधी : १२ ऑक्टोबर २०२३ (जिमाका वृत्तसेवा) बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्य विषयक विविध आव्हाने निर्माण होत आहेत. त्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची भूमिका महत्वाची आहे, असे प्रतिपादन राज्यपाल तथा विद्यापीठांचे कुलपती रमेश बैस यांनी केले.महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ येथे राज्यपाल बैस यांनी आज भेट देऊन विद्यापीठाचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. माधुरी कानिटकर आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. मिलिंद निकुंभ राज्यपालांच्या सचिव श्वेता सिंघल नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.राजेंद्र बंगाळ परीक्षा नियंत्रक डॉ.संदीप कडू यांच्यासह विद्यापीठाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 राज्यपाल बैस म्हणाले की गंभीर स्वरूपातील आरोग्य सेवांच्या आव्हानांचा सामना करण्याकरीता संशोधन आणि नाविन्यपूर्ण प्रकल्पांचा पाठपुरावा करण्यासाठी प्राध्यापक व संशोधकांना प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठ हे समाजाचा एक भाग असल्याने विद्यापीठाने आरोग्य सेवा व लोकांच्या समस्यांबाबत संवेदनशील असले पाहिजे.आयुर्वेद युनानी सिद्धी आणि होमिओपॅथी यासारख्या आयुषच्या इतर शाखांचेही विविध फायदे आहेत. देशातील विद्यार्थी मोठ्या संख्येने चीन युक्रेन आणि इतर देशांमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी जातात. त्यांच्यासाठी देशातच वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी अधिक परिसंस्था निर्माण करणे आवश्यक आहे. तसेच भारतातील आयुर्वेद आणि इतर आयुष विषयांमध्ये पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकण्यासाठी परदेशातील विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठाने प्रयत्न करावेत.वैद्यकीय क्षेत्रात येणाऱ्या विविध अभ्यासक्रमांसोबतच आजच्या काळात मानसिक आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असल्याने मानसिक आरोग्यावर भर देऊन त्याबाबत अभ्यास होणे देखील गरजेचे असल्याचे राज्यपाल बैस यांनी सांगितले.

 ज्येष्ठ नागरिकांची वाढती संख्या लक्षात घेता त्यांना वृद्धावस्थेत आरोग्य विषयक आवश्यक असणाऱ्या सोयीसुविधा विकसित करून त्या उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे वृद्ध रुग्णांच्या गरजा लक्षात घेऊन जेरियाट्रिक औषधांमध्ये आरोग्य सेवा व्यावसायिक तयार करून पायाभूत सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे. फिरते दवाखाने आणि टेलिमेडिसिन या महत्वपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून तफावत भरून काढता येऊ शकेल. यासोबतच आरोग्य विद्यापीठाने आरोग्य सेवेपासून वंचित नागरिकांसाठी देखील वैद्यकीय आणि आरोग्य शिक्षण कार्यशाळा आणि शिबिरांचे नियमितपणे आयोजन करावे अशा सूचनाही यावेळी राज्यपाल बैस यांनी दिल्या.

  औषध शस्त्रक्रिया आयुर्वेद होमिओपॅथी युनानी आणि सिद्ध या क्षेत्रातील शिक्षक आणि संशोधक या नात्याने विद्यापीठाकडे दर्जेदार डॉक्टर तयार करण्याची गुरुकिल्ली आहे.जी महाराष्ट्र आणि राज्याच्या बाहेर आरोग्य सेवेचे भविष्य घडवतील.तसेच वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांना रुग्णांसोबत संवाद साधण्याचेही प्रशिक्षण देणे आवश्यक आहे.वैद्यकीय विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये सातत्याने होत असलेल्या प्रगतीमुळे वैद्यकीय क्षेत्रातील अभ्यासक्रम सतत अद्ययावत आणि आधुनिक करणे महत्वाचे आहे. या आधुनिक व अद्ययावत अभ्यासक्रमाच्या धर्तीवर वैद्यकीय क्षेत्रातील पदवीधर हे नवीनतम ज्ञान आणि कौशल्यांनी सुसज्ज असतील. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आंतर-विद्याशाखीय शिक्षणावर भर देऊन रुग्णांच्या काळजीसाठी सर्वांगीण दृष्टिकोन वाढीस लागून औषधांच्या विविध शाखांच्या एकत्रीकरणास मदत होईल.तसेच आरोग्य विद्यापीठाच्या माध्यमातून फक्त देशासाठीच नव्हे तर जगासाठी आरोग्यसेवा कर्मचारी परिचारिका काळजीवाहक तयार करण्याची क्षमता आपल्यामध्ये असल्याचा विश्वास यावेळी राज्यपाल बैस यांनी व्यक्त केला.

राज्यपालांनी दिली संवेदना गार्डनला भेट

  आढावा बैठकीपूर्वी राज्यपाल बैस यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने तयार केलेल्या पंचेंद्रियांच्या संवेदनांची माहिती देणाऱ्या संवेदना गार्डनला भेट दिली.त्यावेळी आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. कानीटकर यांनी गार्डन विषयी व त्याअनुषंगाने विद्यापीठामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांची माहिती दिली.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८