दहा टक्के गरिब रूग्णांना उपचार द्यावा

धर्मादाय रूग्णालयांमध्ये नियमाप्रमाणे दहा टक्के गरिब रूग्णांना उपचार द्यावा


- ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफमुंबई प्रतिनिधी : मुंबई शहर व राज्यातील धर्मादाय रूग्णालयांमध्ये 10 टक्के गरिब रूग्णांना मोफत उपचारावरील नियमांचे पालन करून उपचार द्यावेत असे निर्देश ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. कोरोना महामारिच्या कार्यकाळात ग्रामीण भागातील रूग्ण शहरात उपचारासाठी आले नाहीत. मात्र, आता रूग्ण उपचारासाठी येण्याचा ओघ वाढू शकतो यासाठी धर्मादाय रूग्णालयांनी सहकार्य करून, गरिब रूग्णांची सेवा करावी अशा सुचना विधी व न्याय विभाग राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी दिल्या. राज्यातील धर्मादाय रूग्णालयांमध्ये शासकीय नियमाप्रमाणे 10 टक्के गरिब रूग्णांना मोफत उपचार देण्याच्या नियमांचे पालन करण्यासाठी मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, विधी व न्याय राज्यमंत्री आदिती तटकरे, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव व विधी परामर्शी आर.एन. लढ्ढा, धर्मादाय आयुक्त आर.एन.जोशी, महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे, विधी व न्याय विभागाचे सहसचिव नितीन जिवणे आदीसह अधिकारी आणि विविध धर्मादाय रूग्णालयांचे पदाधिकारी उपस्थित होते.


       राज्यमंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, कोरोना महामारिच्या काळात ताळेबंदी असल्यामुळे अनेक ग्रामीण रूग्णांना शहराकडे उपचारासाठी येता आले नाही. मात्र, आता अशा रूग्णांचा उपचारासाठी आणि शस्त्रक्रियेसाठी शहराकडे येण्याचा ओघ वाढू शकतो. ग्रामीण भागातून प्रवास करून आलेल्या गरिब जनतेला अडचणी भासू नये किंवा उपचारात उणिवा राहू नये यासाठी समन्वय साधून त्यांना योग्य उपचार देणे गरजेचे आहे. रूग्णालय आणि रूग्ण यामध्ये संवाद आणि  समन्वय असणे गरजेचे आहे. याचबरोबर रूग्णालयात उपलब्ध जागा आणि उपचारपद्धती याची माहितीही प्रथम दर्शनी रूग्णांना मिळणे गरजेचे असून, रूग्णांना उपचारासाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती आणि पुर्तता करण्यासाठी यंत्रणाही असणे आवश्यक आहे. असेही राज्यमंत्री तटकरे यांनी सांगितले.


       तसेच, रूग्णालयाला प्रशासकिय समस्या असतील त्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेऊन समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. रूग्णालयाला शासन सर्वोतोपरी सहकार्य करेल असेही राज्यमंत्री तटकरे यांनी यावेळी रूग्णालयांच्या प्रतिनिधींना सांगितले. बॉम्बे हॉस्पीटल, जसलोक हॉस्पीटल, लिलावती हॉस्पीटल, हिरानंदानी हॉस्पीटल,सैफी हॉस्पीटल, ब्रिचकँडी हॉस्पीटल, नानावटी हॉस्पीटल, रहेजा हॉस्पीटल, हिंदूजा हॉस्पीटल, नायर हॉस्पीटल, रिलायन्स हॉस्पीटल, एसआरसीसी हॉस्पीटल,गुरूनानक हॉस्पीटल,मसीना हॉस्पीटल, ग्लोबल हॉस्पीटल,प्रिन्स अली खान हॉस्पीटल, एच.एन. रिलायन्स हॉस्पीटल अशा विविध धर्मादाय रूग्णालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते.


  दिगंबर वाघ  


कार्यकारी संपादक-९४०४४५३५८


 


माझे कुटुंब,माझी जबाबदारी, मास्क वापरा आणि कोरोना योध्दा यांना सहकार्य करा..