तौक्ते चक्रीवादळाच्या प्रभावाने समुद्र किनाऱयांवर आलेला कचरा हटवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करुन सातही चौपाट्यांची पूर्ण स्वच्छता..
समुद्रात खोलवर गेलेला कचरा, समुद्र खवळल्यानंतर विशेषतः पावसाळ्यात उंच लाटांच्या प्रसंगी किनाऱयांवर मोठ्या प्रमाणावर आल्याची उदाहरणे मुंबईकर अनुभवतात. अशा प्रसंगांमध्ये देखील बृहन्मुंबई महानगरपालिका अतिरिक्त यंत्रणा व मनुष्यबळ नेमून तातडीने किनारे व चौपाट्या स्वच्छ करीत असते. त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा तौक्ते चक्रीवादळानिमित्ताने आला आहे.तौक्ते चक्रीवादळाच्या प्रभावाने समुद्र खवळल्यानंतर मुंबईतील सातही चौपाट्यांवर मोठ्या प्रमाणावर कचरा आलेला आढळला. वादळाची तीव्रता असतानाही चारही दिवस म्हणजे दिनांक १५ ते १८ मे २०२१ या चारही दिवशी नियमितपणे चौपाट्यांवर स्वच्छता करण्यात आली. त्यात कोणताही खंड पडला नाही. दिनांक १५ मे २०२१ रोजी ३३ हजार ११० किलोग्रॅम, दिनांक १६ मे २०२१ रोजी ३९ हजार ६१० किलोग्रॅम, दिनांक १७ मे २०२१ रोजी १९ हजार १०० किलोग्रॅम तर दिनांक १८ मे २०२१ रोजी तब्बल ६२ हजार ०१० किलोग्रॅम इतका कचरा हटवून वाहून नेण्यात आला. म्हणजेच, तौक्तेच्या प्रभावाखाली असलेल्या चारही दिवसांत, सातही चौपाट्यांवर मिळून १५३ मेट्रिक टन कचरा हटविण्यात आला आहे. रात्रंदिवस अखंड प्रयत्न करुन या सर्व चौपाट्या स्वच्छ करण्यासाठी महानगरपालिकेच्या यंत्रणेने मेहनत घेतली आहे.