गुणवत्ता वाढीस चालला देणारा ध्वजारोहणाचा भादाणे पॅटर्न....
मुरबाड प्रतिनिधी : राज्यात प्रथमच ठाणे जिल्ह्यातील भादाणे गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत १५ ऑगस्ट २०२५ रोजी सरपंच व त्या शाळेचे शिक्षण कमिटीचे अध्यक्ष संजय हांडोरे पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात क्रांतिकारी निर्णय घेऊन अनुक्रमे स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिनाचा ध्वजारोहणाचा मान इयत्ता दहावी व बारावीला प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या निवासी किंवा अनिवासी विद्यार्थांच्या हस्ते व त्यांच्या आई वडिलांच्या सोबत देण्याचा निर्णय घेण्यात आला.या निर्णयाचे स्वागत संपूर्ण राज्यभर होत असून अनेक सामाजिक व राजकीय संघटनांनी राज्य सरकारकडे मागणी केली आहे की हा पॅटर्न संपूर्ण राज्यात लागू करावा.
डिसेंबर २०२३ रोजी ठाणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेने या भादाणे पॅटर्न चे खूप कौतुक केले असून हा पॅटर्न राज्यात सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये लागू करावा म्हणून जिल्हा परिषदने तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्वसंमतीने ठराव पाठविला आहे.या अनोख्या निर्णयामुळे विद्यार्थांच्या गुणवत्ता विकासाला चालना मिळाली गावातील ध्वजारोहण करण्यावरून होणारी राजकीय भांडणे थांबली आहेत.एक निकोप आदर्श शैक्षणिक स्पर्धा वाढीस लागली आहे.
निर्णय शाळेच्या शिक्षण कमिटी व ग्रामसभेत सर्वमातने घेण्यात आला आहे.हा निर्णय लागू करताना तत्कालीन मुख्याध्यक राजाराम कंटे यांचे मोलाचे सहकार्य लाभले होते.यावर्षी भादाणे गावाचा निशांत राजाराम डोहाळे (एस.एस.सी.९५.२०%) या विद्यार्थ्यांच्या हस्ते व त्याच्या आईवडिवालासह ध्वजारोहणाचा मान मिळणार आहे.देशभरात भादाणे ध्वजारोहण या अनोख्या उपक्रमाचे स्वागत होत आहे.
उत्तर प्रदेश सरकारचे शिक्षणमंत्री यांनी आशिषजी पटेल यांनी ४ फेब्रुवारी २०२४ रोजी संजय हांडोरे पाटील यांना लखनौ येथे आमंत्रित करून या अनोख्या ध्वजारोहण उपक्रमांचे कौतुक करून त्यांचा यथोचित सत्कार केला होता.भादाणे ध्वजारोहण पॅटर्न ही केवळ एक परंपरा नसून ती शिक्षणातील गुणवत्ता विद्यार्थी पालकांचा सन्मान आणि ग्रामैक्य यांचे जिवंत प्रतीक बनली आहे.