राजभवन येथे सत्यनिष्ठा प्रतिज्ञा

दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त राजभवन येथे सत्यनिष्ठा प्रतिज्ञामुंबई प्रतिनिधी : दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त मंगळवारी राजभवन येथे सत्यनिष्ठा प्रतिज्ञा देण्यात आली तसेच राज्यपाल भगत सिंह कोश्यारी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संदेशांचे वाचन करण्यात आले.देशाच्या आर्थिक, सामाजिक तथा राजकीय प्रगतीमध्ये भ्रष्टाचार हा एक मोठा अडथळा आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी “लाच घेणार नाही आणि लाच देणार नाही” तसेच सर्व कामे प्रामाणिक आणि पारदर्शकपणे करण्याची प्रतिज्ञा यावेळी उपस्थितांना देण्यात आली.राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार यांनी राजभवनातील कर्मचारी, अधिकारी तसेच राजभवन येथे कर्तव्य बजावित असलेले सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी यांना दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त ‘सत्यनिष्ठा प्रतिज्ञा’ दिली, तसेच संदेशाचे वाचन केले.


      भ्रष्टाचारामुळे एकीकडे देशाचा प्रगतीचा वेग खुंटतो, तर दुसरीकडे सामान्य गरजू नागरिक शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांच्या लाभांपासून वंचित राहतो. यास्तव सर्व शासकीय निमशासकीय व खाजगी संस्थांनी आपापले व्यवहार अधिकाधिक पारदर्शी ठेवावेत तसेच कर्मचारी व अधिकाऱ्यांनी समाजाप्रती, राज्याप्रती तसेच देशाप्रती आपल्या उत्तरदायित्वाची जाणीव ठेवावी, अशी अपेक्षा राज्यपाल यांनी आपल्या संदेशातून व्यक्त केली.लोकहिताच्या योजनांच्या अंमलबजावणीत भ्रष्टाचारामुळे अडसर निर्माण होतो. विकास कामाची गती मंदावते. त्यामुळे अशा जनजागृतीच्या उपक्रमांतून नागरिक आणि प्रशासकीय यंत्रणातील घटकांमध्ये जागरुकता आणणे आवश्यक ठरते. त्यासाठी भ्रष्टाचार निर्मूलनची शपथ आणि जनजागृतीसाठी राबविण्यात येणारे हे उपक्रम सर्वदूर आणि शेवटच्या घटकापर्यंत पोहचावेत, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशाद्वारे व्यक्त केली.२७ ऑक्टोंबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत राज्यात दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून ‘सतर्क भारत, समृद्ध भारत’ असे या सप्ताहाचे ध्येय वाक्य ठरविण्यात आले आहे.


 दिगंबर वाघ  


कार्यकारी संपादक-९४०४४५३५८


 


माझे कुटुंब,माझी जबाबदारी, मास्क वापरा आणि कोरोना योध्दा यांना सहकार्य करा..