राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई प्रतिनिधी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृह महाराष्ट्रातील तमाम जनतेचे तीर्थक्षेत्रच आहे. या राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाजकंटकांना इशारा दिला आहे.
मुख्यमंत्री म्हणतात, राजगृहाच्या आवारात घुसून काही गुंडांनी धुडगूस घातला हे धक्कादायक आहे. ही वास्तू फक्त आंबेडकरी जनतेची नाही तर संपूर्ण समाजाचे श्रद्धास्थान आहे. आपला ग्रंथ खजिना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी या वास्तूत जपून ठेवला आहे. राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही. याबाबत पोलिसांना कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत
". बाबासाहेबांचे कार्य, विचारांवरील श्रद्धेला कुणीही धक्का लावू शकत नाही”
‘राजगृह’ तोडफोडीची घटना निषेधार्ह, विकृत मानसिकतेतून;
शासनाकडून गंभीर दखल, शांतता, संयम पाळण्याचे आवाहन - उपमुख्यमंत्री अजित पवार
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील ऐतिहासिक महत्वाच्या ‘राजगृह’ निवासस्थानी झालेली तोडफोडीची घटना अत्यंत निषेधार्ह असून हे समाजविघातक विकृत मानसिकतेचे दुष्कृत्य आहे. राज्य शासनाने घटनेची गंभीर दखल घेतली असून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून तपासकार्य सुरु केले आहे. आरोपींना लवकरात लवकर शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी असे दुष्कृत्य करणाऱ्या समाजविघातक शक्तींच्या कुहेतूला बळी पडू नये. शांतता, संयम पाळावा, एकजूट कायम ठेवावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. महामानव डॉ. बाबासाहेबांचे कार्य आणि विचार समाजमनात खोलवर रुजले आहेत, आपल्या सर्वांची त्यांच्यावर भक्कम श्रद्धा आहे, त्या श्रद्धेला कुणीही धक्का लावू शकत नाही, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.
दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८
घरी थांबा, कोरोना टाळा, कोरोना योध्दासह पोलिसांना सहकार्य करा, अफवांना बळी पडू नका, आपणच घेऊ आपली काळजी 🙏