देश महान मुत्सद्दी नेत्यास मुकला
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रणव मुखर्जी यांना आदरांजली
मुंबई प्रतिनिधी : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनाने देश एका महान मुत्सद्दी नेत्यास मुकला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदरांजली वाहिली. गेली किमान ६० वर्षे प्रणव मुखर्जी राजकारणात सक्रिय होते. त्यांचे राजकारण काँग्रेसधार्जिणे असले तरी सदैव राष्ट्रहिताचाच विचार करून त्यांनी आपली पावले टाकली. केंद्रीय मंत्रिमंडळातील संरक्षण, अर्थ यासह अनेक महत्त्वाची खाती त्यांनी सांभाळली, पण अर्थमंत्री म्हणून त्यांची छाप सर्वाधिक राहिली. त्यांचे वाचन अफाट होते. त्यांची निरीक्षणशक्ती अचाट होती आणि ते कमालीचे हजरजबाबी होते. काँग्रेस पक्ष संकटात असताना अनेकदा वादळातील नौका किनाऱ्याला लावण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली.
उत्तम पंतप्रधान होण्याची क्षमता त्यांच्यात होती, पण ते देशाचे राष्ट्रपती झाले. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना खुला पाठिंबा दिला. प्रणवबाबूंसारख्या विद्वान, अनुभवी व्यक्तीची राष्ट्रपती भवनात गरज आहे, असे शिवसेनाप्रमुखांचे मत होते आणि त्याबाबत प्रणवबाबू नेहमीच कृतज्ञता व्यक्त करत.प्रणवबाबू आपल्यातून निघून गेले. त्यांचा प्रभाव देशाच्या राजकारणावर प्रदीर्घ काळ राहील. महाराष्ट्राच्या जनतेतर्फे मी त्यांना आदरांजली वाहत आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक संदेशात म्हटले आहे.
प्रणव मुखर्जी यांच्या निधनाने भारतमातेचा एक सेवक हरपला
- देवेंद्र फडणवीस यांची शोकसंवेदना
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनाने भारतमातेचा सेवक हरपला आहे, अनेक जबाबदार्यांच्या माध्यमातून त्यांनी देशाच्या विकासासाठी दिलेले योगदान अतुलनीय असेच आहे, असे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. प्रणवदा यांच्या निधनाच्या वृत्त धक्कादायक आहे. त्यांना भारतरत्न जाहीर झाले, तेव्हा त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव महाराष्ट्र विधानसभेत मांडण्याची संधी मला मिळाली होती. केंद्रात अर्थमंत्री, संरक्षणमंत्री, वाणिज्य आणि परराष्ट्र व्यवहार अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या. सुमारे 50 वर्ष विविध जबाबदार्यांच्या माध्यमातून त्यांनी देशाची सेवा केली. गांधी विचारधारेचे ते खंदे समर्थक आणि अनुयायी होते. अनेक लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी आणि आर्थिक सुधारणांच्या ते अग्रस्थानी होते. भारतीय राजकारणातील एका महनीय नेतृत्त्वाचे असे आपल्यातून निघून जाणे, हे मनाला व्यथित करणारे आहे. त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचे कुटुंबीय, आप्तस्वकियांच्या तसेच देशवासियांच्या दु:खात आपण सहभागी आहोत, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८
घरी थांबा, कोरोना टाळा, कोरोना योध्दासह पोलिसांना सहकार्य करा, अफवांना बळी पडू नका, आपणच घेऊ आपली काळजी 🙏