कृषीपंपाच्या वीजजोडणीच्या योजनांना गती द्या

कृषिपंपांच्या वीजजोडण्यांसाठी सौर कृषिवाहिनी, एचव्हीडीएस योजनेच्या कामांना आणखी वेग द्या


पुणे विभागाच्या आढावा बैठकीत ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांचे आदेशमुंबई प्रतिनिधी : शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनीचे जलदगतीने पूर्ण करण्यात यावे तसेच उच्चदाब वितरण प्रणाली (एचव्हीडीएस) योजनेच्या कामांना आणखी वेग देण्यात यावा, असे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आज दिले. पुणे प्रादेशिक विभागातील विविध कामे व योजनांची आढावा बैठक मुंबई येथे मंत्रालयात झाली. यावेळी ऊर्जामंत्री डॉ. राऊत बोलत होते. यावेळी महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी सुरळीत वीजपुरवठा व वीजबिलांच्या अनुषंगाने महत्वाच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या. 


    पुणे प्रादेशिक विभागात सुरु असलेल्या विविध योजनांची प्रभावी व वेगवान अंमलबजावणी करण्यात यावी तसेच कंत्राटदारांकडून सुरु असलेली कामे व त्याचा दर्जा याचे पर्यवेक्षण करण्यात यावे असे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी दिले. वीजग्राहकांना नवीन वीजजोडणी तत्परतेने देण्यासाठी मुबलक प्रमाणात वीजमीटर उपलब्ध करून देण्यात यावेत तसेच वीजबिलासंबंधीच्या सर्व तक्रारींचे निराकरण करून ग्राहकांचे समाधान करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या. उच्चदाब वितरण प्रणाली (एचव्हीडीएस) योजनेतून कृषिपंपांना नवीन वीजजोडणी देण्याचे काम वेळेत पूर्ण न करणाऱ्या व निकृष्ट कामे करणाऱ्या कंत्राटदारांविरुद्ध त्वरीत कारवाई करावी. सौर कृषिपंप योजना व सध्या चालू असलेल्या इतर योजनांमध्ये प्रतीक्षा यादीप्रमाणे कृषी ग्राहकांना जोडण्या देण्यात याव्यात. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीय घटकातील शेतकऱ्यांना जोडणी देण्यासाठी असलेल्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच कृषिपंपांच्या वीजजोडणीसाठी ज्या शेतकऱ्यांनी निवड होऊ शकली नाही त्यांच्याशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रांची पूर्त करून घ्यावी. साडेसात एचपी क्षमतेसाठी सौर कृषिपंपांची योजना तपासून पाहण्याचे आदेश ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी दिले. 


    पुणे प्रादेशिक विभागात वीजहानीचे प्रमाण कमी करून महसूल वाढविण्यासाठी उपाययोजना करावी. रोहित्र नादुरुस्तीचे प्रमाण कमी करणे आदींसोबत वीजबिल व वीजपुरवठ्यासंबंधीच्या तक्रारींचे वेळेत निराकरण करण्याची दक्षता घेण्यात यावी, अशा सूचना डॉ. राऊत यांनी दिल्या. या आढावा बैठकीत महावितरणचे संचालक (संचालन) दिनेशकुमार साबू, संचालक (वाणिज्य) सतीश चव्हाण, पुणे प्रादेशिक विभागाचे प्रभारी प्रादेशिक संचालक अंकुश नाळे तसेच व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्य अभियंता सचिन तालेवार (पुणे), सुनील पावडे (बारामती), अंकुर कावळे (प्रभारी कोल्हापूर) आदी उपस्थित होते.


   दिगंबर वाघ  


       कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८


 


घरी थांबा, कोरोना टाळा, कोरोना योध्दासह पोलिसांना सहकार्य करा, अफवांना बळी पडू नका, आपणच घेऊ आपली काळजी 🙏