ग्रामीण रुग्णालयाचा उपजिल्हा रुग्णालय दर्जावाढीचा प्रस्ताव तातडीने तयार करावा
- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
मुंबई प्रतिनिधी : संगमनेर येथील 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्यासाठी आवश्यक असणारा प्रस्ताव सार्वजनिक आरोग्य विभागाने तातडीने तयार करावा असे निर्देश महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले.ग्रामीण रुग्णालयाचा उपजिल्हा रुग्णालय दर्जावाढ आणि कॉटेज रुग्णालयाचे महिला रुग्णालयात रुपांतर करणे याबाबतची आढावा बैठक महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित करण्यात आली. या बैठकीस सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, आमदार सुधीर तांबे, आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. साधना तायडे यांच्यासह सार्वजनिक आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
महसूलमंत्री थोरात म्हणाले की, ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची होत असलेली गर्दी लक्षात घेता या रुग्णालयाचे श्रेणीवर्धन तातडीने होणे आवश्यक आहे.संगमनेर तालुक्याचा होत असलेला विस्तार आणि येथील लोकसंख्या लक्षात घेता येथील नागरिकांना चांगल्या वैद्यकीय सेवा उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध होऊ शकतील. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालय दर्जावाढीबाबतचा प्रस्ताव तातडीने तयार करण्यात यावा, असे निर्देश थोरात यांनी दिले.
30 खाटांचे महिला रुग्णालय सुरु होणार
संगमनेर नगरपरिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या कॉटेज रुग्णालयाचे रुपांतर महिला रुग्णालयात करण्याचा प्रस्ताव सार्वजनिक आरोग्य विभागास देण्यात आला आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग हा प्रस्ताव अभ्यास करुन येथे 30 खाटांचे महिला रुग्णालय सुरु करण्याच्या कामाला गती देईल असे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी यावेळी सांगितले.
दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८
माझे कुटुंब,माझी जबाबदारी, मास्क वापरा आणि कोरोना योध्दा यांना सहकार्य करा..