शेतमालाला मिळाले ई-कॉमर्सचे शासकीय दालन

कृषी विभागाच्या महाॲग्रो ॲपचे धनंजय मुंडे यांच्या हस्ते अनावरण

मुंबई प्रतिनिधी : राज्यात उत्पादित होणारी कृषी उत्पादने आणि शेतमालाला आता डिजिटल ई कॉमर्सचे व्यासपीठ मिळाले असून कृषी विभागाच्या महा ॲग्रो ॲपचे अनावरण आज कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच या ॲपद्वारे खरेदी केलेल्या वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी महाराष्ट्र शासन व भारतीय पोस्ट यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. 

  यावेळी कृषिमंत्री मुंडे म्हणाले देशात मोबाईल इंटरनेट आणि इलेक्ट्रॉनिक पेमेंट क्रांती झालेली असून त्याचा सर्वाधिक फायदा ई-कॉमर्स क्षेत्राला झाला आहे.भविष्यात भारतातील ई-कॉमर्स २५० अब्ज डॉलरपर्यंत जाण्याची शक्यता आहे. याचा फायदा कृषी क्षेत्राला व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळावा यासाठी इलेक्ट्रॉनिक कॉमर्स मोबाईल ॲप व वेब प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न होता.पारंपरिक शेती आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न या अपद्वारे केला आहे.या ॲपच्या माध्यमातून शेतकरी बचत गट स्वयं सहाय्यता गट स्टार्टअप लहान मोठे व्यावसायिक व शेतकरी उत्पादक कंपन्यांची शेती उत्पादने प्रक्रिया केलेली उत्पादने व शेतीशी निगडीत उत्पादनांची ऑनलाईन विक्री होणार असल्याने एका नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे.

  या ॲपद्वारे ग्राहकांनी खरेदी केलेल्या वस्तू त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम भारतीय पोस्ट खाते व फर्स्ट अँड फास्ट लॉजिस्टिक करणार असल्यामुळे पोस्ट खात्यावरील विश्वास द्विगुणित होईल असेही यावेळी कृषीमंत्री मुंडे म्हणाले.यावेळी अपर मुख्य सचिव अनुप कुमार महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.मंगेश गोंदावले, महाव्यवस्थापक सुजित पाटील पोस्टमास्टर जनरल (बिझनेस डेव्हलपमेंट) अमिताभ सिंग पोस्टमास्टर जनरल के सोमसुंदरम मुंबई पोस्ट विभागाचे अजिंक्य काळे श्रद्धा गोकर्ण तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

बहुपयोगी ॲप

 ॲप अनावरणाच्या दिवशीच ३५८ उत्पादकांची १३७० उत्पादने या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्यात आली आहेत.त्याचबरोबर या ॲपवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हवामान खात्याची माहिती उपलब्ध होणार आहे. तसेच महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळामार्फत विविध प्रकारच्या कृषी मालाचे दैनंदिन भाव सुद्धा भविष्यात या पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

ॲप असे डाउनलोड करावे

  प्ले स्टोअर मध्ये हे ॲप Maha Agro Mart या नावाने उपलब्ध आहे.हे ॲप डाऊनलोड(लिंक-https://play.google.com/store/apps/details?id=com.maidc.mart) करून फ्लिपकार्ट ॲमेझॉन याप्रमाणेच 1370 उत्पादने खरेदी करता येऊ शकतात.या ॲपवरऑनलाइन पेमेंट सुद्धा करता येऊ शकते.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८