आरोग्य सुविधा वाढविण्यासोबतच हॉटस्पॉटमधील बंधने पाळण्याची गरज
-उपमुख्यमंत्री अजित पवार
विधानभवन (कौन्सिल हॉल) येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली तसेच केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत 'कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनाबाबत' आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सुनील टिंगरे, आमदार अतुल बेनके, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, सहपोलिस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल, पिंपरी-चिंचवड महापालिका अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, उपायुक्त संतोष पाटील, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंके, डॉ. दिलीप मोहीते आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 'कोरोना' विषाणूची सद्यस्थिती व प्रशासनाच्यावतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत, तसेच लसीकरणाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत माहिती जाणून घेतली.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरासह संपूर्ण जिल्ह्यात कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाच्या प्रयत्नाला सर्वांचे पाठबळ महत्वाचे आहे. कोरोनाबाधित रुग्णांसाठी उपचार तसेच सुविधांमध्ये सातत्याने वाढ करत राहा. तसेच महानगरासह ग्रामीण भागातही ऑक्सिजनयुक्त बेड कमी पडणार नाहीत, याकडे लक्ष द्या. तसेच हॉटस्पॉटमधील बंधने पाळली जातील याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. टास्क फोर्सने रेमडेसिवरबाबत दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करा. रेमडेसिवरच्या बाबतीत कडक धोरण राबवा, अशा सूचनाही त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.
ट्रॅकिंग व टेस्टिंगचे काम प्रभावीपणे करण्याच्या सूचना देऊन उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोना विषाणूच्या वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन ज्या उपाययोजना सांगत आहे, त्याचे पालन करा. विनाकारण घराबाहेर बाहेर पडणाऱ्या नागरिकांवर तत्काळ कार्यवाही करावी आणि लोक विनाकारण घराबाहेर पडणार नाहीत, याची काळजी घ्यावी. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता आरोग्य सुविधा उभारणीवर भर देण्याचेही निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी यंत्रणेला दिले.
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले, पुणेकर नागरिकांनी विकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद दिला आहे. हा कालावधी कोरोना संसर्गाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असून कोरोना संसर्ग रोखण्यासाठीची बंधने पाळली जावीत. चाचण्यांची क्षमता वाढविण्याची गरज असून कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी अधिकाधिक संपर्क शोधून त्यांचे विलीगीकरण करणे आवश्यक आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठीच्या कामात स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी. सर्व मिळून कोरोनाचा संसर्ग निश्चितपणे दूर करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.