माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेमुळे संसर्गाचा वेग रोखण्यात यश

गाफील न राहता युरोपप्रमाणे दुसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून आरोग्य सुविधांचे नियोजन करा


 - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेमुंबई प्रतिनिधी : कोरोना वाढीचा दर तसेच मृत्यू दर कमी होताना दिसत असले तरी गाफील न राहता युरोपप्रमाणे दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्याची तयारी राहू द्या. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेमुळे आपण संसर्ग रोखण्यात काही प्रमाणात यशस्वी झालो असून डिसेंबरमध्येही ही मोहीम परिणामकारकपणे राबविण्याचे नियोजन करा अशा सूचना प्रशासनास दिल्या. दिवाळीनंतर पुढचे १५ दिवस जागरुकतेचे आहे, त्यादृष्टीने सावधानता बाळगा आणि मास्क लावणे, सुरक्षित अंतर राखणे, हात वारंवार धुणे या नियमांचे पालन नागरिक करतील हे काटेकोरपणे पहा, असेही ते म्हणाले.


     आज मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत संवाद साधला आणि कोविड संदर्भात उपाययोजनांची माहिती करून घेतली. आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे सल्लागार डॉ. दीपक म्हैसेकर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, टास्क फोर्सचे डॉक्टर्स सहभागी झाले होते.  मुख्यमंत्री यावेळी म्हणाले कि, हे वर्ल्ड वॉर आहे असे मी मार्च महिन्यात म्हणालो होतो, इतक्या महिन्यांमध्ये आपण हत्यार नसतानासुद्धा विषाणूवर काबू  मिळविण्यासाठी लढलो आणि आपल्याला यश येत आहे असे दिसते. या विषाणूचा जेव्हा चंचूप्रवेश झाला तेव्हा आपण लॉकडाऊन केले आणि आता हळूहळू सर्व खुले करू लागलो आहे. त्यामुळे सुरुवातीला शहरात असलेला संसर्ग आता राज्यभर सर्वत्र पसरलाय. सुरुवातीच्या काळात विषाणूचा प्रसार मर्यादित ठिकाणी होता, मात्र आता ग्रामीण भागात सुद्धा रुग्ण सापडत आहेत. या सर्व कालावधीत उन्हाळा आणि पावसाळ्यात मोसमी आजार आढळले नाहीत, कारण आपण आरोग्य विषयक खबरदारी पाळली मात्र आत्ता थंडी आली आहे. या काळात कोविड व्यतिरिक्त इतर आजारही उफाळून येतात. विशेषत: ह्रदयविकार, न्युमोनिया, अस्थमा, फ्ल्यू यासारख्या रुग्णांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. फ्ल्यु आणि कोरोनातील फरकही कळला पाहिजे.


सुपर स्प्रेडर्सच्या चाचण्या आवश्यक


     सर्व काही खुले केल्याने विशेषत: शासकीय कार्यालयात गर्दी वाढू लागली आहे. ती कमी करणे, त्यासाठी काही कल्पक उपक्रम राबविणे गरजेचे आहे. जनतेच्या खूप जास्त संपर्कात येणारे लोक, बस चालक-वाहक, सार्वजनिक व्यवस्थेतील कर्मचारी हे सुपर स्प्रेडर्स असू शकतील. त्यामुळे त्यांच्या चाचण्या लगेच करून घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.


