शिवछत्रपतींचा वसा पुढे नेण्यासाठी वचनबद्ध होऊ या

शिवछत्रपतींचा वसा पुढे नेण्यासाठी वचनबद्ध होऊ या


शिवराज्याभिषेक दिनानिमित्त जनतेला दिल्या शुभेच्छा  - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेमुंबई प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोक कल्याणकारी कारभाराचा जगापुढे आदर्श आहे. त्याअर्थाने ‘शिवराज्याभिषेक दिन’ हा ‘संकल्प दिन’ मानून शिवछत्रपतींनी दिलेला वसा पुढे नेण्यासाठी वचनबद्ध होऊ या, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.


        शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन म्हणजे महाराष्ट्राच्या हृदयावर कोरलेला एक अपूर्व मंगल क्षण. क्षणोक्षणी केवळ रयतेच्या सुखाचा विचार करणाऱ्या शिवछत्रपतींवर अढळ श्रद्धा ठेवून वाटचाल करण्याचा हा संकल्प दिन. त्यांचा लोक कल्याणकारी राज्य कारभार जगात आदर्श मानला जातो. आव्हानांवर मात करताना धीरोदात्तपणे पुढे जाण्याचा त्यांचा बाणा आज मार्गदर्शक ठरतो आहे. त्यांनी दाखविलेल्या वाटेवरून पुढे जाण्यासाठी,  दिलेला हा वसा आणि वारसा पुढे नेण्यासाठी आपण वचनबद्ध होऊ या. हे वचन त्यांच्या चरणी अर्पण करू या. यानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. शिवछत्रपतींना त्रिवार मुजरा


शिवराज्याभिषेक दिना’निमित्त उपमुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, राज्यकारभाराचा आदर्श महाराष्ट्राला सदैव मार्गदर्शन व प्रेरणा देत राहील -  उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन


            छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात रयतेचं राज्य, हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. ‘प्रजा सुखी तरच राजा सुखी’ या न्यायाने राज्यकारभार केला. महान योद्धा, कुशल प्रशासक, लोककल्याणकारी, प्रजाहितदक्ष राजा ही ओळख निर्माण केली. राजनिती, युद्धनिती, अर्थकारण, मानवतावाद, पर्यावरणसंवर्धन, कुशलतेसह भविष्याचा वेध घेण्याचं द्रष्टेपण असलेले ते राजे होते. त्यांनी गाजवलेलं शौर्य, केला पराक्रम, घालून दिलेला राज्यकारभाराचा आदर्श महाराष्ट्राला सदैव मार्गदर्शन व प्रेरणा देत राहील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे स्मरण करुन त्यांना त्रिवार वंदन केले आहे. महाराष्ट्रातील जनतेला शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.


         उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुष आहेत. त्यांच्यासारखा महामानव एकदाच जन्म घेतो आणि अखिल मानवजातीचे कल्याण करुन जातो. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या जीवनात केलेले कार्य अलौकिक आहे. त्यांनी महाराष्ट्राची अस्मिता जागवली. महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यातल्या मावळ्यांना, अठरापगड जातींना एकत्र करुन त्यांच्या मनात, स्वाभिमानाचे, स्वराज्याचे बीज रुजवले. महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला आपले वाटेल, जिथे सर्वांना न्याय मिळेल असे स्वराज्य निर्माण केले. शेतकऱ्यांना न्याय दिला. कष्टकऱ्यांना स्वाभिमान दिला. शिवराज्याभिषेकाने महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा दिला. त्यांच्यासारखा राजा मिळाला म्हणूनच शिवराज्याभिषेक दिनाचे आपल्या जीवनात सर्वाधिक महत्त्व आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक, शेतकऱ्यांचे कैवारी, रयतेचे राजे, युगप्रवर्तक अशी ओळख असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना, शिवराज्याभिषेक दिनानिमित्त वंदन करत असताना त्यांच्या विचारांना आदर्श मानून, त्यांनी दाखवलेल्या मार्गाने चालण्याचा निर्धार करुया, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कृतज्ञता, आदर व्यक्त करुन राज्यातील जनतेला शिवराज्याभिषेकाच्या शुभेच्छा दिल्या.


     दिगंबर वाघ


               कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८


 


                 घरी राहा, सुरक्षित राहा 
                 प्रशासनाला सहकार्य करा...