ग्रामीण भागात कोविड केअर सेंटर ठरणार उपयुक्त
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
एमआयडीसी येथील महाड उत्पादक संघ कोविड केअर सेंटरचे ऑनलाईन लोकार्पण
अलिबाग प्रतिनिधी : महाड येथील एमआयडीसीमध्ये 200 बेड मर्यादेचे उभारलेले कोविड केअर सेंटर कोविड-19 शी एकजुटीने लढा देताना उपयुक्त ठरणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले. केएसएफ कॉलनीत महाड उत्पादक संघाच्या वतीने उभारण्यात आलेल्या 200 बेडची क्षमता असलेल्या कोविड केअर सेंटरच्या ई-उद्घाटन व लोकार्पण कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. देवा ड्रील कंपनीचे अध्यक्ष मोहनकुमार व महाड उत्पादक संघाचे अध्यक्ष संभाजी पाठारे यांच्या सहकार्याने हे केअर सेंटर उभारण्यात आले आहे. यावेळी पालकमंत्री कु.आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, हे या कार्यक्रमास ऑनलाईन उपस्थित होते. तर खासदार सुनील तटकरे, आमदार भरतशेठ गोगावले, माजी आमदार माणिकराव जगताप, जिल्हाधिकारी निधी चौधरी, उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार, जिल्हा आरोग्य डॉ.सुधाकर मोरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.भास्कर जगताप, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बिरासदार, महाड उत्पादक संघाचे अध्यक्ष संभाजी पाठारे, उपाध्यक्ष अशोक तलाठी, डॉ. फैसल देशमुख हे प्रत्यक्ष उपस्थित होते.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे पुढे म्हणाले, गेले काही महिने राज्यात दर दिवसागणिक टेस्टींग लॅब, कोविड केअर सेंटर उभे केले व या करोनाच्या साथीला समर्थपणे तोंड दिले. राज्यातील सत्तेत चांगले सहकारी मिळाले म्हणून हे शक्य झाले आहे, म्हणूनच हे श्रेय माझे एकट्याचे नसून जीवापाड मेहनत घेणाऱ्या तुम्हा सर्वांचे आहे.
नागरिकांनी अनावश्यक प्रवास करू नये
करोनाचे संकट अद्याप टळले नसून करोना आता हात-पाय पसरु लागला आहे. मोठमोठ्या व्हीआयपींकडे असणारे सुरक्षा कवच भेदून तो शिरकाव करू लागला आहे. देशाचे गृहमंत्री, अन्य राज्यातील राज्यपाल, मुख्यमंत्री यांना करोनाची लागण झाल्याची उदाहरणे आपल्यासमोर येत आहेत, असे सांगून मुख्यमंत्री ठाकरे यांनी अशा परिस्थितीत आपण गाफील राहता कामा नये, असे आवाहन जनतेला करीत गावपातळीवर करोना दक्षता समिती स्थापन करावी, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिली. तसेच गणेशोत्सवामध्ये चाकरमान्यांच्या येण्याजाण्याची व्यवस्था राज्य सरकार करीत आहे, मात्र नागरिकांनी अनावश्यक प्रवास करणे टाळून वाहतूक व रहदारी कमी करावी, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी शेवटी केले.
पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना या कार्यक्रमासाठी वेळ दिल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सर्वप्रथम आभार मानले व या संकट काळात आरोग्य सुविधा कमी पडू नये यासाठी शासनाचे प्रयत्न सुरुच आहेत. उद्योग विभागाकडूनही विविध माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे सांगून महाडचे ट्रॉमा केअर सेंटर पूर्ण क्षमतेने सुरु करणे गरजेचे असून त्यासाठी प्रयत्न व्हावा, अशी विनंती मुख्यमंत्री ठाकरे यांना केली.
खासदार सुनिल तटकरे यांनी करोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्यात आरोग्यविषयक आवश्यक त्या उपाययोजना राबवून रयतेची धुरा मुख्यमंत्री या नात्याने आपण समर्थपणे पेलत आहात, असे सांगत मुख्यमंत्र्यांना विशेष धन्यवाद दिले. तसेच या रोगाबाबतची भीती दूर व्हावी यासाठी औद्योगिक वसाहतींचे मोठे योगदान असून महाड उत्पादक संघाने पुढाकार घेवून उपलब्ध करुन दिलेल्या या कोविड केअर सेंटरचा लाभ महाड, पोलादपूर, माणगाव तालुक्यातील तसेच लगतच्या तालुक्यातील जनतेलाही होईल असे सांगून या कोविड केअर सेंटरचा वापर कमीत कमी करण्याची वेळ यावी, अशी सदिच्छा तटकरे यांनी यावेळी व्यक्त केली.
आमदार भरतशेठ गोगावले यांनी रायगड जिल्ह्यात महाड उत्पादक संघाच्या पुढाकारातून होणारे कोविड केअर सेंटर हे अत्याधुनिक असून यामध्ये 114 सामान्य कोविड केअर रुग्णांसाठी, 86 ऑक्सिजन सुविधेसह बेड आणि 10 अतिदक्षता विभागातील बेड असतील अशी माहिती देवून सामाजिक बांधिलकी जपत महाड उत्पादक संघाने उभारलेल्या या कोविड केअर सेंटरबद्दल कौतुक केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस महाड उत्पादक संघाचे अध्यक्ष संभाजी पाठारे यांनी कोविड केअर सेंटर बाबतची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. या कार्यक्रमाला महाड परिसरातील सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांची उपस्थिती होती. करोनाच्या पार्श्वभूमीवर उपस्थित सर्वांनी तोंडाला मास्क लावून व सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करीत शासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन केले.
दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८
घरी थांबा, कोरोना टाळा, कोरोना योध्दासह पोलिसांना सहकार्य करा, अफवांना बळी पडू नका, आपणच घेऊ आपली काळजी 🙏