अफगाणिस्तानच्या महिला वाणिज्यदूत यांनी घेतली राज्यपालांची भेट

अफगाणिस्तानच्या मुंबईतील पहिल्या महिला वाणिज्यदूत


झाकिया वर्दक यांनी घेतली राज्यपालांची भेट  मुंबई प्रतिनिधी : अफगाणिस्तानच्या मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत झाकिया वर्दक यांनी आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. अफगाणिस्तानची मुंबईतील पहिली महिला वाणिज्यदूत असल्याचा अभिमान वाटत असल्याचे सांगून झाकिया वर्दक यांनी आपल्या कार्यकाळात भारत आणि अफगाणिस्तानमधील व्यापार वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे राज्यपालांना संगितले.


    भारताने अफगाणिस्तानच्या संसदेची इमारत बांधून दिली तसेच अफगाणिस्तानच्या अनेक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देत असल्याबद्दल वर्दक यांनी भारताचे आभार मानले. चाबहार बंदर प्रकल्प उभय देशांमधील व्यापार वृद्धीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असल्याचे सांगून न्हावाशेवा तसेच कांडला येथून चाबहारमार्गे थेट व्यापार होऊ शकतो असे त्यांनी सांगितले. या संदर्भात चाबहार बंदर प्रकल्पाचा अधिकतम वापर होण्यात उद्भवणाऱ्या नियमात्मक अडचणी सोडविण्यासाठी भारताने मदत करावी अशी विनंती वर्दक यांनी राज्यपालांना केली.


   भारतासोबत व्यापार वाढविण्यात येणाऱ्या अडचणी तसेच त्यावरील संभाव्य उपाय नमूद केल्यास आपण समस्यांचा परराष्ट्र मंत्रालयाकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन राज्यपालांनी यावेळी दिले. अफगाणिस्तान येथे आपण अनेक भारतीयांच्या सहवासात वाढलो. भारत आणि अफगाणिस्तान येथील लोकजीवन बरेचसे सारखे आहे. पेहराव, भाषा, खाद्यपदार्थ व संस्कृती देखील सारखी आहे. बॉलिवूडमधील चित्रपटांमुळे हिंदी भाषा तेथे बहुतेकांना समजते असे झाकिया वर्दक यांनी राज्यपालांना सांगितले.


 दिगंबर वाघ  


कार्यकारी संपादक-९४०४४५३५८


 


माझे कुटुंब,माझी जबाबदारी, मास्क वापरा आणि कोरोना योध्दा यांना सहकार्य करा..