ब्रेक द चेन’ अंतर्गत नव्याने शासनाचे काही निर्बंध व मार्गदर्शक तत्वे निर्गमित
मुंबई प्रतिनिधी : कोविड-१९ चा प्रसार थांबविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने काही निर्बंध व मार्गदर्शक तत्त्वे जारी केले आहेत, जे १ मे २०२१ च्या सकाळी सात वाजेपर्यंत अंमलात राहतील. परंतु महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेता सदर निर्बंधांमध्ये काही फेरबद्दल केले आहेत. साथीचे रोग कायदा १८९७ च्या कलम दोन, तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ च्या तरतुदीनुसार सदर बदल करण्यात येत असल्याची माहिती पत्रकाद्वारे राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिली आहे. हे बदल खालीलप्रमाणे असतील व २० एप्रिल २०२१ संध्याकाळी आठ वाजेपासून १ मे २०२१ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत अस्तित्वात राहील.
🔊 सर्व किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी आणि मिठाई दुकाने, सर्व खाद्यपदार्थांचे दुकान (चिकन, मटण, कोंबडी, मासे, अंडी सह) त्याचप्रमाणे कृषी अवजारे व कृषी उत्पादने, पाळीव प्राण्यांचे खाद्याची दुकाने, पावसाच्या हंगामासाठी साहित्य (वैयक्तीक व संघटनात्मक) सकाळी सात वाजेपासून अकरा वाजेपर्यंत उघडे राहतील.
🔊 वरील नमूद दुकानांमधून घरपोच सेवा देण्यासाठी सकाळी 7 वाजेपासून संध्याकाळी 8 पर्यंत मुभा असेल, परंतु आवश्यक वाटल्यास स्थानिक प्रशासन या वेळांमध्ये फेरबदल करू शकते.
🔊 स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाला वाटल्यास कलम दोन अंतर्गत काही गोष्टींना व सेवांना, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची संमती घेऊन आवश्यक सेवा म्हणून घोषित करू शकते.
या आदेशामध्ये नमूद केलेल्या गोष्टीं व्यतिरिक्त इतर सर्व अटी व नियम 13 एप्रिल 2021 रोजी राज्य शासनाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या पत्रकानुसारच असतील.