कल्याण प्रतिनिधी विनायक चव्हाण : स्व.खाशाबा जाधव यांचा आदर्श सर्वांनी घ्यावा असे प्रतिपादन कोकण विभागाचे मा. शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी काल केले. कल्याण डोंबिवली महानगरपालिका व ठाणे जिल्हा आटयापाटया असोसिएशन यांच्या संयुक्त विदयमाने स्व.खाशाबा जाधव यांचा जन्म दिन महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन म्हणून महापालिकेच्या आचार्य अत्रे रंगमंदिरात काल संपन्न झाला त्यावेळी बोलतांना आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी हे प्रतिपादन केले. शिव छत्रपती पुरस्कार मिळण्यासाठी मेहनत घ्यावी लागते ग्रामीण भागातील मुलांनी मैदानाची मागणी केली तर ती उपलब्ध करुन दयावीत शिव छत्रपती पुरस्कार मिळालेल्या मुलांना शासकीय सेवेत नोकरी मिळावी ही मागणी मी अधिवेशनात केली आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
प्रखर राजकीय इच्छा शक्ती असेल तर जगात ऑलिंपिक मध्ये सर्वात जास्त पदके भारताला मिळू शकतील असा आशावाद ठाणे जिल्हा आटयापाटया असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ(आप्पा) शिंदे यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला.यश मिळालं तर ते डोक्यात जाता कामा नये, आपण समाजाचं देणं लागतो हे नेहमी लक्षात ठेवल पाहिजे चांगले संस्कार लाभले तर चांगला माणूस बनू शकतो असे उद्गार रणजीतसिंह खाशाबा जाधव यांनी आपल्या भाषणात काढले.
या समयी ठाणे जिल्हा आटयापाटया असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ(आप्पा) शिंदे, माजी आमदार नरेंद्र पवार स्व.खाशाबा जाधव यांचे सुपूत्र रणजीतसिंह जाधव त्यांच्या पत्नी भारती जाधव कल्याण तालुका शारीरिक शिक्षक मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण इंगळे पूर्वा मॅथ्यु लोकरे (NIS Coach & Sports Psychologist) सुप्रिया नाईकर प्राचार्य ग्लोबल कॉलेज डोंबिवली व पालक प्रतिनिधी शिव छत्रपती पुरस्कार विजेते प्रशांत पाटील अविनाश ओंबासे क्रीडा पत्रकार राष्ट्रीय शिक्षण संस्था डोंबिवलीचे अध्यक्ष संजय कुलकर्णी शिक्षण व क्रीडा विभागाचे उपआयुक्त धैर्यशील जाधव उपआयुक्त अर्चना दिवे वंदना गुळवे सहा.आयुक्त स्नेहा करपे तसेच महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम शिवाली परब निमिष कुलकर्णी व इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी महापालिका क्षेत्रातील क्रीडा-प्रगती आव्हान संधी या विषयावर आयोजिलेल्या परिसंवादात आपली मौलिक मते मांडली. यावेळी स्व.खाशाबा जाधव यांचे सुपूत्र रणजीतसिंह जाधव त्यांच्या पत्नी भारती जाधव तसेच पॅरा कबड्डी राष्ट्रीय खेळाडू-महापालिकेच्या उंबर्डे शाळेतील माजी विदयार्थी अजय सोमनाथ पाटील यांचा जगन्नाथ(आप्पा) शिंदे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. यासमयी महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम शिवाली परब निमिष कुलकर्णी यांनी आपल्या खुमासदार अदाकारीने कार्यक्रमाची रंगत वाढविली तर नियोजन व सूत्रसंचालन शिवछत्रपती पुरस्कार विजेते तथा महात्मा गांधी विद्यालय डोंबिवली चे माजी मुख्याध्यापक अंकुर आहेर यांनी केले.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे योग्य ते क्रीडा धोरण सर्वांचे सहकार्याने ठरविण्यात येईल.महापालिका क्षेत्रातील क्रीडांगणे विकसित करून योग्य त्या क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, त्याचप्रमाणे महापालिका क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना महानगरपालिकेकडून अनुदान उपलब्ध करून दिले जाईल असे प्रतिपादन शिक्षण व क्रीडा विभागाचे उपायुक्त धैर्यशील जाधव यांनी यावेळी केले.यावेळी महाराष्ट्र राज्य क्रीडा दिनाच्या जनजागृतीसाठी कल्याण पश्चिम येथील यशवंतराव चव्हाण क्रिडांगणापासून आचार्य अत्रे रंगमंदिरापर्यत क्रिडा जागर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सुमारे ४०० शालेय विदयार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला.