तोक्ते चक्रीवादळासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी दिली केंद्रीय गृहमंत्र्यांना माहिती

तोक्ते चक्रीवादळासंदर्भात तयारीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची केंद्रीय गृहमंत्र्यांना माहिती

ऑक्सीजन पुरवठा सुरळीत ठेवणे, रुग्णालयांचा वीज पुरवठा खंडित न होण्यासाठी पूर्ण खबरदारी

मुंबई प्रतिनिधी : अरबी समुद्रातील तोक्ते चक्रीवादळामुळे  जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे सावधगिरीचा इशारा देण्यात  आला आहे. विशेषतः कोरोना परिस्थितीत रुग्णालयांचा विद्युत पुरवठा खंडित होऊ नये तसेच ऑक्सिजन पुरवठा सुरळीत राहील यादृष्टीने अगोदरच तयारी करून ठेवली असून प्रशासन सज्ज आहे अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत दिली. आज सकाळी दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्र्यांनी महाराष्ट्र, गुजरातचे मुख्यमंत्री तसेच दादर नगर हवेलीचे प्रशासक यांच्याकडून तयारीचा आढावा घेतला.चक्रीवादळात नुकसान होऊ नये म्हणून राज्य शासनाने केलेल्या तयारीबाबत सांगताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, रुग्णालयांचा वीज पुरवठा खंडित होणार नाही तसेच बॅकअप यंत्रणा लगेच कार्यान्वित होईल व रुग्णांच्या उपचारांत अडथळा येणार नाही यासाठी सावध राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जम्बो व इतर कोविड केंद्रे ही  पावसापासून संरक्षण करणारी असली तरी मोठे वादळ झाल्यास समस्या उद्भवू शकते, हे लक्षात घेऊन सावधगिरी म्हणून मुंबई तसेच इतरत्रही या केंद्रांतील रुग्णांना दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात आले आहे. सध्याच्या काळात ऑक्सिजनची गरज लक्षात घेता सागरी किनाऱ्यांवरील ऑक्सिजन उत्पादन करणाऱ्या प्रकल्पांमधील उत्पादन व वाहतूक सुरळीत सुरु राहील यासाठी नियोजन केले आहे तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस यांना  विविध ठिकाणी तैनात करण्यात आले आहे. किनाऱ्यांवरील कच्च्या घरांतील लोकांना दुसरीकडे हलविण्यात आल्याचेही ते म्हणाले.मंत्रालय नियंत्रण कक्ष सज्ज असून इतरही जिल्ह्यातील नियंत्रण कक्षांशी त्यांचा व्यवस्थित समन्वय आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

 याप्रसंगी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी देखील विस्तृत माहिती दिली. ती खालीलप्रमाणे  

      सागरी किनाऱ्याजवळील डोलवी जेएसडब्ल्यू ( २३० मेट्रिक टन), डोलवी आयनॉक्स  ( १२० मेट्रिक टन), लिंडे तळोजा ( २४५ मेट्रिक टन), आयनॉक्स रायगड (१२० मेट्रिक टन), लिंडे प्राक्स एअर मुरबाड ( १२० मेट्रिक टन), असे साधारणत: ९०० मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादन करणारे प्रकल्प सुरक्षित राहतील याबाबत सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर जिल्हाधिकारी तसेच मुंबई महानगरपालिका आयुक्त यांना सुचना देण्यात आल्या आहेत.सागरी किनाऱ्याच्या अगदी जवळ डोलवीचा ऑक्सिजन उत्पादन प्रकल्प आहे. येथील डबल फिडर विद्युत पुरवठा आणि मजबूत वायरिंग यामुळे चक्रीवादळाच्या तीव्रतेतही नुकसान होणार नाही. तरी देखील महावितरण कंपनी, सार्वजनिक बांधकाम तसेच प्रकल्पातील कर्मचाऱ्यांना दक्ष राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

     अपवादात्मक परिस्थितीत डोलवी किंवा इतर कुठल्याही  ऑक्सिजन प्रकल्पास काही समस्या उदभवली तर खालीलप्रमाणे पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. चक्रीवादळाचा परिणाम होणाऱ्या जिल्ह्यांमध्ये किमान १२ ते १६ तासांचा बॅक अप देण्याची व्यवस्था केली आहे. जामनगरहून १६० मेट्रिक टन ऑक्सिजनचा साठा टँकर्सद्वारे उद्यापर्यंत पोहचत आहे. जामनगर येथेही १८ मे रोजी चक्रीवादळ धडकण्याची शक्यता असल्याने जामनगर प्रकल्पात जर काही प्रश्न उद्भवल्यास डोलवी, मुरबाड,तळोजा आणि भिलाईहून राखीव साठा मागवता येईल.पुणे येथे ३० ते ४० मेट्रिक टन जादा ऑक्सिजन साठा आहे, काही प्रश्न उद्भवल्यास अंगुलहून ६० मेट्रिक टन आणि भिलाईहून जादा साठा आणून भरपाई करण्यात येईल. जे प्रकल्प सुस्थितीत आहेत तिथूनही जादा साठ्याची व्यवस्था करता येईल.

      सागरी जिल्ह्यातील मच्छीमारांना यापूर्वीच चक्रीवादळासंदर्भात आगाऊ इशारा देण्यात आला असून ते सर्व बोटींसह किनाऱ्यांवर परतले आहेत. पालघरमधील काही मच्छिमार परतत आहेत.  किनाऱ्यांवरील कच्ची घरे रिकामी करण्यात आली आहेत. किनारी भागातील कुठलीही आरोग्य यंत्रणा कच्च्या घरात/ बांधकामात नाही हे पाहण्यात आले आहे. सागरी किनाऱ्यावरील जिल्ह्यांमध्ये कोविड तसेच नॉन कोविड रुग्णांसाठी पुरेशा प्रमाणात औषधी उपलब्ध आहेत, यात रेमडीसीव्हीर ,फेवीपिरावीर, मिथाइल प्रेडनिसोलोन , डोक्सीसिलीन, पॅरासिटामोल, हेप्रीन , एम्फोटेरीसीन बी आणि चाचणी किट्स, पीपीई इत्यादी पुरेशा प्रमाणात असतील हे पाहण्यात आले आहे. आजच्या बैठकीस मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशीष कुमार सिंह, प्रधान सचिव मदत पुनर्वसन असीम गुप्ता, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय, व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

दिगंबर वाघ            
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८