कोविड सुविधा काढून टाकू नका


     महाराष्ट्राचा आरोग्य नकाशा या मोहिमेच्या निमित्ताने तयार झाला आहे. मोहिमेत सापडलेल्या  सहव्याधी नागरिकांच्या संपर्कात राहणे गरजेचे आहे. त्यांची सातत्याने  चौकशी करा; त्यामुळे दुसरी लाट आली तरी मोठी आपत्ती टाळू शकू, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, सध्या फिल्ड हॉस्पिटल किंवा कोविड केअर केंद्राच्या उभारण्यात आलेल्या सुविधा काढून टाकू नका. आपल्याला थोडा वेळ मिळाला आहे. त्यामुळे काही उणीवा असतील त्या दूर करण्याचा प्रयत्न करा, वैद्यकीय यंत्रणेला प्रशिक्षित करा, विभागवार डॉक्टर्सची आढावा घ्या, कर्मचारी कमी करू नका. थोडी विश्रांती द्या पण तात्पुरत्या सुविधा कायमस्वरूपी होतील का हे पहा असेही ते म्हणाले.


काटेकोर कारवाई करा


     शहरी आणि ग्रामीण भागात स्वॅब (घशातील द्राव)  संकलन केंद्रे वाढवा, चाचण्या कमी करू नका. दुसऱ्या लाटेची तयारी करा, कर्मचारी व सुविधा यांची तयारी करून ठेवा, लस डिसेंबर अखेर किंवा एप्रिलमध्ये येईल असा अंदाज आहे. मात्र तोपर्यंत मास्क, हात धुवा, सुरक्षित अंतर हे नियम पाळले गेलेच पाहिजेत. मास्क न वापरणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले कि, प्रार्थना स्थळांना उघडण्याच्या बाबतीतही दिवाळीनंतर निर्णय घेऊ. मंदिरांमध्ये ज्येष्ठ नागरिक नियमितपणे जातात. हा विषाणू ज्येष्ठ आणि सहव्याधी रुग्णांना अधिक धोकादायक असल्याने याबात अधिक काळजी घेऊन निर्णय घ्यावा लागत आहे, असेही ते म्हणाले.        


 प्रशिक्षित आयसीयू कर्मचारी असणे गरजेचे


      डॉ राजेश टोपे म्हणाले कि, माझे कुटुंब मोहीममधील डेटा हा दुसरी लाट आली तर उपयुक्त ठरेल. कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणावर पसरविणाऱ्या समाजातील व्यक्तींच्या चाचण्या मोठ्या प्रमाणावर करून घ्याव्या लागतील. आज आपल्याकडे ५०० प्रयोगाशाळा असताना चाचण्या देखील वाढल्या पाहिजेत. काही जिल्ह्यांत एंटीजेनच्या ऐवजी आरटीपीसीआर चाचण्यांवर अधिक भर द्यावा लागेल. गृह विलगीकरणमध्ये असलेल्या रुग्णांकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. काही जिल्ह्यात अजून मृत्यू दर जास्त आहे. त्यामुळे प्रशिक्षित आयसीयू कर्मचारी असणे गरजेचे आहे. या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाचा कार्यक्रम तयार करून जिल्हाधिकारी यांनी ते करून घ्यावे. मास्क, औषधी, चाचण्यांचे दर यावर शासनाने नियंत्रण आणले आहे. जिथे हे पाळले जात नसेल तिथे काटेकोर कारवाई करणे गरजेचे आहे.


मोहिमेमुळे ५० हजार कोविड रुग्ण आढळले


     आरोग्य प्रधान सचिव डॉ.  प्रदीप व्यास यांनी माहिती देताना सांगितले की, माझे कुटुंब, माझी जबाबदारी मुळे राज्यात ५० हजारपेक्षा जास्त कोविड रुग्ण आढळले आहेत. शिवाय सह व्याधी रोग्यांची माहिती पण शासनाकडे आहे. त्यावर अधिक लक्ष केंद्रित करून कोरोना संसर्ग त्यांना होऊ नये म्हणून विशेष काळजी घेण्यात येईल. नंदुरबारसारख्या दूरच्या जिल्ह्यात देखील मोबाईल ॲपचा चांगला वापर करून माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहीम राबविण्यात आली. दुसरी लाट आली तर ४० टक्के रुग्ण विलगीकरणात तर ४५ टक्के कोविड केंद्रात असतील तर १५ टक्के रुग्णांना आयसीयूची गरज असेल अशी अपेक्षा आहे. आजमितीस केवळ १ लाख सक्रीय रुग्ण असून दररोज २४ हजार रुग्ण असायचे तिथे आता ५ ते ६ हजार रुग्ण आढळत आहेत. रिकव्हरी रेट ९१ टक्के इतका आहे अशी माहितीही त्यांनी दिली.मुख्य सचिव संजय कुमार म्हणाले कि, माझे कुटुंब, माझी जबाबदारी यामध्ये आपल्याकडे डेटा जमा झाला आहे, त्याचा वैद्यकीय कारणांसाठी चांगला उपयोग करून घेता येईल.


