यंदाच्या खरीप हंगामासाठी महाराष्ट्राला मागणीप्रमाणे खत पुरवठा करावा
कृषीमंत्री दादाजी भुसे यांची केंद्रीय खते व रसायने मंत्र्यांकडे मागणी
मुंबई प्रतिनिधी : महाराष्ट्रासाठी यावर्षीच्या खरीप हंगामासाठी आवश्यक असणारा खत पुरवठा वेळेवर आणि मागणीप्रमाणे करावा, अशी मागणी राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी केंद्रीय खते व रसायन मंत्री सदानंद गौडा यांच्याकडे केली. कृषीमंत्री भुसे नवी दिल्ली येथील दौऱ्यावर गेले असून त्यांनी केंद्रीय खते व रसायन मंत्री गौडा यांची भेट घेतली. यावेळी राज्यातील शेती आणि शेतकऱ्यांशी संबंधित प्रश्नांबाबत त्यांनी चर्चा केली. राज्याचे कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यावेळी उपस्थित होते.राज्याला खरीप हंगामासाठी सुमारे 44.50 लाख मेट्रीक टन खताची आवश्यकता असून त्याचा पुरवठा केंद्राकडून केला जातो. खरीप हंगामासाठी जून आणि जुलै महिन्यात खताला मोठ्या प्रमाणावर मागणी असते. गेल्या वर्षी खरीप हंगामामध्ये जून ते ऑगस्ट या कालावधीत खत पुरवठा विस्कळीत झाला होता. यंदाच्या खरीप हंगामासाठी राज्य शासन 2 लाख मेट्रीक टन युरियाचा अतिरिक्त साठा करणार असून विविध खतांची सुमारे 44.50 लाख मेट्रीक टन खत पुरवठ्याची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात आली आहे. खतांचा पुरवठा वेळेत व्हावा अशी विनंती भुसे यांनी केंद्रीय मंत्र्यांकडे केली. ज्या महिन्यामध्ये पिकाच्या गरजेप्रमाणे खताची मागणी आहे त्याप्रमाणे वेळेवर आणि पुरेसा खत पुरवठा व्हावा, असेही भुसे यांनी यावेळी सांगितले.
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८
🙏 एक वचन तीन नियम 🙏
१) मास्क वापरा २) हात धुवा ३) अंतर ठेवा