के/पश्चिम विभागातील प्राणवायू पुरवठा करणाऱ्या १४० रुग्णशय्येच्या कोरोना काळजी केंद्राचे महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते लोकार्पण
मुंबई प्रतिनिधी : के /पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या प्राणवायू पुरवठा करणाऱ्या १४० रुग्णशय्या कोरोना काळजी केंद्राचे लोकार्पण मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते फित कापून आज दि.१९ मे २०२१ रोजी पार पडले. महापौर किशोरी पेडणेकर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाल्या की, के/पश्चिम विभागांतर्गत जोगेश्वरी पश्चिमच्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने परिरक्षित करण्यात येणाऱ्या एस.आर.ए. चाँदीवाला इमारतीमध्ये १० माळ्याचे २८० खोल्यांचे हे कोरोना काळजी केंद्र चालविण्यात येणार आहे. २८० पैकी "डॉक्टर फाँर यू" या संस्थेच्या सहकार्याने या ठिकाणी प्राणवायू पुरवठा करणाऱ्या १४० रुग्णशय्या संचालित करण्यात येणार असून यापैकी आज ४० रुग्णशय्या कार्यान्वित करण्यात आली असून उर्वरित १०० रुग्णशय्या लवकरच कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले." डॉक्टर फाँर यू " या संस्थेची संपूर्ण टीम ऑक्सिजन रुग्णशय्या हाताळणार असून त्यासोबतच इतर व्यवस्था ही बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी हाताळणार आहे.कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा लहान मुलांवर होणारा परिणाम लक्षात घेता, त्यांच्यासाठी ३० रुग्णशय्या याठिकाणी प्रस्तावित असून यापैकी आज ०२ रुग्णशय्या तयार असल्याचे महापौरांनी सांगितले. मुंबईमध्ये प्रथमच लहान मुलांसाठी रुग्णशय्या तयार झाली असून लहान मुलांना याठिकाणी खेळणी तसेच मनोरंजनाची विविध साधने उपलब्ध करण्यात आली असल्याचे महापौरांनी सांगितले. परिसरातील नागरिकांसाठी चांगली सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल महापौरांनी "डॉक्टर फॉर यू " संस्थेचे आभार मानले.
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८