खाद्य विक्रेते , उपहारगृहे यांनी नियम पाळणे गरजेचे


      मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता म्हणाले कि, शासकीय कार्यालयांत गर्दी मोठ्या प्रमाणावर दिसत असून अशी ठिकाणी सुपर स्प्रेडर ठरू शकतात. त्यामुळे याठिकाणी नाविन्यपूर्ण कल्पना राबवून गर्दी होऊ देऊ नका. शहरांत रस्त्यावर खाद्य विक्रेते, उपहारगृहे यांत गर्दी वाढू लागली आहे तिथेही नियम पाळण्याची गरज आहे. मुख्यमंत्र्यांचे सल्लागार डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले की, गडचिरोलीत रुग्ण संख्या सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये दुप्पट झाली आहे . नंदुरबार आणि धुळे येथे अधिक चाचण्या वाढणे गरजेचे आहे. दिल्लीत कोविडची परिस्थिती हवेच्या प्रदुषणामुळे वाढली आहे त्यामुळे संसर्ग वाढला आहे. यावेळी बोलताना अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे म्हणाले कि, साधारण ९ महिने झाले कोविडशी लढाई सुरु आहे. अनेक निकषांवर चांगली कामगिरी होत आहे पण आता अधिक आव्हाने आहेत. युरोपात दुसऱ्या लाटेची सुरुवात झाली असून दिल्ली व इतर काही राज्यात देखील दुसऱ्या लाटेची भीती वाटते आहे. अशा परिस्थितीत आपण पुढील काळातले नियोजन केले पाहिजे


गृह विलगीकरणासाठी खासगी रुग्णालयांची मदत घ्यावी


     टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी म्हणाले की, दुसरी लाट कधी येईल याविषयी चर्चा सुरु आहे. हिवाळ्यात जिथे जिथे तापमान कमी झाले तिथे, तसेच औद्योगिक भागात कोरोना वाढू शकतो. चाचण्या अधिक वाढविणे तसेच रुग्णांचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे गरजेचे आहे. २५ डिसेंबर ते २६ जानेवारी या काळात हृदयविकार, न्युमोनियाचे प्रमाण एरव्ही देखील जास्त असते त्यामुळे डॉक्टर्स आणि रुग्णांचे देखील यासंदर्भात योग्य ते लोकशिक्षण व्हावे. खासगी रुग्णालयांची मदत घेऊन गृह विलगीकरण नियोजन करावे. डॉ. राहुल पंडित म्हणाले कि दुसरी लाट आली तर अतिदक्षता विभागातील डॉक्टर्स आणि कर्मचारी यांच्यावर ताण येऊ शकतो त्यादृष्टीने नियोजन करावे. प्रशासनाने मास्क घालण्यासंदर्भात अधिक काटेकोर निर्बंध घालावेत. कोरोना काळात कोविड केंद्र आपण बंद करीत असलो तरी सरसकट बंद न करता कुठली बंद करावीत कुठली करू नये याचे व्यवस्थित नियोजन करावे


दिगंबर वाघ  


कार्यकारी संपादक-९४०४४५३५८


 


माझे कुटुंब,माझी जबाबदारी, मास्क वापरा आणि कोरोना योध्दा यांना सहकार्य करा..