राज्याची मान उंचवणारी कामगिरी

राज्यपालांकडून एनसीसी विद्यार्थ्यांचा सन्मान महिलांच्या कामगिरीचा उंचावणारा आलेख देशासाठी शुभलक्षण - राज्यपाल कोश्यारी

 मुंबई प्रतिनिधी : विद्यापीठांचे कुलपती या नात्याने आपण उपस्थित राहत असलेल्या दीक्षांत समारंभांमध्ये बहुतांशी सुवर्ण पदके महिला विद्यार्थिनी जिंकत असतात. एनसीसीच्या प्रजासत्ताक दिन शिबिरामध्ये राज्याच्या दहापैकी दहाही महिला कॅडेटसची प्रतिष्ठेच्या संचलनासाठी झालेली निवड ही तितकीच अभिमानास्पद कामगिरी असल्याचे सांगून महिलांच्या कामगिरीचा सर्वच क्षेत्रांमध्ये उंचावणारा आलेख देशाकरिता शुभ लक्षण आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे व्यक्त केले.

       नवी दिल्ली येथे नुकत्याच संपन्न झालेल्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) प्रजासत्ताक दिन शिबिरामध्ये उत्कृष्ट कामगिरी करून राज्याची मान उंचवणारी कामगिरी केल्याबद्दल राज्यातील एनसीसी छात्रांना राज्यपालांनी राजभवन येथे निमंत्रित करून सन्मानित केले, त्यावेळी ते बोलत होते.यावेळी महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल वाय. पी. खंडुरी तसेच सेनादलांचे अधिकारी व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

       भारतीय सैन्य दलांबद्दल प्रत्येक भारतीयाच्या मनात आदराचे स्थान आहे. गलवान खोरे सारख्या दुर्गम ठिकाणी देशाच्या रक्षणासाठी आपली सैन्यदले सज्ज आहेत. एनसीसीच्या विद्यार्थ्यांना देशसेवा, शिस्त व सर्वधर्मसमभावाचे संस्कार मिळत असतात. त्यामुळे भविष्यात जीवनात कुठल्याही क्षेत्रात कार्य करीत असले तरीही विद्यार्थ्यांनी शिस्तीचे संस्कार कायम ठेवावे, अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली.

      वीज, पाणी ही राष्ट्राची सार्वजनिक संपत्ती असून कोठेही वीज अथवा पाणी वाया जात असेल तर अशी नासाडी थांबवणे ही देखील देशसेवा असल्याचे त्यांनी सांगितले.राज्यातील 26 एनसीसी कॅडेट्सपैकी 24 कॅडेट्सची राजपथ संचलनासाठी निवड झाली तसेच महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाला द्वितीय सर्वोत्तम संचालनालयाचा मान मिळाल्याचे मे.जन. खंडुरी यांनी यावेळी सांगितले.

      राज्यपालांच्या हस्ते यावेळी कॅडेट आयुषी गजानन नागपूरकर, ज्योती रुकवल,  नाजुका कुसराम, मनदीपसिंग सिलेदार, अमोद माळवी, रामचंद्र अशोक चव्हाण, सोहम रोहडे व मयूर मंदेसिया या कॅडेट्सचा सत्कार करण्यात आला.

दिगंबर वाघ             

          कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८


           🙏  एक वचन तीन नियम  🙏

    १) मास्क वापरा २) हात धुवा ३) अंतर ठेवा