कालबद्ध कार्यक्रम आखून फायर ऑडिट करा : देवेंद्र फडणवीस

भंडारा, नागपूर, नाशिक, मुंबई, विरार घटनांमुळे कोरोना लढाईत अडचणी

नागपूर प्रतिनिधी : विरार येथे हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये लागलेल्या आगीत लोकांचे प्राण जाण्याची घटना ही अतिशय धक्कादायक आहे. एकिकडे कोविडचे भय आणि त्यात अशा घटनांनी भय आणखी वाढते आहे. दरवेळी चौकशी करू असे सांगितले जाते. ती झाली सुद्धा पाहिजे. फायर ऑडिट करू, असे सांगितले जाते. पण, तेही होताना दिसत नाही. भंडारा, नागपूर, नाशिक, मुंबई आणि आता विरार या घटना अतिशय गंभीर आहेत. अशा घटनांच्या मुळाशी जात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत, यासाठी आता पुढच्या काळात खबरदारी घेतली पाहिजे, असे आवाहन माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.विरार येथील घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त करीत देवेंद्र फडणवीस म्हणाले की,  कोविडची लढाई अशा घटनांनी आणखी कठीण होऊन जाते. संबंधित विभागांनी यासाठी स्वत: पुढाकार घेऊन एका ठरविक कालावधीत सेफ्टी ऑडिटची प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही घटना राष्ट्रीय महत्त्वाची नाही, असे म्हटल्यासंदर्भात पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, राजेश टोपे यांनी कोणत्या मानसिकतेतून हा राष्ट्रीय मुद्दा नाही, असे सांगितले हे मला माहिती नाही. पण असे वक्तव्य करणे हा असंवेदनशीलपणा आहे.

     तीन पक्ष एकत्र असताना महाराष्ट्रातील कोरोना स्थिती आटोक्यात येत नाही, असे पत्रकारांनी विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, तिन्ही पक्षांचे नेते दिवसभर माध्यमांत येतात. केंद्रावर टीका करतात आणि प्रत्यक्षात मात्र कोरोना स्थिती हाताळण्यासाठी मात्र काहीही करीत नाही. केंद्राने काल रेमडेसिवीरची काळाबाजारी रोखण्यासाठी ठोस पाऊले उचलली. ऑक्सिजन बेड्सच्या आधारावर रेमडेसिवीरचा कोटा दिला गेला, तो महाराष्ट्राला सर्वाधिक आहे. त्यांना केवळ एकच काम आहे, रोज माध्यमांत यायचे आणि मनात येईल ती आकडेवारी सांगायची. म्हणूनच प्रत्येकाची आकडेवारीही वेगळी असते. ऑक्सिजन देण्यासाठी ऑक्सिजन एक्सप्रेस आज महाराष्ट्रात पोहोचते आहे. सर्वाधिक ऑक्सिजन सुद्धा महाराष्ट्राला मिळतो आहे. आज राज्यात चाचण्यांवर भर देण्याची नितांत गरज आहे. नागपुरात अधिक टेस्टिंग होते, ही समाधानाची बाब आहे. सरासरी 30 हजार चाचण्या नागपुरात होत आहेत. पण, मुंबईत एवढी मोठी लोकसंख्या असताना केवळ सरासरी 40 ते 45 हजार चाचण्या होत आहेत. संसर्ग रोखायचा असेल तर चाचण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढविण्याची गरज आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरात खासदारांशी भेटी सदर, पाचपावली कोविड सेंटरला भेट

माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात वर्धा आणि गडचिरोलीच्या खासदारांच्या भेटी घेत त्यांच्याकडून त्या जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला.वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांची त्यांनी भेट घेतली. वर्ध्यात जेथे ऑक्सिजन पुरवठ्याचा स्त्रोत आहे, अशा ठिकाणी एक जम्बो कोविड सेंटर उभारले जाणार आहे. याशिवाय, रामदास तडस आणि भाजपाच्या वतीने आणखी एक कोविड सेंटर वर्ध्यात निर्माण केले जाणार आहे. त्यासंदर्भात विस्तृत माहिती रामदास तडस यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिली. यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली. गडचिरोलीचे खासदार अशोक नेते यांनीही आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्यांना गडचिरोलीतील कोरोनाच्या स्थितीची माहिती दिली. सातत्याने रूग्णसंख्येत वाढ होत असल्याने ऑक्सिजन पुरवठा आणि रेमडेसिवीर याचा थोडा तुटवडा जाणवतो आहे, असे त्यांनी सांगितले. आपण हा विषयात सरकारकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

        सदर येथील आयुष कोविड सेंटर आणि पाचपावली येथील नागपूर महापालिका, मेडिकल सर्व्हिस सोसायटी आणि जमात-ए-इस्लामीतर्फे चालविल्या जाणार्‍या कोविड सेंटरला सुद्धा आज देवेंद्र फडणवीस यांनी भेटी दिल्या. याप्रसंगी महापौर दयाशंकर तिवारी, अविनाश ठाकरे, प्रकाश भोयर, सुनील हिरणवार, सुनील अग्रवाल आणि इतरही पदाधिकारी उपस्थित होते.विदर्भ हॉस्पिटल असोसिएशनचे डॉ. अनुप मरार आणि डॉ. विंकी रूघवानी यांनी आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्यांना विदर्भातील रूग्णालयांना तोंड द्याव्या लागत असलेल्या अडचणींची माहिती दिली आणि सहकार्य मागितले. हे सर्व विषय योग्य प्राधीकरणाकडे मांडण्याचे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

दिगंबर वाघ            
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८