कल्याण प्रतिनिधी विनायक चव्हाण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या टिटवाळा ग्रामीण परिसरातील टिटवाळा गणेशवाडी दर्ग्या जवळील आदिवासी पाडा टिटवाळा मन्याचा पाडा ठाकूरपाडा आदिवासी पाडा मांडा पूर्व येथील इंदिरानगर आदिवासी पाडा बल्याणी कातकरी वाडा आदिवासी पाडा मोहने आर एस टेकडी आदिवासी पाडा गाळेगाव आदिवासी पाडा गणेश विद्यालय आदिवासी पाडा टिटवाळा या भागातील रहिवाशांसाठी वर्षानुवर्षे पथदिव्यांची व्यवस्था नव्हती.
हे पथदिवे लावून देणे बाबत श्रमजीवी संघटनेकडून महापालिकेकडे वारंवार पाठपुरावा केला गेला होता आणि या आदिवासी पाड्यातील, ग्रामीण भागातील नागरिकांना पथदिव्यांची सुविधा मिळावी या दृष्टिकोनातून महापालिका आयुक्त यांनी याकामी यावर्षीच्या महापालिकेच्या अंदाजपत्रकात तरतूद ठेवण्यासाठी सहमती दर्शविली होती त्यानुसार विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांच्या पुढाकाराने या सर्व परिसरात 129 पथदिव्यांचे पोल बसवण्यात येऊन त्यावर दिवे बसविण्यात येत आहेत.
काल दीपावलीच्या मंगलमय दिवशी ठाकूरपाडा या परिसरातील पथदिवे पहिल्यांदाच उजळल्यामुळे सदर परिसरातील नागरिकांच्या चेहऱ्यावर प्रकाशमय आनंद दिसून येत होता.उर्वरित ग्रामीण परिसरातही आता हे पथदिवे बसवण्यात येणार असून या कामी सुमारे ७५ लक्ष इतका खर्च अपेक्षित असल्याची माहिती विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी दिली आहे.