मुंबई प्रतिनिधी : मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याचे काम महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग करणार आहे.राज्यातील मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण शासकीय यंत्रणेमार्फत करण्यात येणार आहे.सर्वेक्षणासाठी सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे.२३ जानेवारी २०२४ पासून प्रत्यक्ष सर्वेक्षणाचे काम सुरु होणार असल्याचे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग मार्फत कळविण्यात आले आहे.
२० जानेवारी २०२४ रोजी जिल्ह्याच्या व महानगरपालिका मुख्यालयाच्या ठिकाणी तालुक्याच्या व वॉर्डस्तरीय प्रशिक्षकांना सॉफ़्टवेअर वापरण्याबाबतचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.हे प्रशिक्षक २१ व २२ जानेवारी २०२४ रोजी संबंधित तालुक्याच्या वॉर्डच्या ठिकाणी तालुक्यातील, वॉर्डमधील सर्व नियुक्त कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देतील व २३ जानेवारी २०२४ पासून प्रत्यक्ष सर्वेक्षणाचे काम सुरु होईल.हे सर्वेक्षण ३१ जानेवारी २०२४ पूर्वी पूर्ण होणार आहे.या सर्वेक्षण कामकाजासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांना आयोगामार्फत ओळखपत्र उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आयोगाने कळविले आहे.