मोबाईल मेडिकल व्हॅनचे लोकार्पण

राज्यपालांच्या हस्ते मोबाईल मेडिकल व्हॅनचे लोकार्पण



मुंबई प्रतिनिधी : लोकसेवेसाठी समर्पण हेच सर्वोत्कृष्ट कार्य आहे. कोणताही भेद न बाळगता समाजकार्य करणे हाच मनुष्याचा धर्म आहे. सगळ्यांनी एकत्रित येऊन कार्य केल्यास समाजात कुणीही उपेक्षित राहणार नाही. आर.के. एचआयव्ही एड्स संशोधन व सुरक्षा केंद्राने वैद्यकीय सुविधांसाठी गरजू आणि गरिब जनतेला मोबाईल मेडिकल व्हॅन अर्पण करून सामाजिक दायित्व सिद्ध केले असल्याची भावना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केल्या.आर.के.एचआयव्ही एड्स संशोधन व सुरक्षा संस्थेमार्फत मुंबईतील २० झोपडपट्टी भागात वैद्यकिय सेवा देण्यासाठी “फिरते वैद्यकिय सेवा वाहनाचे” लोकार्पण आज राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास आर.के.एचआयव्ही एड्स संशोधन व सुरक्षा संस्थेचे अध्यक्ष विनीत चोपरा, डॉ. धमेंद्र कुमार, जीआयसी संस्थेचे संचालक व व्यवस्थापक दीपक प्रसाद, सहायक व्यवस्थापक नामदेव कदम, वैद्यकिय संचालक विरेंद्र सहाय आदीसह संस्थेचे कोविड-19 काळात कार्य केलेले कोविड योद्धे यावेळी उपस्थित होते.


      कार्यक्रमादरम्यान  जेष्ठ समाजसेविका राणी पोतदार, नृत्य दिग्दर्शक संदिप सोपारकर यांच्यासह कोविड योद्धांना राज्यपालांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी राज्यपाल कोश्यारी म्हणाले, मुंबई आणि सुरत येथील विविध भागातील गरजू आणि गरिब लोकांना मोफत रूग्णसेवा व औषधी देण्यासाठी फिरते रूग्णसेवा वाहन जीआयसी संस्थेने आपल्या सामाजिक दायित्व निधीतून लोकांना समर्पित केले ही अभिनंदनीय बाब आहे. कोविड काळात संस्थेने एक करोड पेक्षा जास्त लोकांना अन्नदान केले आहे. या कामामुळे जे आत्मिक सुख मिळते ते कोणत्याही कार्यापेक्षा नेहमी मोठे असते. समाजकार्य मोठ्या प्रमाणात करत असताना अडचणी येतात मात्र, कार्य सातत्याने करीत राहिल्यास यशही प्राप्त होते असेही  राज्यपाल कोश्यारी यांनी सांगितले. आपले समाजाप्रती असलेले कार्य असेच पुढेही सुरू राहील अशी आशा राज्यपाल कोश्यारी यांनी यावेळी व्यक्त केली.


   दिगंबर वाघ  


कार्यकारी संपादक-९४०४४५३५८


 


 🙏 सावधानी बाळगा कोरोना पासून बचाव करा 🙏