ठाणे जिल्ह्यातील महापालिका आयुक्तांशी बैठक 

कोरोनाशी लढताना पालिकांनी नागरिक, स्वयंसेवी संस्था यांना सहभागी करून घ्यावे मुंबईसारख्या कोविड रुग्णालयांच्या मोठ्या सुविधा तातडीने उभारा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  


मुंबई दि. 9 : ठाणे जिल्ह्यात कोरोनाची वाढती साथ चिंताजनक आहे. मात्र कोरोनाची एकांगी लढाई लढू नका, आपापल्या शहरांतील नागरिकांना, स्वयंसेवी संस्थाना यात सहभागी करून घ्या जेणे करून या साथीवर नियंत्रण मिळविणे सोपे जाईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. त्यांनी आज ठाणे जिल्ह्यातील सर्व पालिका आयुक्तांची व्हीसीद्वारे बैठक घेऊन  आढावा घेतला व महत्वाच्या सूचना केल्या. 


            यावेळी मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता यांनी देखील सर्व आयुक्तांना कोरोनाचा संसर्ग कोणत्याही परिस्थितीत रोख्ण्यासाठी कठोर पाउले उचलण्यास सांगितले. 


            मुख्यमंत्री यावेळी बोलताना म्हणाले की, या तीन चार महिन्यांच्या लढाईत काय करावे आणि काय करू नये याविषयी सर्वाना पुरेशी माहिती झाली आहे. तसेच सर्व सुचना आणि निर्देश स्वयंस्पष्ट असतात. याप्रमाणे सर्व आयुक्तांनी अधिक बारकाईने लक्ष घालून कारवाई केली तर आपल्याला अपेक्षीत यश मिळेल अशी मला खात्री आहे. यापूर्वीचे पालिकांतील काही अधिकारी बदलले कारण ते कार्यक्षम नव्हते असे नाही पण आता कोरोनाची वाढ गुणाकारासारखी होते आहे त्यामुळे आपल्याला खूप तातडीने पाउले उचलणे गरजेचे आहे. आपण पुढे काही करण्याचा आता दररोज रुग्ण संख्या झपाट्याने वाढताना दिसते.


मुंबईसारख्या मोठ्या सुविधा उभारा


       आज मार्च पासून जुलै पर्यंतच्या कालावधीत आपण जम्बो सुविधा उभारण्यावर भर दिला. आज मुंबईमध्ये ज्या रीतीने या सुसज्ज सुविधा निर्माण झाल्या आहेत तशा त्या महानगर क्षेत्रातही होणे अपेक्षित होते आणि वारंवार तशा सुचना देण्यात आल्या होत्या, पण पाहिजे तेवढ्या सुविधा उभारलेल्या दिसत नाहीत. येणाऱ्या काळात रुग्ण संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन तातडीने अजूनही या सुविधा प्रत्येक पालिका क्षेत्रात उभारणे सुरु करा. यात मोठे उद्योग, कंपन्या, संस्था यांची देखील मदत घ्या. मुंबईतील सुविधा म्हणजे जागा दिसली आणि उभारले तंबू अशा नाहीत. प्रत्येक ठिकाणी व्यवस्थित ड्रेनेज, शौचालय, पिण्याचे पाणी या सोयी आहेत. आयसीयू, डायलेसिस सुविधा आहेत. पालिकांनी आवश्यक त्या औषधांचा पुरेसा साठा करून ठेवणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले 


शहरांत कोरोना दक्षता समित्या नेमा       


            स्वातंत्र्यांच्या काळात देशभर जे वातावरण निर्माण झाले ते नागरिकांच्या , जनतेच्या सहभागामुळे. नुकतेच चीन संदर्भात लोकांनी स्वत:हुन चीनी वस्तूंवर बहिष्कार घातला आणि एक मोठा संदेश दिला. त्याप्रमाणेच कोरोनाची ही लढाई फक्त सरकारची नाही. वाड्या आणि वस्त्या, कॉलनीजमध्ये नागरिकांच्या कोरोना दक्षता समित्या बनवा. स्वयंसेवी संस्था, युवकांना यात सहभागी करून घ्या. ज्येष्ठ नागरिक, वयोवृद्ध नागरिक यांना दुसरे काही आजार आहेत का तसेच त्यांची ऑक्सिजन पातळीबरोबर आहे का , परिसरात कुणाला काही आजार आहेत का, स्वच्छता  नियमित केली जाते का, लोक मास्क घालतात का  या तसेच इतर अनेक बाबतीत या नागरिकांच्या समित्याची आपणास मदत होईल.  मुंबईत २०१० मध्ये  मलेरिया, डेंग्यूच्यावेळी मुंबईच्या वस्त्यावस्त्यांत लोकांच्या मदतीने फवारणी केली होती. त्याप्रमाणे मिशन मोडवर हे काम सर्वांनी करावे. लोकांमध्ये जिद्द निर्माण करा म्हणजे ही लढाई लढणे सोपे जाईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.  


      याप्रसंगी अजोय मेहता यांनी ठाणे जिल्ह्यात कोरोनाची साथ झपाट्याने पसरत असून हा केवळ राज्यासाठी नव्हे तर देशासाठी सुद्धा चिंतेचा विषय बनला आहे असे सांगितले. रुग्णांचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे, संस्थात्मक विलगीकरण वाढविणे, उद्योग व कंपन्यांच्या मदतीने त्यांच्या परिसरात चाचण्या करणे, उपचारांची सुविधा वाढविणे, नॉन कोव्हीड रुग्णांना वेळीच उपचार मिळावेत, सर्व पालिकांमध्ये समान प्रमाणात बेड्सचे नियोजन असावे. ऑक्सिजन सुविधा असलेले बेड्स वाढवावे, पावसाळा असल्याने सर्दी, तापाचे, खोकल्याचे रुग्ण यांना उपचार मिळण्याकडे लक्ष द्यावे असे सांगितले. यावेळी विविध पालिका आयुक्तांनी त्यांच्या क्षेत्रात करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.विभागीय आयुक्त लोकेश चंद्र यांनी देखील आपल्या सुचना केल्या.


      दिगंबर वाघ  


       कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८


 


घरी थांबा, कोरोना टाळा, कोरोना योध्दासह पोलिसांना सहकार्य करा, अफवांना बळी पडू नका, आपणच घेऊ आपली काळजी 🙏