साथीच्या आजारांवर मात करण्यासाठी रूग्णालये उभारणार

साथींच्या आजारांवर मात करण्यासाठी राज्यभरात कायमस्वरूपी संसर्ग रुग्णालये उभारणार


                     - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे



ठाणे प्रतिनिधी : विकासात्मक कामांच्या व्यतिरिक्त आरोग्याच्या पायाभूत सुविधांना आणि सुविधांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल. भविष्यात साथींच्या आजारावर मात करण्यासाठी राज्यभरात समर्पित कायमस्वरूपी संसर्ग रुग्णालये उभारण्याची नितांत आवश्यकता असुन त्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील आहे असे मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांनी सांगितले. कोविडशी लढताना राज्यातील पालिकांना निधी कमी पडू दिला जाणार नाही असेही ते म्हणाले. 


       महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) व मिरा-भाईंदर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने भाईंदर पूर्व येथे कोरोनाबाधित रुग्णांवरील उपचारासाठी उभारलेल्या दोन स्वतंत्र अद्ययावत समर्पित कोविड आरोग्य केंद्रांचे ई लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. 


      यावेळी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड,  मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महापौर ज्योत्स्ना हसनाळे, खा. राजन विचारे, आ. प्रताप सरनाईक, आ. गीता जैन, आ. रविंद्र चव्हाण, आ. रविंद्र फाटक आयुक्त विजय राठोड यांसह मनपा पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी उपस्थित होते.


      यावेळी मार्गदर्शन करतांना मुख्यमंत्री यांनी  सांगितले की, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी यंत्रणातील समन्वय अत्यंत महत्त्वाचा आहे .  क्वारंटाईन सुविधांचे नेटके व्यवस्थापन करण्यासोबतच ट्रेसिंग ट्रॅकींग आणि टेस्टींगही मोठ्या प्रमाणात कराव्यात.सर्व यंत्रणांनी  मृत्यूदर रोखण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत. कोरोना रुग्णांना उपचारादरम्यान अतिशय काळजीपूर्वक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. योग्य औषधोपचाराबरोबरच  रुग्णाची योग्य कळजी आणि रुग्णसेवा अत्यंत महत्त्वाचीअसुन यामध्ये हयगय अथवा  दुर्लक्ष होता कामा नये. या बाबीवरही स्थानिक प्रशासनाने लक्ष केंद्रित केल्यास मृत्यूदर कमी करणे शक्य होईल  असे मुख्यमंत्र्यांनी  सांगितले.मनपांना निधीची कमतरता पडु देणार नाही.  स्थानिक प्रशासनाने कोरोना संसर्ग रोखण्याची जबाबदारी घ्यावी,प्रभावी उपाययोजना कराव्यात यासाठी शासनाकडून आवश्यक ती मदत केली जाईल. मनपांना निधीची कमतरता पडु देणार नाही असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. स्थानिक यंत्रणेला औषधांचा पुरेसा साठा करुन देण्यात येईल परंतु औषधांचा वापर कसा होतो याबाबत सदैव जागरुक राहुन नियमांची अत्यंत काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यावर भर द्यावा अशा सुचना  ठाकरे यांनी केल्या. सदैव  दक्ष राहण्यासोबतच रुग्ण शोधणे आणि त्यांना तात्काळ वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देणे यासाठी प्रशासन व जनता यांच्यात समन्वय असणे आवश्यक आहे. जनतेमध्ये सुरक्षित अंतर, मास्क वापरणे याबाबत जागरुकता आणण्याची आवश्यकता  आहे. नागरिकांनीही नियमांचे काटेकोर पालन केले पाहिजे असेही मुख्यमंत्री म्हणाले.


        पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले, मिरा भाईंदर मानपा हद्दीत कोरोनाबाबत चाचण्या, संपर्क शोधणे, बेड व रुणवाहिका व्यवस्थापन अत्यंत काळजीपुर्वक करण्यात येत आहे. प्रतिबंधित क्षेत्रात बंधने पाळली जातील व नियमांची अत्यंत काटेकार अंमलबजावणी होईल, याबाबत दक्षता घेण्यात येत आहे. नगराविकास विभागाकडून पुरेसा निधी  उपलब्ध करुन देण्यात येत आहे. या मनपा क्षेत्रात अलगीकरण व विलगीकरण सुविधांची आवश्यकता आहे. त्या निर्माणकरण्यावर विशेष भर देण्यात येत आहे, अँटीजन टेस्ट सुरु रुग्ण शोधणे आणि त्यांचे  जास्तीत जास्त संपर्क जलदरित्या शोधणे याची प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यात नक्कीच यश मिळेल असा विश्वासही पालकमंत्री  शिंदे यांनी व्यक्त केला.


       गृहनिर्माण मंत्री  जितेंद्र आव्हाड यांनी म्हाडाच्यावतीने उभारण्यात आलेल्या या सुविधांबाबत माहिती दिली. भविष्यात म्हाडाकडे सोपविण्यात येणाऱ्या जबाबदाऱ्या सक्षमपणे पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगून कोरोना संकट लवकर दुर व्हावे ही अपेक्षा व्यक्त केली. आ. प्रताप सरनाईक, महापौर ज्योत्स्ना हसनाळे  यांनी मनोगत व्यक्त केले. 


        मनपा आयुक्त विजय राठोड यांनी मनपाच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. आतापर्यंतची कोरोना बाधित रुग्णांची सद्यस्थिती,  कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या,  बाधित रुग्णांची क्षेत्रनिहाय माहिती, नमुना तपासणी प्रयोगशाळा आदि विषयी सविस्तर माहिती दिली.


अद्ययावत समर्पित कोविड आरोग्य केंद्र


      भाईंदर पूर्व  येथील स्व. प्रमोद महाजन सभागृह, गोपाळ पाटील रोड येथे अद्ययावत समर्पित कोविड आरोग्य केंद्राची (Dedicated Covid Health Center) उभारणी करण्यात आली आहे. ७ हजार ९८० चौरस फूट जागेमध्ये उभारलेल्या या आरोग्य केंद्रात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी एकूण २०६ बेड आहेत. हे सर्व बेड ऑक्सिजन सुविधा असलेले आहेत. या केंद्रात नोंदणी, बाह्यरुग्ण व अतिदक्षता विभाग तयार करण्यात आले असून अतिदक्षता विभागात दोन व्हेंटिलेटर्सची व्यवस्था करण्यात आली आहे. या आरोग्य केंद्राच्या ठिकाणी सहा किलोलिटर साठवण क्षमता असणारी ऑक्सीजन टाकी बसवण्यात आली आहे.


       भाईंदर पूर्व (जि. ठाणे) येथील स्व. मीनाताई ठाकरे मंडई येथे उभारण्यात आलेल्या दुसऱ्या समर्पित कोविड आरोग्य केंद्रात (DCHC) कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी एकूण १६५ बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. हे सर्व बेड ऑक्सिजन सुविधा असलेले आहेत. याही आरोग्य केंद्राच्या ठिकाणी सहा किलोलिटर साठवण क्षमतेची ऑक्सिजन टाकी उभारण्यात आली आहे. 


       या दोन्ही आरोग्य केंद्रांमध्ये रुग्णांवर उपचारासाठी वैद्यकीय तज्ञ व कर्मचारी २४ तास कार्यरत राहणार आहेत. तसेच विविध चाचण्यांसाठी पॅथॉलॉजी लॅबही उभारण्यात आली आहे. केंद्रात रुग्णांसाठी खानपानाची सुविधा असणार आहे. तसेच रुग्णांसाठी स्वतंत्र शौचालय व स्नानगृह उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच पावसाळ्याच्या दृष्टीनेही नियोजन करण्यात आले आहे.


     दिगंबर वाघ  


कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८


 


घरी थांबा, कोरोना टाळा, कोरोना योध्दासह पोलिसांना सहकार्य करा, अफवांना बळी पडू नका, आपणच घेऊ आपली काळजी 🙏