आगामी पावसाळ्यात सखल भागातील नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी संक्रमण शिबिरांची व्यवस्था करावी ! - महापालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी
पावसाळ्यात प्रामुख्याने कन्स्ट्रक्शन साईट सारख्या ठिकाणी डासांची उत्पत्ती होऊन डेंगी, मलेरिया यासारख्या साथीचा प्रादुर्भाव वाढतो यासाठी अशा जागा शोधून तेथे औषध फवारणी करावी तसेच वेळोवेळी धूर फवारणीही चालू ठेवावी आणि पावसात कुठेही कचरा साठणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना पालिका आयुक्तांनी घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांना दिल्या त्याच प्रमाणे लेप्टोस्पायरोसिस सारखी साथ उद्भवू नये म्हणून झोपडपट्टयांसारख्या सारख्या वस्तीत उंदरांची बिळे शोधून तेथे औषध फवारणी करावी अशा सूचना देखील पालिका आयुक्तांनी घनकचरा विभाग आणि साथरोग नियंत्रण अधिकारी यांना दिल्या अतिवृष्टीमुळे किंवा निसर्ग चक्रीवादळ यासारख्या एखाद्या आपत्तीच्या प्रसंगी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून इमारतींवर असलेले धोकादायक होर्डिंग्स काढून टाकावेत अशा सूचना देखील पालिका आयुक्तांनी मालमत्ता विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. त्याच प्रमाणे महापालिकेची व खाजगी कोविड हॉस्पिटल ज्या ठिकाणी आहेत त्याच्या आजूबाजूला असलेल्या झाडांमुळे पावर फेल्युअर होणार नाही याची दक्षता घेणे बाबत सूचना आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी उद्यान विभागाचे संजय जाधव यांना दिल्या. पावसाळ्यापूर्वी महापालिका परिसरातील रस्त्यावरील खड्डे वेळेवर भरणे, नालेसफाई पावसाळ्यापूर्वी करून घेणे त्याच प्रमाणे सखल भागा मध्ये चेंबरवरची प्लास्टिकची झाकणे काढून तेथे काँक्रीटची झाकणे बसवणे यासंदर्भात दक्षता घेणे बाबत सूचना त्यांनी शहर अभियंता सपना कोळी यांना दिल्या.
महापालिका परिसरात सुरु असलेल्या रिंग रोड च्या कामात वॉटर लॉगिंग होणार नाही याची काळजी घेणे बाबत सूचनाही आयुक्तांनी MMRDA चे कार्यकारी अभियंता जयवंत ढाणे यांना दिल्या तसेच रेल्वे लाईनच्या परिसरातील वॉटर लॉगिंग बाबतची माहिती घेऊन उपाय योजना बाबतच्या सूचना आयुक्तांनी रेल्वेचे एरिया ऑफिसर प्रमोद जाधव यांना दिल्या. सदर मान्सून पूर्व बैठकीत अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, शहर अभियंता सपना कोळी, पोलीस उपायुक्त विवेक पानसरे, MMRDA चे कार्यकारी अभियंता जयवंत ढाणे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता महाजन ,वाहतूक सहा. आयुक्त उमेश माने, पालिका सचिव संजय जाधव, महापालिकेचे सर्व प्रभाग क्षेत्र अधिकारी उपस्थित होते.